Next
जिंदगी धुएमें उडाता...
डॉ. राजेंद्र बर्वे
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story


“माझा प्रश्न असा आहे, की मला ती गोष्ट पटतेय, म्हणजे पूर्ण पटलेली नाही. पण त्यामुळे मला प्रत्यक्षात स्वत:मध्ये तो बदल करता येत नाही. प्रत्येक युक्तिवादाला माझ्याकडे प्रतियुक्तिवाद असतो. त्याचं स्पष्टीकरण मिळालं तर मला पूर्ण पटेल आणि मग त्याप्रमाणे मी माझी सवय सोडून देईन.” आपल्या प्रश्नांची अशी ओळख केल्यानंतर अभि (जित) म्हणाला, “तुम्हाला लक्षात आलंय का? मी सिगारेट ओढतो. दिवसाला दहा-वीस तरी. कमी करायची म्हटली तरी कमी होत नाही, एकदम सुटत नाही. कारण माझंच मन सोडायला हरकती घेतं.” “लक्षात आलं, आता मुद्याचं बोल.” “मला ना एक जुनं गाणं आवडतं. ते माझं स्वत:चं गाणं आहे असं वाटतं. ‘हर फिक्र को धुए में उडाता चला गया!’ ही फिलॉसॉफी मला पटते. सिगारेट न सोडण्याचं एक कारण ताणतणाव जाणवायला लागला की मी सिगारेट शिलगावतो. दुसरा मुद्दा, सिगारेट सोडली की अधूनमधून प्यायला काय हरकत आहे, असं वाटतं. कधी वाटतं आता इतकी सवय लागलीय की आता कशी सुटणार? आधीच सुटली असती तर बरं झालं असतं. कोणीतरी म्हटलं की फिल्टरवाली सिगारेट चालते. आता आणखी एक सूचना आहे. इ-सिगारेट म्हणजे बिनधुराची सिगारेट! ती ट्राय करायची आहे.”
मला सिगारेट आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते गाणं आणि...
“आणि काय?” अभि जरा थांबला आणि “म्हणजे स्टाइल का? हातात सिगारेट, डोळ्याला गॉगल असं नवतरुण दिसायला आवडतं. होय ना?” अभि हसून हो म्हणाला. “बरंय. आता तुझ्या प्रत्येक मुद्याला उत्तर शोधू.”
“जिंदगी का साथ निभाता... या गाण्यात देव अानंद सिगारेट ओढताना दाखवला तरी त्यात धुआँचा अर्थ प्रत्यक्ष धूर असा नाही. तर मी मनातल्या चिंतेला हळूच वाऱ्यावर सोडलं आणि चिंता धुरासारखी विरत गेली. तेव्हा हा अर्थ समजून घे. म्हणजे तुझ्या पहिल्या शंकेचं उत्तर मिळेल. तणावग्रस्त अवस्थेत मेंदूला उत्तेजना मिळावी म्हणून सिगारेट ओढतात. काही क्षणांपुरतीच. ‘निकोटिन’मुळे हलकं वाटतं, पण ते क्षणापुरतंच. प्रत्यक्षात हृदयाचे ठोके वाढणं, श्वास कोंदटणं या तणावाच्या शारीरिक लक्षणांत भरच पडते. तरतरी वाटल्यामुळे ते जाणवत नाही इतकंच. तरतरीसाठी मेंदूला अधिक प्राणवायू हवा असतो. तो न देता विषारी वायू देणं चूक आहे. दीर्घ श्वसनामुळे ताण हलका होतो. तेव्हा ‘पुरे हा बहाणा’ या गाण्यातले तेच शब्द योग्य ठरतात.
अधूनमधून सिगारेट घेतो असं म्हणण्याला अर्थ नाही. अशीच सुरुवात होते आणि सवय लागते. असंच व्यसनात रूपांतर होतं. संशोधनानं असं सिद्ध झालंय की स्वत:च्याच सिगारेटचा स्वतःलाच नव्हे, तर सिगारेट फुंकणाऱ्यांचा धूर दुसऱ्यालाही धोकादायक असतो. हृदयावर ताण पडतो, कारण रक्तवाहिन्या आक्रसतात. कदाचित तेच निमित्त ठरतं आणि हृदयविकाराची सुरुवात होते. अधूनमधून याची व्याख्या तू सोयीस्कररीत्या बदलतोस. दिवसातून की आठवड्यातून किंवा महिन्यातून एखादी. आपलं मन आपल्याला फसवतं. तेव्हा ‘बचके रहना रे बाबा, बचके रहना’ हे गाणं महत्त्वाचं.
शहाणपण शिकायला कधीच उशीर झालेला नसतो. सवयी मोडता येतात आणि व्यसनंही सोडता येतात. सवय अंगवळणी पडल्यानं आपण काय करतो आहोत याची जाणीव राहत नाही. सिगारेट शिलगावणं, ओढणं, राख झटकणं या क्रिया आपोआप, यांत्रिकपणे घडतात. आपल्याविषयी जागरूक राहिलो तरच व्यसनं सुटतात नि सवयी मोडतात. असं समजायचं की आपण जीवनाची गाडी चालवत आहोत. त्यात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. ‘ड्राइव्ह-सेफ’प्रमाणे जगा सावधानतेनं. उशीर झालेला नाही. हातात सिगारेट असल्यास, खिशात पाकीट असल्यास आताच फेकून दे. फिल्टरवाल्या सिगारेटमधूनही सूक्ष्म कण जातात. धूरतर आरपार जातो. फिल्टरसिगारेट हा पळवाटी युक्तिवाद आहे. धूरविरहित सिगारेटची तीच गत. इथूनतिथून तंबाखू शरीरात घुसतो तो वाईटच.
राहता राहिला प्रश्न हिरोगिरीचा, स्टाइलबाज असण्याचा. सशक्त, व्यायामानं कमावलेलं, लवचीक शरीर, डौलदार उभं राहणं, चालणं यात आत्मविश्वास दिसतो. तो दीडदमडीच्या सिगारेटनं नाही.” अभिजितला पटलं. तुम्हाला पटलं का?

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link