Next
आदित्यशक्तिप्रदर्शन
कृष्णात पाटील
Friday, October 04 | 01:00 PM
15 0 0
Share this story


वाजत-गाजत, मराठमोळ्या वातावरणात, भगवे ध्वज उंचावत, मच्छीमार महिलांच्या उपस्थितीत, तुताऱ्या फुंकत शिवसेनेचे युवानेते आदित्य उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. युतीतील मोठा भाऊ भाजपचे बाहू फुरफुरत असतानाच, आपल्या आदित्यशक्तीचं प्रदर्शन करण्याची संधी यानिमित्तानं शिवसेनेनं साधली. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या राजकारणात उतरली... मराठी माणसाचे हक्क आणि हिंदुत्व यांना अर्धविराम देऊन, युवापिढीसाठी कॉर्पोरेट बाण भात्यात घेऊन... सर्व भाषाभगिनींना आपलंसं करत!
आदित्य उद्धव ठाकरे... वय २९ वर्षं... मोठं राजकीय घराणं असूनदेखील निवडणूक लढवण्यासाठी तसा उशीरच केला म्हणायचा... कारण देशातील तसंच राज्यातील अनेक राजकीय घराण्यांतील वारसदार निवडणूक लढण्यासाठीची वयाची पात्रता पूर्ण होण्यापूर्वीच मतदारसंघ निवडून मोकळे होतात आणि निवडणूक लढवण्याची तयारी करतात. ठाकरे घराणं पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात कुणीच उतरलं नव्हतं. याला आता अपवाद ठरलेत ठाकरे घराण्यातील तिसरी पाती आदित्य ठाकरे.
 आजोबांचा जहाल मराठी बाणा आणि प्रखर हिंदुत्व, त्यानंतर वडिलांनी ‘मी मुंबईकर’ अभियान राबवत हिंदुत्वमुद्द्याशी राखलेलं इमान... तिसऱ्या पिढीनं मात्र या दोन्ही मुद्द्यांपेक्षा कॉर्पोरेट तरुणाईला आपलंसं करणं, हाच अजेंडा अग्रस्थानी ठेवला आहे. आदित्य ठाकरे यांनी नमस्ते वरळीपासून हॅलो आणि केम छोपर्यंत मारलेली मजल, हे त्याचंच द्योतक ठरलंय. आदित्य यांनी गुरुवारी निवडणुकीचा अर्ज भरला, तेव्हा उद्धव यांच्याबरोबरच रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या.
नावात ठाकरे असूनही शिवसेनेच्या पारंपरिक अशा रांगड्या राजकारणाचा भाग ते कधी झालेच नाहीत, उलट शिवसेनेतील सुसंस्कृत आणि आश्वासक चेहरा म्हणूनच आदित्य समोर येताहेत.  कुठलंही भडक भाषण नाही, आक्रमकता नाही... जे काही आहे ते साधं, सरळ, सोपं... बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रं आल्यानंतर ती काहीशी मवाळ झाली असली तरी संघटनात्मक ताकदीच्या जोरावर उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. परंतु आगामी काळात मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन फार काळ राजकारणावर मांड ठोकता येणार नाही, हे आदित्य ठाकरेंनी जाणलंय. त्यामुळे ते कधीच या दोन मुद्यांवर जास्त न बोलता तरुणाईची भाषा बोलतात. बाळासाहेबांच्या काळात तयार झालेली आणि मातोश्रीवरून आलेला आदेश शिरसावंद्य मानणारी कट्टर शिवसैनिकांची ती फळी संपुष्टात येत असताना सध्याच्या तरुणाईला शिवसेनेकडे खेचण्यासाठी वेगळी आयुधं वापरण्याची गरज आदित्य यांनी ओळखलीय. रस्त्यावर उतरून लढाई करणारी शिवसेना आता राहिली नाही, तशी आता गरजही उरलेली नाही. शिवसेनेचा गाभा आहे संघटनात्मक ताकदीत. त्या गाभ्याला हात न लावता पक्षाला कॉर्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलाय. यासाठी निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेतली जातेय. लोकसभा निवडणुकीतला आदित्यसंवाद कार्यक्रम असो किंवा जनआशीर्वाद यात्रा असो, यामागची कल्पना, नियोजन, ब्रँडिंग प्रशांत किशोर यांच्या टीमनं केलं आहे. आता मातोश्रीवर बसून पक्ष चालवण्याचे दिवस गेले असून त्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्याशिवाय गत्यंतर नसल्याचंही त्यांनी जाणलंय, त्यामुळेच तर त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी वरळीतील प्रमुख विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनाच शिवसेनेत प्रवेश देऊन हा मतदारसंघ आपल्यासाठी अधिक सुरक्षित करून घेतला. ते येथून आरामात निवडून येतीलही, पण खरं आव्हान असेल ते निवडून आल्यानंतर विधिमंडळ कामकाजावर छाप पाडण्याचं. भाषणात वारंवार येणारं व्हिजन प्रत्यक्षात करूनही दाखवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
निवडणुकांचा अपवाद वगळता क्वचितच मुंबईबाहेर पडून राज्याच्या ग्रामीण भागात जाण्याची प्रथा मोडण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करताहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या १११ विधानसभा मतदारसंघात विजयी संकल्प मेळावे घेऊन शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्यानंतर पक्षात मीच असून तसं नेतृत्व रुजवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांच्याकडून या यात्रेपासून सुरू झाला. नेतृत्व करणं म्हणजे काटेरी मुकुट परिधान केल्यासारखं असतं, यशापेक्षा अपयशात नेतृत्त्वाला अधिक जबाबदार धरलं जातं. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधकांपेक्षा अधिक धोका मित्रपक्ष असलेल्या भाजपकडूनच असल्यानं भाजपच्या झंझावातापुढे शिवसेना पक्ष एकसंध ठेवण्याचं आणि तो वाढवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे राहील.
आता आदित्यशक्तीचा उदय झाला असला, तरी ती केवळ वरळीपुरती उरणार की मुंबई आणि महाराष्ट्रालाही तिचा लाभ करून देणार, हा प्रश्न आहे. सध्या तरी जुन्याजाणत्या शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार आदित्य हे केवळ वरळीपुरते प्रचारात गुंतून पडणार नाहीत. ते मुंबई आणि राज्यभरही प्रचार सुरूच ठेवतील, असा होरा आहे. भाजपबरोबरच्या जागावाटपात बदललेल्या सूत्रामुळे शिवसेनेला आता मुंबईवर आपला वरचष्मा कायम ठेवण्यासाठी झटावं लागणार आहे. आदित्य यांनी सर्वभाषिक मतदारांना खुणावत त्यावरच लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे. 

१६ कोटींचा उमेदवार
निवडणुकीच्या निमित्तानं आदित्य ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रावर जाहीर केलेली संपत्ती आहे १६ कोटी रुपयांची. त्यात साडेसहा लाख रुपये मूल्याच्या बीएमडब्ल्यू मोटारीचा समावेश आहे. सुमारे १० कोटी रुपये बँक ठेवी व खात्यांवर दाखवण्यात आले आहेत.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link