Next
बर्फातला राजा
अतुल साठे
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this story


बिबट्या आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, पण हिमबिबट्या महाराष्ट्रात आढळत नसल्याने आपण त्याला फारसे ओळखत नाही. अतिशय दुर्गम अधिवास आणि एकट्याने लपून-छपून वावरण्याच्या सवयीमुळे दिसायला अगदी दुर्मिळ असलेल्या हिमबिबट्याला ‘हिमालयातील करडे भूत’ असे अनेकदा म्हटले जाते, तर त्याची पिल्लं एखाद्या गोंडस सॉफ्ट टॉयसारखी दिसतात. हिमबिबट्याचे विश्व व परिसर यांवर आधारित “द स्नो लेपर्ड अॅडव्हेंचर” व “नोनो – द स्नो लेपर्ड” यासारखी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समरकंद, अलमाटी, अस्ताना व बिश्केक सारख्या मध्य आशियातील अनेक शहरांच्या बोधचिन्हांवर हिमबिबट्या दिसून येतो, तसेच जिथे-जिथे त्याचा आढळ आहे तेथील संस्कृतीत त्याला महत्वाचे स्थान आहे. भारतात हिमाचल प्रदेशचा तो राज्य प्राणी आहे. आज जाणून घेऊया या गूढ प्राण्याबद्दल.

पर्वतीय अधिवास -
भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, ताजिकीस्तान, किर्घीझिस्तान, कझाकस्तान, उझबेगीस्तान, रशिया व मंगोलिया मधील ३,०००-४,५०० मिटर उंचीवरील पठारी प्रदेश व बर्फाच्छादित पर्वतांत हिमबिबट्या सापडतो. हिमालय, काराकोरम, हिंदुकुश, कुनलुन, अलटाई, सयन, तियान शन, पामीर व खांगाई पर्वतांचा त्याच्या अधिवासात समावेश होतो. त्याची एकूण संख्या ४,०००-६,००० असल्याचे वर्तवले जाते. भारतात याचा आढळ जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम व अरुणाचल मध्ये आहे. “पँथेरा उन्सिया” हे शास्त्रीय नाव असलेल्या या प्राण्याला भरलहे (हिमाचली), शन (लडाखी), झिगसा (तिबेटी), इर्वेस (मंगोलियन), बर्स (कझाकी) व इल्बीर्स (किरगीझ) अशा विविध नावांनी संबोधले जाते.
हिमरेषा किंवा वृक्षरेषेच्या वरील बर्फाळ व खडकाळ प्रदेश व पर्वतीय कुरणे, आणि त्याखाली लागून असलेली उंचीवरील सुचीपर्णी जंगले हे हिमबिबट्याचे साम्राज्य आहे. उन्हाळ्यात तो वृक्षरेषेवरील भागात राहतो, तर थंडीत वृक्षरेषे खालील जंगलांत उतरतो. या दोन्ही बाजूच्या प्रदेशात हिमबिबट्या हा महत्वाचा भक्षक आहे. सामान्यपणे बिबट्या व वाघाचा वावर संपतो तिथे त्याचा प्रदेश चालू होतो. आयबेक्स, अर्गाली, भरल, हिमालयन थार व मार्खोर सारख्या पर्वतीय रानमेंढ्या/रानबकऱ्या; कस्तुरीमृग, थोरोल्ड डीअर व रो डीअर सारखी हरणे; तसेच गरज पडली तर पाळीव प्राण्यांची तो शिकार करतो. अवघड डोंगराळ भागात सराईतपणे फिरणाऱ्या या प्राण्यांच्या मागावर जाताना हिमबिबट्याही तितकाच कौशल्याने वावरू शकतो. माणूस जाण्याचा विचारसुद्धा करू शकणार नाही अशा अनगड जागी या शिकारीचा पाठलाग चालतो. शिवाय लाल पांडा, रानडुक्कर, ससा, लंगुर, चुकर, मार्मोट व पिका सारखे प्राणी/पक्षी आणि अधून-मधून गवत हे सुद्धा त्याचे अन्न आहे. सूर्यास्त व सूर्योदयाच्या सुमारास याचा जास्त वावर असतो.

वैशिष्ट्यपूर्ण शरीर - अति उंचीवरील थंडीत व बर्फाच्छादित प्रदेशात निभाव लागावा म्हणून हिमबिबट्याची जडणघडण विशेष प्रकारे झाली आहे. उबदार केसाळ त्वचा, जाड शेपटी व पंजाच्या खालच्या बाजूला जाड केसाळ त्वचा यांचा उपयोग उब मिळवण्यासाठी होतो. तसेच कडे-कपारीतून बिनचूक उड्या मारताना तोल सांभाळण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. हिमबिबट्या बुटका व लांबट आकाराचा असतो आणि पंजे रुंद असतात. याचाही उपयोग अवघड जागेत व बर्फावर चालण्यासाठी होतो. झोपताना हिमबिबट्या आपल्या गुबगुबीत शेपटीचा उपयोग पांघरुणा सारखा करतो. पांढरट राखाडी रंग व त्यावर काळसर तपकिरी पोकळ ठिपके आणि पांढरी छाती व पोट अशा रंगसंगतीमुळे खडकाळ व बर्फाळ भागात तो सहज दिसून येत नाही.

मादी तिच्या पोटाकडील झडलेल्या मऊ केसाळ त्वचेचे आवरण एखाद्या गुहेला किंवा कपारीला आतील बाजूने बनवते व पिल्लांना जन्म देते. साधारण १८-२२ महिने पिल्ले आई सोबत राहतात. हिमबिबट्या मांजरी सारखे आवाज काढतो व गुरगुरतो, पण त्याला वाघ-सिंहांसारखी डरकाळी फोडता येत नाही. प्रॅटरच्या नोंदींनुसार हिमबिबट्याची लांबी ६ फूट ३ इंच ते ६ फूट ८ इंच असते, ज्यामध्ये शेपटीची लांबी ३ फूट असते. हिमबिबट्याचे नाक छोटे असते, तर कपाळ मोठे असते.

संवर्धन - हिमबिबट्या पर्वतीय क्षेत्रातील अन्नसाखळीवर नियंत्रण ठेवतो. तुरळक वाढणाऱ्या वनस्पतींचा तृणभक्षी प्राण्यांकडून समूळ नाश होऊ नये यासाठी त्यांची संख्या मर्यादेत ठेवण्याचे काम तो करतो. एकप्रकारे हिमबिबट्या पर्वतांचा रक्षक असून तेथील पर्यावरण संतुलनात त्याचा सिंहाचा वाटा असतो, ज्यामुळे स्थानिक परंपरांत त्याचा आदर केला जातो. आययुसीएनच्या अभ्यासानुसार हिमबिबट्याची “असुरक्षित” या प्रकारात वर्गवारी करण्यात आली आहे. इतक्या दुर्गम प्रदेशातही मानवी कृत्यांतून हिमबिबट्या व त्याच्या अधिवासाची हानी होऊ लागली आहे. मंगोलियासारख्या देशात खाणकामामुळे स्थानिक अधिवासाला धक्का पोहोचतो आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तान सारख्या देशांत राजकीय अस्थिरता असल्याने नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. शिकारीमुळे नैसर्गिक भक्ष्याच्या संख्येत घट झाली की पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता बळावते. शिवाय कातडी व शरीरातील विविध अवयवांसाठी हिमबिबट्याची शिकार होतेच. जागतिक तापमान वाढीमुळे त्याचा बर्फाळ अधिवास आक्रसत चालला आहे. परंतु हिमबिबट्या संवर्धनात कार्यरत असलेल्या स्नो लेपर्ड ट्रस्टचे वरिष्ठ प्रादेशिक पर्यावरणशास्त्रज्ञ, डॉ. कौस्तुभ शर्मा यांच्या मते सकारात्मक बदल होत आहेत. डॉ. शर्मा, जे आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या व परिस्थितीकी संरक्षण कार्यक्रमाचे समन्वयक सुद्धा आहेत, म्हणतात, “हिमबिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न आज स्थानिक लोकांना सोबत घेऊन सुरु आहेत. त्यामुळे विविध धोके असूनही या रुबाबदार प्रजातीचे संवर्धन यशस्वी होऊ लागले आहे.”

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link