Next
‘च’ची भाषा
डॉ. राजेंद्र बर्वे
Friday, January 18 | 03:00 PM
15 0 0
Share this story“पण तू का फोन उचलत नाहीस? माझे एवढे मिस्ड कॉल्स तुला दिसले नाहीत का? तुझं हे नेहमीचं आहे. तू कधीच माझं काहीच ऐकत नाहीस,” ती म्हणते.

तो    :    अगं, तसं नाही. मी तुलाच फोन करणार होतो. कामात होतो, मीटिंगमध्ये! फोन कसा घेणार? पण हे काय तुझं? नेहमीच फोन घेत नाहीस, मिस्ड कॉल्स कधीच बघत नाहीस आणि तुझं काहीच ऐकत नाही, असे आरोप चालूच!

ती    :    ते काहीच समजतच नाही. तूच नेहमीच तसाच चुकीचाच अर्थ काढतोसच. (प्रत्येक ‘च’वर जोर लावून उच्चार!)

तो    :    ही काय ‘च’ची भाषा लावली आहेस? तुला काहीच कळतच नाही का?

ती    :    कसली ‘च’ची भाषा? तू काहीतरीच भलतंच काढूनच माझ्याशी बोलायचंच ठरवलंयस का?

तो    :    पुन्हा ‘च.’

ती    :    तू नेहमीच मलाच रडायला लावतोस. इतरांना कसं दरवेळीच चांगलंच वागवतोसच.

तो    :    पुन्हा ‘च.’

मित्रहो, फोनवरचं किंवा प्रत्यक्षातलं बोलणं तुम्ही ऐकलं असेल ना कधीतरी? काही जण बोलताना अनेकदा प्रत्येक शब्दाशेवटी ‘च’ लावून बोलतात. मराठीतला हा ‘च’ इंग्रजीमध्ये कधी ‘ऑल्वेज’, ‘नेव्हर’, ‘मस्ट’ या शब्दांतून व्यक्त होतो. कुठून येतो हा ‘च’?

‘च’ची भाषा मनातल्या म्हणजे अंतर्मनातल्या भीतीपोटी जन्माला येते. या संवादातली ‘ती’ चिडलेली आहे. ती आपल्या मित्राकडून काही गोष्टी मागते आहे. ती बोलते आहे. तेव्हा असं वाटतं की ‘मेरी मांगे पुरी करो, नहीं तो जगह (मेरी दिल की) खाली करो!’ असा फलक घेऊन त्याच्यावर मोर्चा घेऊन येते आहे.

तिच्या मनात खोलवर दडलेलं भय ‘च’मधून व्यक्त होतं. असे ‘ती’ आणि ‘तो’ अनेक ठिकाणी भेटतात. कधी त्यांची ‘उमर सोलह बाली उमर’ असते तर काही ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ म्हणत शादीशुदा झालेले असतात.

एकुणात, सर्व वयांमध्ये खोल वयातली भीती कुठे ना कुठे व्यक्त होत असते. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा जोर देतो, ‘माझा फोन घेतलाच पाहिजे’, ‘माझं ऐकलंच पाहिजे’ असं म्हणतो, तेव्हा त्यामागे कोणते अनुच्चारित शब्द आणि विचार असतात? कोणत्या भावना पोचवायच्या असतात? तू फोन घेतला नाहीस, माझ्या इच्छेप्रमाणे वागला/वागली नाहीस, तुझं माझ्यावर प्रेम‘च’ नाही’ आणि मला ते प्रेम मिळायला(च) हवं. मला हवं तसं प्रेम मिळालं नाही, तर मला फार म्हणजे फार(च) एकटं वाटेल. एकटं वाटलं तर मला फार(च) फ्रस्ट्रेटेड वाटेल. मला कधीच तसं वाटायला नकोय. सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या तरच मी सुखी होईन.

स्वत:विषयीच्या या भावना असुरक्षितता, राग आणि त्यामुळे वाटणारे नैराश्य (फ्रस्ट्रेशन) यांमुळे मनात दडलेल्या असतात. आपल्या मनासारखं न घडल्यास वाटणारं दु:ख आणि राग सहन करण्याची ताकद आपल्या मनात आता राहिलेली नाही. ‘आय वाॅण्ट अॅण्ड आय वॉण्ट इट नाऊ!’ या गाण्याच्या शब्दांतून स्वत:विषयीचा अट्टहास व्यक्त होतो. यातून आपण इतरांकडून तशा अपेक्षा ठेवतो. माझ्या ‘मागण्या’ ही आज्ञा समजून त्याचं पालन कर, केलंच पाहिजे- असं नकळत सुचवतो. अनेकदा या मागण्या अवास्तवतेकडे झुकलेल्या असतात. त्या अव्यावहारिक असतात. त्यामुळे त्या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. संवादातील ‘ती’ अशा अवास्तव गोष्टी गृहीत धरून बसली आहे, म्हणून प्रत्येक वाक्यात ‘च’चा भडिमार करते. तेही तिच्या नकळत!

काय करावं अशा वेळी? तिनं आणि त्यानं? कशी हँडल करावी ती परिस्थिती? मित्र हो, या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी. ‘लगेचच सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेतच’ असं मात्र म्हणू नका. मी आहे ना इथे! आज फक्त ‘च’ची जाणीव ठेवा, इतकंच!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link