Next
पुन्हा नवी पहाट, नवी वाट
डॉ. सलील कुलकर्णी
Friday, March 29 | 04:00 PM
15 0 0
Share this story


मनाची दारं, खिडक्या उघड्या ठेवल्या तरच योगायोगाचे पक्षी येऊन तुमच्या खांद्यावर बसतील. कुणी सांगावं, त्यातला एखादा पक्षी तुमची कायमची ओळख होऊन जाईल.
डॉक्टरी शिकलो आणि एका वळणावर नावाच्या मागे, संगीतकार-गायक लागलं; अगदी सहज म्हणून लिहिलं आणि ‘लपवलेल्या काचा’ व ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ या माझ्या दोन्ही पुस्तकांना दाद देऊन तुम्ही मला ‘लेखक सलील’ बनवलं.
परीक्षण, सूत्रसंचालन - ज्या ज्या पद्धतीनं व्यक्त व्हावंसं वाटलं तिथे जीव तोडून व्यक्त झालो आणि तुम्हीसुद्धा प्रत्येक प्रयत्नाला आशीर्वाद दिलेत. संगीत मात्र चालूच आहे श्वासासारखं. ते जगणंच झालं आहे. ‘हे गजवदन’सारखी रचना गायला जेव्हा एका फोनवर, एका मेसेजवर मराठीतले जवळजवळ सगळे गायक, वादक, संगीतकार, रेकॉर्डिस्ट आले तेव्हा ते पाहून खूप भरून आलं. गेल्या वीस वर्षांत आपण आपल्या क्षेत्रात काय कमावलं... तर हे!
आनंद शिंदेंच्या ‘मला उडू उडू झालंया’पासून माझा बालमित्र आनंद भाटेबरोबर केलेला ‘येई गा विठ्ठला’ आणि कौशिकी चक्रवर्ती, महेश काळे यांच्या ‘गायेजा’ या रागमालेपासून बोरकर, कुसुमाग्रजांच्या कवितांपर्यंत, संगीताच्या वाटेवर आनंद मिळतोच आहे. तो अविभाज्य भाग आहे माझ्या जगण्याचा, माझ्या ‘असण्याचा’ आणि असेलच. आता तंत्र बदलत जाताहेत. कॅसेट, सीडी ते ऑनलाइन म्युझिक!
गेल्या दोन वर्षांत बदललेल्या तंत्राला सामोरं जाताना, कवितेपासूनचा गाण्यापर्यंतचा प्रवास उलगडणारी ‘कवितेचं गाणं होताना’ ही वेबसीरिज केली. त्यानंतर माझा मित्र राजेश गाडगीळ याच्या प्रोत्साहनातून ‘अभिजात’ हा प्रकल्प उभा केला. हे प्रकल्प करताना जाणवू लागलं, की कॅमेरा, एडिटिंग आपल्याला आवडतंय. नवीन नवीन ठिकाणी जाऊन गाणी चित्रित करताना अनेक गोष्टी सुचत होत्या. एकीकडे माझ्या पुस्तकातल्या गोष्टींवर अनेक मंडळी शॉर्ट फिल्म करत होते. आपणही पूर्ण लांबीचा चित्रपट करायचा हे खरं तर तीन-साडेतीन वर्षांपूर्वी मनात आलं होतं, पण एक नक्की होतं की सिनेमासाठी आजपर्यंत न झालेला विषय असावा आणि तोसुद्धा आपल्या आसपासचा, सोपा विषय असावा.
अतिशय संवेदशील, गुणी व्यक्तीला जर योगायोगानं किंवा नाइलाजानं एखादी अत्यंत उथळ गोष्ट करावी लागली, तर त्यातून निर्माण होणारे विनोद असं काहीसं डोक्यात होतं. अचानक एक दिवस यूट्यूबवर खूप सारे प्री-वेडिंगचे व्हिडिओ दिसले आणि मग एका क्षणात गोष्ट सुचली. एका संवेदशील दिग्दर्शिकेची गोष्ट, जिला नाइलाजानं एक मोठ्ठी प्री-वेडिंग फिल्म करावी लागते. मग ही वैतागलेली मुलगी नेमकं काय मिळवते, काय शिकते, तिच्या मनातल्या गाठी सुटतात का?  तिला भेटणारी वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं, त्यातून होणारे विनोद आणि धमाल अशी ही गोष्ट आहे. एकही दुष्ट व्यक्तिरेखा नसलेली, सरळ-स्वच्छ विनोद असलेली, मी माझ्या आई आणि मुलीबरोबर बसून बघू शकेन अशी ही सिनेमाची गोष्ट मी लिहिली आहे.
सुमारे ४५ चित्रपटांचं संगीत केल्यामुळे पटकथा हा फॉर्म खूप वाचला होता, पण ही पटकथा लिहिण्याआधी आवडत्या चित्रपटाच्या पटकथा पुन्हा एकदा वाचल्या. मला नेहमी असं वाटतं, की पुढची पिढी काय विचार करते हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजमधला, माझ्यापेक्षा निम्म्या वयाचा माझा मित्र निहार भावे याला बरोबर घेऊन मी पटकथा आणि संवाद पूर्ण केले. काही प्रकल्पाची कुंडलीच चांगली असते, असं मला नेहमी वाटतं. निर्माते म्हणून माझे अमेरिकेचे मित्र अरुंधती दाते, अनूप निमकर, अतुल आठवले व मोहित चिटणीस आणि पुण्यातले देवेंद्र घोडनदीकर माझ्या पाठीशी उभे राहिले. मग माझी भेट झाली ती या चित्रपटासाठी मला लाभलेल्या दोन सर्वात महत्त्वाच्या माणसांशी - कार्यकारी निर्माता नितीन वैद्य आणि माझी जुनी मैत्रीण व सर्वात आवडती अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्याशी. या दोघांनीही माझ्या कथेला इतकी उत्स्फूर्त दाद दिली, की माझा आत्मविश्वास दुणावला. मुक्तानं तिचा सहभाग पक्का केल्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून एक ड्रीम कास्ट लिहिली आणि सुदैवानं त्यातले सगळेच म्हणजे भाऊ कदम, शिवाजी साटम, प्रवीण तरडे, सुनील बर्वे, अलका कुबल, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ, ऋचा इनामदार आणि मुक्ता बर्वे असे पक्के झाले आणि मग तयार झाला - ‘वेडिंगचा शिनेमा.’
पुन्हा एक नवीन भूमिका, एक नवीन दिशा, एक नवीन पहाट, नवी वाट, पुन्हा एकदा हुरहूर आणि पुन्हा एकदा नवा उत्साह!
परवा शाळेतला मित्र गमतीनं म्हणाला, “तुझं कधी ठरणार आहे मोठेपणी तू कोण होणार ते!” मी म्हणालो, “काय माहीत? सध्या तरी डॉक्टर, लेखक, गायक-संगीतकार, दिग्दर्शक आहे.” लगेच त्याच्याकडून प्रश्न आला, “तुला स्वतःला, तू काय म्हणून सगळ्यांत जास्त आवडतोस?” उत्तर अगदी सोपं होतं. खूप मनापासून मजा तर येते हे सगळंच करायला. समाधान मिळतं, रसिकांचं प्रेम मिळतं, पण मला मी सगळ्यांत जास्त आवडतो तो शुभंकर आणि अनन्याचा बाबा म्हणून.
(समाप्त)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link