Next
‘बारोट हाऊस’ : निरागस विश्वाची काळी बाजू
अमोघ पोंक्षे
Friday, August 09 | 03:45 PM
15 0 0
Share this story

आपल्या समाजात लहान मूल म्हटलं की त्याचा किंवा तिचा कायम सहानुभूतीपूर्वक विचार होतो. चांगली किंवा वाईट कुठलीही परिस्थिती असली तरी लहान वयातील मुलांकडे कायम भविष्यातील उमेद म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. लहान वयात एखादा मोठा गुन्हा केलेल्या मुलालासुद्धा अतिशय संवेदनशील चष्म्यातून आजही आपला समाज पाहतो. परंतु आजच्या फास्ट इंटरनेटच्या काळात लहान मुलांना कमी वयात मिळणारी नको एवढी माहिती आणि चुकीच्या समजुतीतून आलेली मॅच्युरिटी अर्थात परिपक्वता एक समाज म्हणून आपल्याला किती धोकादायक वळणावर घेऊन आली आहे, याचं अतिशय हृदयद्रावक चित्रण ‘बारोट हाऊस’ या ओरिजिनल फिल्ममध्ये केलं आहे.
‘बारोट हाऊस’ ही गोष्ट आहे अमित आणि भावना बारोट यांच्या कुटुंबाची. टॅक्सी सर्व्हिसच्या व्यवसायाचा पसारा वाढवून एका तान्ह्या बाळासोबत, दोन लहान मुली, एक मुलगा, बायको, आई आणि सख्ख्या भावासह अमित बारोट आपलं आयुष्य अतिशय आनंदात घालवत असतो. परंतु या बारोट कुटुंबाला ग्रहण तेव्हा लागतं जेव्हा त्या कुटुंबात अमितच्या दोन लहान मुली श्रेया आणि श्रुतीची हत्या होते. याचदरम्यान संशयाची सुई अमितच्या व्यसनाधीन भावासह बारोट कुटुंबाचे शेजारी असलेल्या अँथोनी यांच्यापर्यंत जाऊन पोचते. मात्र काही काळानं अँथोनी यांचा मुलगा रोशनचीही हत्या झाल्यानं हा संभ्रम अधिक वाढतो. असं असलं तरी प्रेक्षक म्हणून आपल्याला मात्र यामागील खऱ्या अल्पवयीन सूत्रधाराची माहिती आधीच मिळालेली असते. त्या अल्पवयीन सूत्रधाराचं नाव जाणूनबुजून इथे सांगत नाहीय नाहीतर चित्रपट पाहताना कुठलीच उत्सुकता आपल्याला राहणार नाही. अल्पवयीन गुन्हेगार रोशनच्या हत्येनंतर पकडला जातो आणि त्याची रवानगी बालसुधारगृहात होते.
अतिशय सराईत गुन्हेगाराप्रमाणे तो अल्पवयीन गुन्हेगार बालसुधारगृहातील मानसोपचारतज्ज्ञांची दिशाभूल करत या हत्यांमागे अमित बारोटच असल्याचं त्यांना पटवून देतो. त्यानंतर अमित बारोट याला पोलिस बेड्या ठोकतात आणि त्या अल्पवयीन गुन्हेगाराची सुधारगृहातून सुटका होते. आता या हत्येच्या आरोपात गोवला गेलेला अमित त्यातून बाहेर येतो का? त्या अल्पवयीन गुन्हेगाराचा खरा चेहरा सर्वांसमोर येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक म्हणून आपल्याला मिळालेली चांगली.
हा चित्रपट सत्यघटनांवर आधारित असल्यानं एक कल्पनात्मक गोष्ट म्हणून या गोष्टीला सोडून देण्याचा वेडेपणा एक प्रेक्षक म्हणून आपण शेवटपर्यंत करू शकत नाही. म्हणूनच हा चित्रपट संपल्यानंतर आपोआप आपण एक संवेदनशील प्रेक्षक म्हणून या गोष्टीमागील खऱ्या केसची माहिती घेण्यासाठी गुगलकडे मदत मागायला जातो. मला वाटतं की हेच या चित्रपटाचं खरं यश म्हणायला हवं.
चित्रपटातील भूमिकांविषयी बोलायचं तर अमित साध, मंजिरी फडणीस यांच्यासोबत सगळ्यात जास्त कौतुक करायला हवं मल्हारच्या भूमिकेत असलेल्या आर्यन मेंघजी या बालकलाकाराचं ! नेटफ्लिक्सवरील ‘१५ ऑगस्ट’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाबा’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा  आर्यन हा बालकलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ओ.टी. टी.वर दाखल झाला आहे. हा भयपट असला तरी संजीव झा यांनी लिहिलेली कथा, पटकथा आणि संवाद या गोष्टीला अगदी सहज सत्याची किनार देऊन जातात. बग्स भार्गवा कृष्णा यांचं उत्तम दिग्दर्शन, दीप मेतकर यांचं उत्कृष्ट छायांकन, अक्षरा प्रभाकर आणि अभिषेक गुप्ता यांची संकलक म्हणून योग्य ठिकाणी चाललेली कात्री हीसुद्धा चित्रपटासाठी जमेचीच बाजू म्हणायला हवी.
लहान मुलं इतक्या नियोजनबद्ध पद्धतीनं गुन्हे करू शकतात का, असा प्रश्न प्रेक्षक म्हणून आपल्याला बारोट हाऊस बघताना पडत असला तरी आजच्या २१ व्या शतकात निरागस मुलांच्या भावविश्वापलीकडे जाऊन त्यांच्या प्रत्येक कृतीचं आकलन करून घेऊन पालकांनी सजग राहणं किती महत्त्वाचं आहे हा मुद्दा ‘बारोट हाऊस’च्या निमित्तानं प्रेक्षकांच्या मनात खोलवर अधोरेखित होतो हे मात्र निश्चित!

बारोट हाऊस
प्लॅटफॉर्म    :     झी ५
कलाकार    :    अमित साध, मंजिरी फडणीस, आर्यन मेंघजी
लेखन    :    संजीव झा
दिग्दर्शन    :    बग्स भार्गवा कृष्णा
------------------------------------------------------------------------


माध्यम एक... भाषा अनेक...


वे ब सीरिज किंवा वेब मूव्हीज हे माध्यम जरी नवे असले तरी त्याची व्याप्ती दिवसागणीक वाढतच चाललेली आहे. भारताचा विचार केला तर आपल्या देशात भाषानुरूप प्रांतरचना आहे. चित्रपटसृष्टीवर जरी बॉलिवूडचा वरचष्मा असला तरी प्रादेशिक चित्रपटही लोकांची मने जिंकताना दिसत आहेत. हाच ट्रेंड वेब सीरिजचे नवे विश्व आजमावताना दिसत आहे. विविध ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म्स हिंदी आणि इंग्रजीसह प्रादेशिक भाषांतील आणि त्या मातीतील गोष्टींना प्राधान्य देऊन नव्या वेब सीरिज या नव्या मनोरंजनविश्वात घेऊन येत आहेत. या प्रादेशिक वेब स्पर्धेत झी ५, एम. एक्स. प्लेयर आणि हॉटस्टार यांच्यात चुरस आहे.
एम.एक्स.प्लेयर या प्लॅटफॉर्मवर ‘डू नॉट डिस्टर्ब’ नावाची एक गुजराती वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. तर यापूर्वी ‘एफ बडीज’ नावाची एक तमिळ वेब सीरिजही प्रदर्शित झाली होती. हॉटस्टारचा विचार केला तर ‘हॉटस्टार स्पेशल’च्या अंतर्गत प्रदर्शित झालेल्या सर्व वेब सीरिज या हिंदीसह मल्याळम, मराठी, बंगाली, तेलगू, कन्नड, तमिळ या भाषांमध्ये ध्वनिमुद्रित केलेल्या आहेत.
‘झी ५’नेसुद्धा प्रादेशिक भाषेतील वेब सीरिजवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच आलेल्या ‘हुतात्मा’ या मराठी वेब सीरिजला हिंदी, मल्याळम, तेलगू, बंगाली, तमिळ या भाषांमध्ये ध्वनिमुद्रित केले होते. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येत्या १५ ऑगस्टला ‘गोंद्या आला रे’ ही नवी मराठी वेब सीरिज ‘झी ५’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये चापेकरबंधूंनी पुण्यातील लोकांवर अमानवी अत्याचार करणाऱ्या इंग्रज अधिकारी डब्ल्यू. सी. रँड याला मारण्याचा कट कसा रचला आणि ही योजना कशी अमलात आणली याची चित्तथरारक कथा यातून सांगितली आहे. प्रत्येक भाषेतील आपला बाज जपत लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सर्वच ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म्स मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे माध्यम जरी एक असले तरी आपली भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य हे प्लॅटफॉर्म्स देत असल्याने अधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा नवा मार्ग निर्मात्यांना सापडला आहे. यामुळे भविष्यात मनोरंजनाची नवी दारे प्रेक्षकांसाठी खुली होतील यात काही शंका नाही.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link