Next
शुद्धतेसाठी हवी दुसरी दुग्धक्रांती!
शुभदा चौकर
Friday, October 12 | 01:30 PM
15 0 0
Share this storyदुधाला पूर्णान्न मानून रोज मनोभावे दूध पिणाऱ्या लोकांना धक्का देणाऱ्या दूधभेसळीच्या बातम्या अधूनमधून येत असतात. मात्र इलाज नाही म्हणून  त्याकडे दुर्लक्ष करून घरोघरी दुधाचा वापर केला जात असतो. अलिकडे अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत काही ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त दुधाच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. दूधभेसळीचा प्रश्न जटिल आहे. केंद्र व राज्य सरकारने जसे स्वच्छता अभियान सुरू केले आहे, त्या धर्तीवर स्वच्छ-शुद्ध दूध मिळावे, यासाठी अभियान छेडले, ‘दूधधोरण’ आखून एकंदर दूधवितरण-विक्रीयंत्रणा सुधारली तरच हा प्रश्न मार्गी लागेल. अधूनमधून छापे टाकून तात्पुरती मलमपट्टी होते, पण शुद्धतेसाठी हवी आहे दुसरी धवलक्रांती!

मुंबई ग्राहक पंचायतीने २०१४-१५ या काळात ‘शुद्ध दूध - आपला अधिकार’ ही मोहीम छेडली होती. या काळात ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांतील विविध ठिकाणी जाऊन दुधाचे एकूण ८००-९०० नमुने तपासले. परीक्षणाअंती असे आढळून आले, की सुमारे ३० टक्के ग्राहकांना भेसळयुक्त दूध मिळत आहे. तसेच ४६ टक्के ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे दूध मिळत आहे. कारण अनेक नमुन्यांत दुधाचा दर्जा शासनाने ठरवून दिलेल्या मानकापेक्षा निकस होता. दूधकंपन्यांनी शेतकऱ्यांकडून कमी प्रतीचे दूध स्वीकारणे, उत्पादकसंघानी शासनाने ठरवून दिलेली मानके न पाळणे आणि दूधवितरण जाळ्यातील त्रुटींमुळे; तसेच भेसळीला आळा घालण्यास अपुऱ्या ठरणाऱ्या यंत्रणेमुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना गेली अनेक वर्षे भेसळयुक्त तसेच निकृष्ट दूध मिळत आहे. शासनाने याबाबत त्वरित कारवाई करून शुद्ध दुधासाठी दुसरी धवलक्रांती छेडणे आवश्यक आहे, अशी कळकळीची विनंती मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे शासनाला या पाहणीच्या आधारे केली. त्यानंतरही सरकारकडून कोणतीही ठोस हालचाल झाली नाही.

मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे दुधाचे नमुने तपासण्यासाठी लेक्टोमीटर (Lactometer), इलेक्ट्रॉनिक मिल्क अॅनलायझर (Electronic Milk Analyser), राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचा (National Dairy Development Board) परीक्षण संच अशा साधनांचा वापर केला होता. त्यासाठी सुमारे ५० कार्यकर्त्यांनी दूधतज्ज्ञ डॉ. राजेंद्र कोकणे आणि डॉ. नाईक यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते. ठिकठिकाणी जाऊन जी शिबिरे घेतली त्यांत नामांकित दूधउत्पादकांच्या दुधाचे तसेच खुल्या बाजारातील सुट्या दुधाचे नमुने होते. त्यातून पुढील गोष्टी लक्षात आल्या होत्या-
जवळजवळ २५ टक्के नमुन्यांत पाणी मिसळलेले आढळले.

खुल्या बाजारातील सुट्या दुधाच्या (अनब्रँडेड) नमुन्यांपैकी गायीच्या दुधाच्या जवळजवळ सर्वच नमुन्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी मिसळलेले आढळून आले.
खुल्या बाजारातील सुट्या दुधाच्या नमुन्यांपैकी म्हशीच्या दुधाच्या बहुतांश नमुन्यांमध्ये १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याची भेसळ आढळून आली. तसेच या नमुन्यांमध्ये इतर घनपदार्थ (SNF) अपेक्षित मानकापेक्षा फार कमी प्रमाणात आढळून आले.

दुधाच्या काही ब्रँडेड नमुन्यांमध्ये स्टार्च, युरिया आणि साखर यांची भेसळ आढळून आली. (सुमारे ५ टक्के नमुन्यांत)
नामांकित दूधउत्पादकांच्या दुधाचा स्निग्धांश (Fat) आणि इतर घनपदार्थ (SNF) अपेक्षित मानकापेक्षा कमी प्रमाणात असल्याचे आढळून आले. शासनाने ठरवून दिलेल्या दुधातील मानकांचे (गायीचे दूध व टोन्ड दूध ३.५ टक्के स्निग्धांश व ८.५ टक्के इतर घनपदार्थ; तसेच म्हशीचे दूध व फुल क्रीम दूध - ६ टक्के स्निग्धांश व ९ टक्के इतर घनपदार्थ) प्रमाण पाहिल्यास जवळजवळ ४६ टक्के नमुने हे त्यापेक्षा कमी प्रतीचे आढळले.

सुटे (अनब्रँडेड) दूध तपासले असता बहुतांश नमुन्यांमध्ये पाणी जास्त आणि स्निग्धांश व इतर घनपदार्थ अपेक्षित प्रमाणापेक्षा कमी आढळले.

घरी येणाऱ्या विक्रेत्याकडून सुटे दूध घेणाऱ्या ग्राहकांपैकी ३५ टक्के नमुन्यांत पाणी मिसळल्याचे या पाहणीत आढळून आले.

यावरून सरकारने ठोस भूमिका घेऊन पुढील गोष्टी कराव्या, असे मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे सुचवण्यात आले होते. राज्याचे ग्राहकसंरक्षण मंत्री गिरीश बापट यांना भेटून हा अहवाल देण्यात आला होता.

खुल्या बाजारातील सुट्या दुधाच्या दर्जावर नियंत्रण ठेवणारी ठोस यंत्रणा असावी. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष पथके नेमावीत. काही तपासणीशिबिरांत काही ब्रँडेड नमुन्यांत दुधात साखर, युरिया व स्टार्च यांची बेमालूम भेसळ आढळून आली. या दुधाच्या नमुन्यांच्या पिशवीचे सील मात्र व्यवस्थित होते. मग ही भेसळ डेअरीत झाली असावी, अशी शंका येते. डेअरीतून नक्की शुद्ध दूधच बाहेर पडतेय ना, याची तपासणी रोजच्या रोज करणारी प्रामाणिक, पारदर्शक  व कार्यक्षम यंत्रणा असावी.

सरकारने ठरवून दिलेल्या दुधातील मानकांचे प्रमाण कसोशीने पाळले जावे. यासाठी शासनयंत्रणा पुरेशी दक्ष असावी आणि दूधउत्पादक संघांवर सरकारचे नियंत्रण असावे.

नामांकित दूधउत्पादकांच्या पिशवीचे सील फाडून पुन्हा जोडलेले नमुने आढळले. तसेच काही बनावट पिशव्याही सापडल्या. एकंदर दूधवितरणाच्या यंत्रणेत गैरप्रकारांना वाव मिळू नये यासाठी जीपीएस, सीसीटीव्ही यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा.

डेअरी ते ग्राहक या वितरणयंत्रणा नीट राबवली गेली पाहिजे. ग्राहकाला शुद्ध दूध मिळेपर्यंत पूर्ण जबाबदारी उत्पादकसंघानेच घ्यायला हवी, ‘आमची जबाबदारी आमच्या गेटपर्यंत’ अशी भूमिका बरेचसे उत्पादक घेतात, हा अन्याय आहे.

दूधवितरण साखळीतील प्रत्येक व्यक्ती अधिकृत आहे हे बघणे, प्रत्येक टप्प्यावर दुधाची तपासणी होणे- यावर अन्न व औषधप्रशासनाचे नियंत्रण असावे. सध्या तशी खात्रीची व्यवस्था नाही.

बहुतांश डेअऱ्यांची पॅकिंग सेंटर शहराबाहेर असतात. तेथून दुधाचे टँकर मध्यरात्री डीलरकडे येतात. घरोघरी दूध वाटण्याची प्रक्रिया पहाटे सुरू होते. मधल्या काळात काही ठिकाणी काळे धंदे होतात. हे थांबवावेत यासाठी ही टाइमगॅप कमीत कमी असावी आणि त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर त्यावर असावी.
आपल्या घरातील दूध बनावट आहे, अशी शंका ग्राहकाला आल्यास ते त्वरित तपासून कसे घ्यायचे, तक्रार कुठे करायची, दाद कुठे मागायची, याची माहिती ग्राहकांना नसते. दुधासाठी खास हेल्पलाइन असावी.

भेसळ करणाऱ्या काही गुन्हेगारांना ग्राहक पंचायतीने मुंबईतील अंधेरी भागांत रंगेहाथ पकडून दिले होते. त्यावेळी त्या विक्रेत्याच्या झोपडवस्तीतील घरात काही नामवंत दूधकंपन्यांच्या रिकाम्या पिशव्यांचा साठा सापडला होता. बनावट पिशव्यांच्या पुराव्यासह पोलिसठाण्यात तक्रार केल्यावर त्या दुधाची त्वरित तपासणी करून गुन्हा शाबीत करण्याची यंत्रणा सहज उपलब्ध नव्हती, असे लक्षात आले. दुधाबाबत तक्रार आली, की या नाशिवंत पदार्थाची तपासणी तातडीने कोठे करावी, हे खुद्द पोलिसांना माहीत नव्हते. मुंबई पोलिस आणि अन्न व औषधप्रशासन यांच्यात अजिबात मेळ नव्हता. या दोन संस्थानी एकमेकांच्या सहकार्याने काम केल्याशिवाय दूधभेसळ कशी रोखता येईल? 

केंद्र व राज्य सरकारने स्वच्छता अभियान सुरू केले आहे, त्या धर्तीवर स्वच्छ-शुद्ध दूध मिळावे, यासाठी व्यापक यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.
भेसळयुक्त दूध आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी प्रत्येक ग्राहकाने कसे सावध राहावे, यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे काही मार्गदर्शनशिबिरे घेण्यात आली होती. घरच्या घरी लेक्टोमीटर वापरून दुधात पाणी मिसळलेले नाही ना, हे कसे तपासायचे ते शिकवले गेले. (ही लिंक पाहा https://www.youtube.com/watch?v=B8IJi3C3_D4)   
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खात्रीचा गवळी/गोठा असल्याशिवाय सुटे दूध घेऊ नये. सुटे (ब्रँडेड नसलेले) दूध आपण ज्या गोठ्यातून घेता, त्या गोठ्याला अधूनमधून भेट देऊन तेथील स्वच्छता आणि प्रामाणिकपणाची खातरजमा करावी.
रोज घरी आलेली ब्रँडेड दुधाची पिशवी फोडण्यापूर्वी एक मिनिट खर्च करून ती कशी तपासावी, याबाबत-
दुधाची पिशवी हाताला थंड लागली पाहिजे. (रूम टेंपरेचरची किंवा कोमट नसावी.)
दुधाच्या पिशवीचा स्पर्श एखाद्या उशीसारखा गुबगुबीत असावा.

पिशवीची शिवण कंगोरेदार असावी.

पिशवी दोन हातांच्या मधे दाबून धरल्यास किंवा मधोमध जोर दिल्यास तिचे चारही कोपरे सशाच्या कानासारखे उभे राहिले पाहिजेत.

पिशवीवर उत्पादकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, वजन, किंमत (MRP), बेस्ट बिफोर तारीख, FSSAI चा लायसन्स क्रमांक, पोषणमूल्यांचा तक्ता, आणि दुधाचा प्रकार (टोन्ड, गाय, म्हैस) या गोष्टी नमूद केलेल्या असाव्यात.

पांढऱ्या दुधाच्या एकंदर व्यवहारात अनेक टप्प्यांवर काळेबेरे प्रकार सर्रास घडत आहेत, हे एक दुर्लक्षित सत्य आहे. शासन-प्रशासनाच्या तीव्र इच्छाशक्तीशिवाय शुद्ध दूध मिळण्याची शाश्वती मिळणार नाही, असे ग्राहक पंचायतीचे म्हणणे आहे. भारतीय दुग्धक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या देशात दूधभेसळीची रड आपण किती काळ सहन करत राहणार?
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link