Next
विमान अडकले दरीच्या चक्रव्यूहात?
विशेष प्रतिनिधी
Friday, June 07 | 12:30 PM
15 0 0
Share this story


उंच उंच वृक्ष, घनदाट जंगल, पावसाळी हवामान, कमी झालेली दृश्यमानता आणि तशात नरसाळ्यासारख्या आकाराची दरी... या दरीत विमान गेले, तर चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था... इथे जाण्याचा मार्ग आहे, परंतु पुन्हा वर येणे कठीण... भारत-चीन सीमेनजीक अरुणाचल प्रदेशात  बेपत्ता झालेले भारतीय हवाई दलाचे विमान अशा चक्रव्यूहाच्या दरीत सापडले असावे, अशी शक्यता आहे. चार दिवस उलटूनही विमानाचे कोणतेही अवशेष न सापडल्याने याआधी बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेल्या एएन ३२ विमानाप्रमाणेच या विमानाचेही गूढ वाढत चालले आहे.

एएन ३२ या १९८० च्या दशकात भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या युद्धसामग्रीवाहक विमानाला २००९ मध्येही मेचुका या हवाई तळालगतच अपघात झाला होता. त्यानंतर २०१६ मध्ये तांबरम विमानतळावरून पोर्ट ब्लेअरकडे जाणारे एएन ३२ विमान बंगालच्या उपसागरात बेपत्ता झाले. हे विमान शोधण्यासाठी सुमारे ३०० उड्डाणांद्वारे एक हजार तासांचे शोधकार्य करण्यात आले. परंतु खोल समुद्रात त्याचा थांग लागला नाही. आता ईशान्येच्या गर्द जंगलात कोसळलेले विमान शोधण्यात अडचणी येत आहेत.

विमानाने सिग्नल का दिला नाही?
विमानांमध्ये इलेक्ट्रॉनिक लोकेशन ट्रान्समीटर नावाची एक प्रणाली असते. विमान पाण्यात पडल्यास पाण्याचा संपर्क आल्याने त्याची बॅटरी सक्रिय होऊन प्रकाशाचा झोत टाकला जातो, ज्यायोगे त्याचे स्थान शोधकार्य करणाऱ्या विमानांना कळते. या बॅटरीला आयुर्मर्यादा असते. विमान जमिनीवर कोसळल्यास पूर्वी हा ट्रान्समीटर सुरू करावा लागायचा. नव्या तंत्रज्ञानात धक्क्याने हा ट्रान्समीटर सुरू होऊ शकतो. मात्र हे प्रगत तंत्रज्ञान या विमानात आले होते की नाही, याबाबत माहिती उघड झालेली नाही. हे विमान आधुनिकीकीरण झालेल्या एएन३२ विमानांपैकी नसल्याने त्यातील ट्रान्समीटरकडून आपत्तीचा सिग्नल पाठवला गेला नसेल, अशी शक्यता वर्तवली जाते.

पॅराशूट का नाही वापरता येत?
आसामच्या जोऱ्हाट भागात विमान उडविण्याचा अनुभव असलेले हवाई दलातील निवृत्त विंगकमांडर शशिकांत कोप्पीकर यांनी सांगितले, की या भागात कमी उंचीवर विमान मार्गक्रमण करत असते, तेव्हा सर्वात उंच अडसरापासून ते हजार फुटांवर असते. इतक्या कमी उंचीवर पॅराशूटद्वारे जवानांना उतरणे शक्य नसते. पॅराशूट उघडण्यास तीन ते चार मिनिटांचा अवधी तरी द्यावा लागतो व तेवढ्या वेळात उडी मारल्यास हजार-दीड हजार फुटांपर्यंत माणूस सहज खाली येतो. लढाऊ विमानांमध्ये सीट इजेक्शनची म्हणजेच अख्खी सीटच हवेत फेकण्याचा पर्याय असतो. त्यातले पॅराशूट हे काही सेकंदांत उघडले जाते. तसा पर्याय या विमानांमधील आपद्ग्रस्तांसाठी नसतो. शिवाय कोणतीही पूर्वसूचना न मिळता विमान अचानक कोसळल्यास पॅराशूटसह उड्या मारण्याचीही उसंत विमानातील कुणाला मिळत नाही.

केवळ विमानात प्रगत तंत्रज्ञान असूनही उपयोगाचे नाही. जमिनीवरही तशा प्रणाली हव्यात. तरच त्या विमानास यांत्रिक मदतीने लँडिंग शक्य होते. या भागात काही दऱ्यांना ब्लाइन्ड अॅली किंवा cul-de-sac असे म्हटले जाते. या भागात विमानात काही बिघाड झाला किंवा ते कोसळले, तर वर येण्याचा मार्गच उपलब्ध नसतो. अशा ब्लाइन्ड अॅलीपर्यंत पोहोचण्याची क्षमता उपग्रहाच्या वापरातून मिळू शकते. आता इस्रोच्या मदतीने तो प्रयत्नही सुरू आहे.
एएन३२ विमाने खूप जुनी असून त्यात जे बदल करण्यात आले, ते नेमके किती विमानांमध्ये झाले व त्याने दिशादर्शनाची क्षमता वाढली का, हे स्पष्ट झालेले नाही. अपघातामागे तीन-चार वेगवेगळी कारणे असू शकतात. सीमेजवळ असल्याने घातपात आहे का, याचाही शोध घ्यावा लागतो, असे विंगकमांडर कोप्पीकर यांनी सांगितले.

एनएन ३२ विमाने
युद्धसामग्री तसेच सैनिकी तुकड्यांची वाहतूक करण्यासाठी हे रशियन बनावटीचे विमान भारताने घेतले आहे. या विमानाचा कमाल वेग ताशी ५३० किलोमीटर असतो. २००९ मध्ये हे विमान कोसळल्यानंतर युक्रेनबरोबर भारताने ४०० दशलक्ष डॉलर्सचा विमान आधुनिकीकरणाचा करार केला. त्यात विमानातील हवाई दिशादर्शनयंत्रणेत सुधारणा व आयुर्मर्यादा दहा वर्षांनी वाढवण्याची योजना होती. रशिया-युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचे सुटे भाग मिळेनासे झाले. यातील काही विमानांचे आधुनिकीकरण युक्रेनमध्ये होणार होते, तर काही विमानांचे आधुनिकीकरण कानपूरमध्ये हवाई दलाच्या बेस रिपेअर डेपोमध्ये होणार होते. हा कार्यक्रम मागे पडल्याचा फटका हवाई दलास बसत आहे, याकडे जाणकार लक्ष वेधतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link