Next
माझ्यात आणि सुमीमध्ये खूप साम्य
प्रतिनिधी
Friday, July 19 | 03:00 AM
15 0 0
Share this story


‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून तू छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. या मालिकेचा अनुभव कसा आहे?
मालिका करण्याच्या आधी ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याआधी लहान मोठी कामं केली होती. परंतु खरी ओळख मला ‘मिथुन’ या चित्रपटातून मिळाली. हा चित्रपट केल्यानंतर सर्व लक्ष पदवीच्या अभ्यासावर केंद्रित केलं होतं. त्यामुळे त्या काळात फार काम केलं नाही. परीक्षा झाल्यानंतर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली. खरं तर छोट्या पडद्यावर काम करण्याचा मी कधी विचार केला नव्हता. मात्र मालिकांत काम करण्याचा अनुभव घेऊन पाहू, असा विचार करून मी ऑडिशन दिली होती. त्यात माझी निवड झाली आणि मालिका मिळाली. छोट्या पडद्यावर काम करणं तितकंच आव्हानात्मक आहे. मालिका प्रेक्षकांना रोज बघता यावी, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ही मेहनत घेणं देखील मी छान एन्जॉय करत आहे.

या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
‘लागीरं झालं जी’ मालिकेमध्ये एका छोट्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिली होती. परंतु काही कारणांमुळे ती भूमिका मला करता आली नाही. त्यानंतर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेसाठी ऑडिशन दिली. ऑडिशन झाल्यानंतर  लगेचच एका आठवड्यात मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाल्याचा निरोप मिळाला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘झी मराठी’च्या नवीन मालिकेतील प्रमुख भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी नक्कीच सुवर्णसंधी होती.

या मालिकेतील तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांग.
‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत मी सुमी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सुमी ही खूप गोड मुलगी आहे, ती चंचल आहे, तिला पटकन राग येतो, तिला खोटं बोललेलं आवडत नाही. पहिल्यांदा सुमीबद्दल, तिच्या स्वभावाबद्दल सांगितलं तेव्हा माझ्याबद्दल कुणी सांगत आहे असं वाटलं. कारण जशी सुमी आहे, तशीच मी देखील आहे. अमृता आणि सुमीमध्ये खूप साम्य आहे. त्यामुळे जेव्हा ही व्यक्तिरेखा करू लागले तेव्हा मी वेगळं काहीच करत नव्हते. मी जशी वागते, बोलते तशीच सुमीही आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा माझ्याचसाठी आहे, याची जाणीव मला झाली. सुमी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडू लागली आहे, याचा आनंद आहे.  

तुला या व्यक्तिरेखेसाठी काही खास मेहनत घ्यावी लागली का?
खरं तर सुमीचा आणि माझा स्वभाव सारखा आहे. त्यामुळे ती साकारताना फार त्रास झाला नाही. मात्र ही सुमी गावाकडची असल्याने तिचं बोलणं आत्मसात करायला नाही म्हटलं तरी मला मेहनत घ्यावी लागली. ‘लागीरं झालं जी’ ही मालिका संपत आली होती आणि  लगेचच ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेचं चित्रीकरण सुरू करायचं असल्यानं माझ्याकडे फार वेळ नव्हता. मी कोल्हापूरची जरी असले तरी म्हशी किंवा शेणाशी माझा कधीच संबंध आला नाही. मात्र मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये मला म्हशी हाकायच्या होत्या. तयारीसाठी मला एक दिवस दिला होता. प्रोमो शूट व्हायच्या आधी गावात असलेल्या महिला आणि मुलींना भेटून त्या म्हशी कशा हाकतात, त्यावेळी त्यांची देहबोली कशी असते याचे निरीक्षण केले. त्यानंतर मी तो प्रोमो शूट केला…अर्थात या सगळ्या प्रक्रियेत शिकायला खूप मजा आली.  

प्रोमोनंतर कशा प्रतिक्रिया मिळाल्या?
जेव्हा मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झाला तेव्हा मी आणि घरचे नि:शब्द झालो. प्रोमो रिलीज झाला त्या दिवशी घरीच होते. त्या प्रोमोमध्ये पाहून माझ्या आणि आईच्या डोळ्यांतून पाणी आलं. प्रेक्षकांकडूनही खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. प्रेक्षकांना मालिकेचा प्रोमो प्रचंड आवडला. तो संपूर्ण दिवस प्रोमो आवडल्याचे फोन आणि मेसेज येत होते. काहींनी तर त्या प्रोमोचे फोटो काढून पाठवले आणि मला विचारले की ही नक्की तूच आहेस का…‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमुळे सुमी ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. आता ती त्यांच्या मनात पोहोचायला हवी यासाठी मी १०० टक्के प्रयत्न करत आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link