Next
मी अलका
अलका कुबल-आठल्ये
Friday, April 05 | 04:00 PM
15 0 0
Share this storyमी एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी. आई पालिकेत शिक्षिका आणि वडील टाटा मिलमध्ये पर्यवेक्षक आणि आम्ही चार भावंडं. गोरेगावच्या टीचर्स कॉलनीच्या चाळीत आमचं घर होतं. सकाळी आईवडील कामावर आणि भावंडं शाळेत गेली की मी घरी एकटीच असायचे. माझी शाळा दुपारी असायची. आई सकाळीच सगळ्यांचं करून कामावर जायची. माझं आटोपलं की मी रेडिओवरचे कार्यक्रम ऐकायचे. तेव्हा मनोरंजनाचे दुसरे काही पर्याय नसायचे. रेडिओवर लागणाऱ्या गाण्यांवर नृत्य करणं किंवा चाळीतील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणं मला आवडायचं. त्यामुळे लहानपणापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांची गोडी लागत गेली.
एकदा आईचे काका बाबूराव मुंडरकर यांच्याबरोबर मी साहित्यिक भाऊ पाध्ये यांच्याकडे गेले होते. सात-आठ वर्षांची होते त्यावेळी. आपण लहान मुलांना सहजच काहीतरी विचारतो तसं भाऊ पाध्येनी मला विचारलं, ‘अलका, तुला डान्स करता येतो का ग?’ त्यावर ‘हो’ असं उत्तर देऊन मी त्यांना लगेच डान्सही करून दाखवला आणि गाणंही म्हणून दाखवलं होतं. माझा तो उत्साह पाहून ते आजोबांना म्हणाले, ‘नटसम्राट नाटकात एका लहान मुलीची आवश्यकता आहे. हिला तुम्ही पाठवून बघा.’ त्याप्रमाणे मला तिकडे घेऊन जायचं ठरलं. माझी चाचणी घेण्यात आली आणि थेट निवड होऊन तालीमच सुरू झाली. दादा गोडकर माझी तालीम घेऊ लागले. तीन-चार दिवस तालीम आणि थेट शिवाजी मंदिरला प्रयोग. कारण तेव्हा ते नाटक चालूच होतं. आधी जी मुलगी ती भूमिका करायची ती उंच दिसायला लागली होती म्हणून नाटकवाले दुसरी मुलगी शोधत होते. मुळात ठमी ही जी भूमिका होती, ती सात-आठ वर्षांच्या लहान मुलीची असल्यानं काम करणाऱ्या मुलीची उंची वाढली की ती बदलली जायची... अशी त्या नाटकातील मी तिसरी ठमी होते.
एकीकडे ते नाटक जोरात सुरू होतं. डॉ. लागूंनी ते एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं. मी जेव्हा त्या नाटकात गेले तेव्हा दत्ता भट, शांता जोग, कृष्णकांत दळवी असे मोठे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते. मला त्या वयात हे कळतही नव्हतं की मी किती मोठ्या लोकांबरोबर काम करतेय! पण मला त्यात काम करायला खूप आवडायचं. आजही शिवाजी मंदिरला झालेला तो पहिला प्रयोग आठवतोय. नाट्यगृह प्रेक्षकांनी भरून गेलं होतं. मला या सगळ्याची सवय नव्हती, पण पहिल्या प्रयोगापासून मला ते नाटक खूप आवडत गेलं. ही सगळी पार्श्वभूमी सांगण्यामागचं कारण हे, की लोकांना वाटतं माझं करिअर हे रडुबाई म्हणूनच सुरू झालं, पण तसं नाहीये. बालकलाकार म्हणून मी खूप वर्षं काम केलं. माझी सुरुवात चित्रपटांपासून नाही तर रंगभूमीपासून झालेली आहे. चित्रपटातील सोशिक नायिकेचा शिक्का खूप पुढे बसला. हा जो नाटकाचा काळ मी सांगते आहे तो १९७३चा. ‘नटसम्राट’ हे नाटक मी १९७३ ते ७५ या काळात अभ्यास, शाळा सांभाळून केलं. माझी आई सतत माझ्याबरोबर असायची. तिचे खूप कष्ट आहेत मी घडण्यामागे. तर त्या माझ्या पहिल्या प्रयोगाला मी लोकांची गर्दी बघून घाबरले होते. माझी एन्ट्री झाली आणि मी घाबरून पटकन चुकीचं वाक्य बोलून गेले. आता मी काही सराईत कलाकार नव्हते त्यामुळे चुकल्यावर लगेचच मी, ‘नाही नाही सॉरी’ असं बोलले आणि प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. दत्ता भट मग मला हळूच, “बोल बोल पुढचं बोल’ असं म्हणाले आणि त्यांनी ती वेळ सावरून नेली. अशा पद्धतीने व्यावसायिक रंगभूमीवरची ती माझी पहिली एन्ट्री होती. पुढे मी त्या नाटकाचे अडीचशेहून अधिक प्रयोग केले.
नाटक करत असताना शाळेतला पहिला नंबर मी कधीही सोडला नाही. आई शिक्षिका असल्यामुळे माझ्या अभ्यासावर तिचं बारीक लक्ष असायचं. मला नाटक आवडू लागलं होतं तरी त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर कधी झाला नाही त्यामुळे आईनंही मला नाटकापासून कधी तोडलं नाही. अभ्यासाची गोडी मला पहिल्यापासून होतीच. ‘नटसम्राट’नंतर मी त्याच नाट्यकंपनीच्या ‘संध्याछाया’ नाटकात बालकलाकार म्हणून काम केलं. विजया मेहता आणि माधव वाटवे त्या नाटकात होते. त्याचेही मी जवळपास शंभरेक प्रयोग केले. माझ्या सुदैवानं मला या क्षेत्रातील दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची, त्याचं काम जवळून पाहण्याची संधी अगदी पहिल्या प्रयोगापासून मिळाली. ते सगळं मी टिपत गेले. त्यानंतर बालकलाकार म्हणून माझं तिसरं नाटक होतं ते ‘वेडा वृंदावन’ नावाचं. यशवंत दत्त आणि नयनतारा यांची त्यात प्रमुख भूमिका होती. माझी भूमिका छोटी होती. त्याचेही मी शंभर-सव्वाशे प्रयोग केले. ‘नटसम्राट’ काय किंवा ‘संध्याछाया’ काय... ही सगळी नाटकं मी शंभर ते सव्वाशे वेळा पूर्ण पाहिलेली आहेत. माझं काम झाल्यावर मी नाटक संपून पडदा पडेपर्यंत विंगेतच बसून राहायचे. त्यामुळे या नाटकांचे संस्कार खोलवर रुजले आहेत.
मी नाटकाच्या दौऱ्यांनाही जायचे. ‘वेडा वृंदावन’ नाटकाचा एकदा कोकणदौरा होता. कोकणात रात्री उशिरा नाटक सुरू व्हायचं आणि मध्यरात्री संपायचं. त्या नाटकात माझी एन्ट्री दुसऱ्या अंकात होती. कोकणातल्या अशाच एका प्रयोगाच्या वेळी मी ग्रीनरूममध्ये चक्क झोपून गेले. थंडीचे दिवस होते. मला खूप थंडी वाजत होती म्हणून नयनतारा यांच्या साड्या गुंडाळून घेतल्या आणि त्यात मला झोप लागली. तिकडे माझ्या एन्ट्रीची वेळ झाली तरी मी दिसेना म्हणून म्हणून शोधाशोध सुरू झाली. बरंच शोधल्यावर नयनतारा यांना मी त्यांच्या खोलीत त्यांच्या साड्यांखाली झोपलेली दिसले. त्यांनी मला उठवलं आणि मग मी स्टेजवर गेले, पण मी झोपेतच होते. ती फजिती माझ्या जशी स्मरणात राहिली तशीच त्यांच्याही कायम स्मरणात राहिली. नाटकांमुळे हे सगळे मोठे मोठे कलाकार मला पाहता आले, त्यांच्याबरोबर काम करत गेले आणि अभिनयाचं बाळकडू मिळत गेलं. यातूनच मग पुढे जाऊन आपण अभिनेत्रीच व्हायचं हे पक्क झालं. त्यानंतर माझा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो एका गाजलेल्या हिंदी चित्रपटातून. ही कथा सांगते पुढच्या भागात.
                       
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link