Next
सालसाचे स्वप्न ज्युनिअर ग्रँडस्लॅमचे
अमित मधुकर डोंगरे
Friday, October 12 | 03:00 PM
15 0 0
Share this storyटेनिसमध्ये पुण्याच्या सालसा आहेर या तरुणीने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रात मानांकनयादीत ती पहिल्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सीरिज स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवले आणि आपले खेळातील सातत्य दाखवून दिले. डावखुरी सालसा हार्ड कोर्टवर जास्त तुल्यबळ वाटते. २००६ मध्ये तिने टेनिसचे प्राथमिक धडे गिरवायला सुरुवात केली आणि आज ती नामांकित प्रशिक्षक केदार शहा यांच्याकडे लॉ कॉलेज येथील टेनिस कोर्टवर सराव करते. त्यापूर्वी काही काळ तिने संदीप कीर्तने यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. कौटुंबिक पार्श्वभूमी क्रीडाक्षेत्राची नसली तरी तिचे आईवडील सालसाला आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून प्रस्थापित झालेली पाहण्यासाठी सर्वतोपरी धडपड करत आहेत.

डब्ल्यूटीए फ्युचर स्टारस्पर्धेत सालसाला फ्रान्सची मानांकित खेळाडू कॅरोलिन गार्सिया हिने तिची गुणवत्ता पाहून स्वतःची रॅकेट बक्षीस म्हणून दिली होती. ही शाबासकी सालसाला पुढील वाटचालीसाठी खूपच प्रेरणादायी ठरणार आहे.  कोणताही अनुभव नसताना सालसा पाचगणीतील स्पर्धेत सर्वप्रथम खेळली आणि पराभूत झाली. परंतु या पराभवानंतरच तिचा यशाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. २०१३ साली कोल्हापूरला झालेली १४ वर्षांखालील स्पर्धा तिने जिंकली तेव्हा ती १२ वर्षांची होती. त्यानंतर यशाची एकेक शिखर पादाक्रांत करण्याचा सुरू झालेला प्रवास कायम आहे. आजवर एकेरी आणि दुहेरी अशा मिळून ६० ते ६५ स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. आता तर ती बहुतांश स्पर्धा परदेशात खेळते. सुरुवातीला तिचे आयटीएफ ज्युनिअर रँकिंग ३०३ होते ते तिने २२५ पर्यंत आणले आहे. आता जर ती जागतिक क्रमवारीत १७५च्या आत आली तर तिचे ज्युनिअर ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल.

सतरा वर्षांच्या सालसाची गेल्या वर्षी फेडरेशन चषक स्पर्धेत निवड झाली. त्यामुळे तिने दहावीच्या परीक्षेतून अंग काढून घेतले होते. तिच्या या निर्णयाला तिच्या शाळेनेदेखील (सिम्बॉयसिस स्कूल) पाठिंबा दिला होता. यंदा ती दहावीची परीक्षा देणार असून त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्येही सहभागी होणार आहे. नुकतीच तिने पुण्यात झालेली राष्ट्रीय सीरिज स्पर्धा जिंकली आणि आपल्या तंदुरुस्तीचे प्रमाणपत्रही दिले. डेंग्यू झाल्यामुळे तिला काही स्पर्धांतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे तिचे रँकिंग पुन्हा एकदा घसरले. आता पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर तिने सिंगापूरमध्ये झालेली फ्युचर स्टार स्पर्धा गाजवत अंतिम फेरी गाठली आणि आपण पुन्हा भरात येत असल्याचे सिद्ध केले.

तिच्यासाठी २०१४ साल खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले होते. राजधानीत झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीयस्पर्धेत तिने एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही गटात उपविजेतेपद मिळवले होते. याच कामगिरीमुळे तिची भारताचे भविष्य म्हणून ओळख निर्माण झाली. तिच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने सालसाला नुकतीच दहा लाख रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती बहाल केली आहे.

सानिया मिर्झाने जशी ज्युनिअर ग्रँडस्लॅममधून तिची कारकीर्द घडवली त्याच मार्गावर सालसाचा प्रवास सुरू आहे. येत्या काळात तिचे जागतिक क्रमवारीतील स्थान १७५च्या आत राहिले तर तिला ज्युनिअर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पात्रता फेरीत होणाऱ्या सर्व स्पर्धामध्ये खेळता येईल आणि त्यातूनच तिचे भारताकडून ज्युनिअर ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळून जागतिक स्तरावरची टेनिसपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल. त्यापूर्वी तिला परदेशात होणाऱ्या विविध स्पर्धांत सहभागी व्हावे लागेल आणि सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवावी लागेल. तिची गुणवत्ता, मेहनत करण्याची वृत्ती, केदार शहा यांचे मौलिक मार्गदर्शन यांच्या जोरावर येत्या काळात भारताला सालसाच्या रूपाने एक नवीन आंतरराष्ट्रीय आणि दर्जेदार टेनिसपटू मिळेल याची खात्री वाटते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link