Next
मी तुमचाच कृष्ण, घना, गौतम
स्वप्निल जोशी
Friday, June 28 | 03:48 PM
15 0 0
Share this story


नमस्कार. बघता बघता या लेखमालेच्या शेवटच्या भागाकडे आलोसुद्धा. आधीचे तिन्ही लेख आवडल्याचं सांगणाऱ्या तुमच्या अभिप्रायांमुळे मला खरंच खूप बरं वाटलं.  माझ्या ‘भिकारी’ चित्रपटाचा ट्रेलर आणि फोटो बघून तुमच्यासारख्या अनेक प्रेक्षकांनी माझ्या त्या लूकबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ‘स्वप्निल भिकारी दिसूच शकत नाही.’ इथपासून ‘आम्हाला त्याला त्या रूपात पाहायचंच’ नाही,पर्यंत अनेक प्रतिक्रिया आल्या. अर्थात त्यामागेही रसिकांचं प्रेम होतं. मात्र ज्यांनी तो चित्रपट पाहिला त्यांना त्या लूकचा संदर्भ लागला आणि मग एक वेगळी भूमिका केल्याबद्दल रसिकांनी कौतुकही केलं. एका कलाकारासाठी यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट नाही. म्हणूनच म्हटलं की तुमचे अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, मग ते चित्रपटाबद्दलचे असोत वा या लेखांबद्दलचे.  
मराठीमध्ये माझा खऱ्या अर्थी प्रवेश झाला तो ‘गेट वेल सून’ या नाटकामुळे आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटामुळे. मागच्या भागात त्याबद्दल बोललो होतो. लोकांना असं वाटतं की मी मराठीत खूप चित्रपट केले आहेत आणि मी खूप वर्षांपासून मराठीतच काम करतोय. परंतु खरं सांगायचं तर मी फक्त पंधरा-वीसच मराठी चित्रपट केले आहेत. देवाच्या कृपेने ते सगळे चित्रपट खूप चालले. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाबद्दल तर वेगळं सांगायलाच नको. त्यानं तर विक्रमच केला. ‘दुनियादारी’नं त्यावर कळस चढवला आणि ‘चॉकलेट हीरो’ ही उपाधी मला मराठी प्रेक्षकांनी बहाल केली. ‘मितवा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’ पासून अगदी आताच्या ‘मोगरा फुलला’पर्यंत नट म्हणून मला खऱ्याअर्थी समृद्ध केलं ते मराठी चित्रपटांनी. ‘झी मराठी’चाही माझ्या कारकिर्दीत खूप मोठा वाटा आहे. ‘अधुरी एक कहाणी’ ही माझी पहिली टीव्ही मालिका झी मराठीवरच होती.  ती आठशे भागांपर्यंत चालली. त्यानंतर पहिल्यांदाच परीक्षक म्हणून मला नवीन जबाबदारी दिली तीही झीनंच, ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून. मी त्या कार्यक्रमाची सात पर्वं केली. तेव्हाच्या परीक्षकांमध्ये मी महाराष्ट्रातला सर्वात तरुण परीक्षक ठरलो होतो. त्यानंतर ‘कोण होणार मराठी करोडपती’ हा कार्यक्रम केला. तोही एक वेगळा, भन्नाट अनुभव होता. तेव्हा मी संपूर्ण भारतातील ‘सर्वात तरुण सूत्रसंचालक’ ठरलो होतो. मला इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे कलाकार म्हणून आम्ही नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करत असतो, वेगवेगळ्या भूमिकांमधून स्वतःला तपासून पाहत असतो. परंतु प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळणं, त्यांनी अमुक एका भूमिकेत त्या कलाकाराला स्वीकारणं ही बाब खूप परिणामकारक असते. ‘मराठीतला चॉकलेट हीरो’ असं माझं नामकरण झालेलं असतानाही प्रेक्षकांनी मला परीक्षक, निवेदक, सूत्रसंचालक म्हणूनही स्वीकारलं. कलाकाराचा उत्साह आणि हुरूप वाढतो तो अशा पाठिंब्यामुळेच. बाकी पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळत असतेच. परंतु रसिकांना आपलं काम आवडतं तो खरा आनंदाचा क्षण असतो. रसिक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय याकडे मी गांभीर्यानं पाहतो आणि त्यावर विचारही करतो.
माझी आणखी एक आवडती भूमिका म्हणजे ‘घनश्याम’ ऊर्फ ‘घना’. एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या पुन्हा एकदा झी मराठीच्याच मालिकेत मी ते पात्र साकारलं आणि काय सांगू ‘घना’ हे माझं जणू दुसरं नावच झालं. लोक मला ‘घना’ म्हणून हाक मारायचे. सर्वांगसुंदर अशी ती मालिका होती. ‘सासू-सुनांची भांडणं, कुरघोड्या, कारवाया, खलनायक, हाणामारी, रडारडी, नवऱ्याची लफडी, मसाला किंवा पाणी घालून मालिका वाढवण्याचा फंडा चालू असतानाच्या काळात ही मालिका आली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. मालिकेत भांडणं, अफेअर्स, खलनायक यापैकी काहीही नव्हतं. त्यातील आमचं हसरं कुटुंब प्रेक्षकांना एवढं आवडलं, की घर असावं तर असं ही भावना झाली होती. सगळेच मोठे कलाकार त्या मालिकेत होते आणि सगळ्यांची भट्टी अशी काही जमली होती की खरंच खूप मजा आली. ज्येष्ठ अभिनेते विनय आपटेंबरोबर काम करण्याची माझी अनेक दिवसांपासून इच्छा होती. ती इच्छा ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’  या मालिकेमुळे पूर्ण झाली. ती मालिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. त्या मालिकेच्या वेळी मला विविध क्षेत्रांतील अशा अशा लोकांचे अभिप्रायाचे फोन यायचे की ज्यांना तुम्ही टीव्ही मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांच्या पठडीत बसवूच शकत नाही. मग त्यात मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ, राजकारणी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपले खेळाडू अशा लोकांचे कौतुकाचे फोन असायचे. ती मालिका मोजून १८० भागांची होती. सर्वसाधारणपणे चॅनेलला ‘अमुक एक मालिका आता बंद करा’ अशी प्रेक्षकांची पत्रं येतात. मात्र या मालिकेच्या बाबतीत उलट झालं आणि मालिका संपली तेव्हा चॅनेलचा धिक्कार करणारी,  ‘मालिका बंद करूच कसे शकता’ अशा आशयांची अनेक पत्रं आली होती. एवढं त्या मालिकेवर, त्यातील प्रत्येक पात्रावर रसिकांनी प्रेम केलं. त्यातला घना हे पात्र माझंही आवडतं पात्र झालं होतं. अशीच आणखी एक वेगळी भूमिका मी केली ती ‘मितवा’ या चित्रपटात. त्या चित्रपटानं मराठीला ‘ग्लॅमरस’ हीरो दिला. हेलिकॉप्टरमधून फिरणारा, अब्जाधीश नायक मी त्यात साकारला. तोही चित्रपट खूप हिट झाला. विशेषतः तरुणांना तो चित्रपट आणि माझी भूमिका खूप आवडली. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की कलाकार विभिन्न भूमिका करत राहतो; परंतु प्रेक्षक त्याला कसं स्वीकारतात हेही महत्त्वाचं असतं.
आयुष्यात मैलाचा दगड किंवा टर्निंग पॉइंट म्हणाव्यात अशा अनेक भूमिका आहेत;  ज्यांनी मला केवळ कलाकार म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही समृद्ध केलं. माझे दिग्दर्शक (अगदी रामानंद सागर यांच्यापासून) हिंदी, मराठीतील माझे सर्व दिग्दर्शक, लेखक, निर्माते, सहकलाकार या सगळ्यांचा खूप मोठा हातभार माझ्या कारकिर्दीला लागला आहे आणि म्हणूनच गिरगावतल्या चाळीत वाढलेला स्वप्निल मोहन जोशी नावाचा हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा मराठी चित्रपटसृष्टीत इथपर्यंत पोचू शकला. ‘गेट वेल सून’ नाटकाच्या एका प्रयोगाला दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी नाटक संपल्यावर आत आले आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली व पाचशे रुपयांची नोट स्वाक्षरी करून दिली. ते म्हणाले, “दिग्दर्शक म्हणून मी हे नाटक जसं माझ्या मनात बसवलं होतं, तसं आज ते सादर झालं. शाब्बास! फार भारी काम केलंस तू.” त्यांची ही शाबासकी आयुष्यभर स्मरणात राहील. तुम्हा रसिकांचं प्रेम तर कधीही न संपणाऱ्या शिदोरीसारखं आहे. ते बरोबर घेऊनच पुढे चाललो आहे. वेब सीरिजमध्ये तू कधी दिसणार, असंही मला चाहते विचारतात. या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. तूर्तास इथेच थांबतो. माझे चारही लेख कसे वाटले हे कळवायला विसरू नका, कारण रसिकांच्या अभिप्रायाची मी नेहमीच वाट पाहतो.
तुमचा,
स्वप्निल, कृष्णा, घना आणि गौतम.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link