Next
बंटी आणि ‘मी टू’
सुरेश खरे
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story


ऑफिसातून निघता-निघता एक जुना मित्र भेटला. त्याच्याशी गप्पा मारता-मारता वेळ कसा निघून गेला समजलं नाही. घरी आलो तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. लॅच कीनं दार उघडलं. बंटीच्या कटकटीला कंटाळून, त्याच्यासाठी नवीन विकत घेतलेल्या टीव्हीवर तो काहीतरी मन लावून पाहत होता. जवळ जाऊन मी पाहिलं तर बंटी टीव्हीवर चक्क बातम्या पाहत होता. ते पाहताच माझा पारा चढला.
“बंटी, मुळात कुत्र्याकरता कुणी टीव्ही घेत नाही तरी मी तो घेतला. घेताना मी तुला हजारदा बजावलं होतं, बातम्या, मालिका वगैरे पाहायच्या नाहीत. ‘टॉम अ‍ॅन्ड जेरी’ पाहा, ‘पोगो’ पाहा. आणि तू दिवसभर बातम्या पाहत बसला आहेस?”
“साहेब, दिवसभर ‘टॉम अ‍ॅन्ड जेरी’ पाहून बोअर व्हायला होतं. त्यापेक्षा बातम्या पाहताना जास्त मजा येते. तुम्ही परवा अशोक चव्हाणांचं भाषण ऐकलं असेल. माझी तर हसूनहसून पुरेवाट झाली.”
“त्यात हसण्यासारखं काय होतं बंटी? आणि कुत्र्यांना हसवण्याकरता ते बोलले नाहीत. ते फार गंभीरपणे बोलले. त्यात हसण्यासारखं काय होतं?”
“नाही कसं? ते बोलले त्याचं व्हिज्युअल माझ्या डोळ्यांसमोर आलं.”
“पुरे..!” मी बंटीला थांबवलं. मला आणखी विषय वाढवायचा नव्हता. पण बंटी बोलायचा थांबेना.
“साहेब, आज मी फारच अपसेट आहे. ते कोण संजय निरुपम म्हणून कुणीतरी आहेत.”
“त्यांचं काय?”
“त्यांनी सांगितलंय की उत्तर प्रदेशातल्या मुंबईतल्या लोकांनी काम थांबवलं तर आपल्याला उपाशी मरायची पाळी येईल. माझी इतके दिवस अशी कल्पना होती, की आपली मुंबई, महाराष्ट्र शासन आणि महापालिका चालवते. उत्तर प्रदेशातल्या भय्यांच्या हातात आपण जिवंत राहायचं की मरायचं हे ठरवणं आहे, हे मला माहीत नव्हतं. तुम्हाला काय वाटतं साहेब, आपल्याला उपाशी मरायची पाळी येईल?”
“मूर्ख आहेस तू बंटी. कुणीतरी काहीतरी भॅकतं आणि तू ते गंभीरपणे घेऊन डोक्याला ताप करून घेतोस. अरे त्यांच्या पक्षातसुद्धा त्यांना कुणी विचारीत नाही की त्यांचं बोलणं मनावर घेत नाही. आणि तू लगेच ते खरं मानून डोक्याला हात लावून बसतोस. ते भय्येपण त्याचं बोलणं मनावर घेणार नाहीत. कारण त्यांनी काम थांबवलं तर आपण उपाशी मरायच्या आधी तेच उपाशी मरतील, हे कळण्याइतकी अक्कल त्यांच्यापाशी आहे. जी... ते जाऊ दे. आल्यापासून तुझी बडबड चालू आहे. मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. ती राहतेय. तू ज्या सिरिअलमध्ये काम केलं होतंस तिच्या निर्मात्याचा मला फोन आला होता. तू अव्हेलेबल आहेस का विचारायला. त्यांना आणखी भाग वाढवून मिळाले आहेत. आणि त्यांत तुला काम आहे.”
“पण त्यांना माझ्या तारखा का पाहिजेत? मी केव्हाच मेल्याचं त्यांनी दाखवलंय. सिरिअलमध्ये रडारडीचा सीनपण दोन एपिसोड्स दाखवला. माझ्या फोटोला हार घातलेलापण दाखवला.”
“तो हार काय केव्हाही काढून टाकता येतो. मी त्यांना विचारलं की तुम्ही तो मेल्याचं दाखवलंय ना? मग आता काय करणार? तर ते म्हणाले, ‘तो काही प्रॉब्लेम नाही. अहो, एकदा मेलेली माणसं आम्ही पुन्हा आलेली दाखवतो. तर कुत्र्याचं काय घेऊन बसलात? पुनर्जन्म असतो. भूत येऊ शकतं. पण यावेळी आम्ही नवीनच आयडिया करणार आहोत. उगाच लोकांची टीका नको म्हणून आम्ही तुमच्या कुत्र्याला आधीच्या कुत्र्याचा जुळा भाऊ म्हणून दाखवणार आहोत. जत्रेत हरवलेला.”
“साहेब काय हे? तुम्ही त्यांना ‘हो’ म्हणून नाही ना सांगितलंत?”
“का? तू काम नाही करणार?”
“साहेब, कुत्रा असलो म्हणून काय झालं? काही तत्त्वं वगैरे आहेत की नाही?”
“डोंबलाची तत्त्वं. सिरिअलमध्ये काम करायचं म्हणजे तत्त्वं वगैरे गुंडाळून ठेवावी लागतात बंटी...”
“तरीपण मला नाही काम करायचं.”
“पण का नाही काम करायचं? तुझी त्यांनी राजासारखी बडदास्त ठेवली. बरं कामही काही कष्टाचं, पळापळीचं नव्हतं. सगळं एसी स्टुडिओत. आणि तुला काम काय? तर सोफ्यावर लोळायचं, हिरॉइनच्या मांडीवर बसायचं. तिच्याकडून लाड करून घ्यायचे...”
“तेच मला नकोय”.
“काय वेड लागलंय का तुला? अरे त्यात वाईट काय आहे? चंपीची हरकत आहे का?”
“तिची हरकत वगैरे काही नाही. नटांच्या बायकांची हरकत कुठे असते? तशीच तिचीही नाहीये. माझीच हरकत आहे.”
“का? हरकत का आहे?”
“मला भीती वाटते. तिनं माझे खूप म्हणजे खूपच लाड केले. माझ्या गालावर गाल घासायलाही कमी केलं नाही. मला ते आवडलं नाही, असं नाही. पण मी आपणहून काहीही केलं नाही. नाही म्हटलं तरी माझ्यावर तुमचे संस्कार आहेत. उद्या तिनं माझ्यावर विनयभंगाची केस केली तर माझी किती बदनामी होईल. ती पडली नटी! माझ्यासारख्या कुत्र्याच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार?”
“तू उगाच घाबरतोयस. त्याला आता दहा महिने उलटून गेले आहेत.”
“केस दहा वर्षांनीही करता येते.”
“बंटी, तुझ्यावर कुणीही केस करणार नाही. आणि हे बघ, आपल्यावर अन्याय झाला असं वाटलं तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावणं चूक नाही. तो हक्क असतो. आणि त्याचबरोबर समोरच्याला आपलं निर्दोषत्व सिद्ध करायची संधी असते. आपण निष्कर्ष काढायच्याऐवजी न्यायालयावर विश्वास ठेवावा. अखेरीस सत्य बाहेर येतं आणि सत्य हे सत्यच असतं!”

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link