Next
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
संध्या काळे (संस्कार भारती)
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story


साधारण १९१० चा काळ, म्हैसूर विद्यापीठातील एम.ए. झालेल्या व नामवंत लेखक असलेल्या एका प्राध्यापकाला त्यांच्या एका मित्राने विचारले “उच्चशिक्षणासाठी आपल्याकडील बरेच जण परदेशात जातात, तुम्ही अद्याप परदेशातील पदवी घेऊन आपल्या पांडित्यावर मोहोर का उमटवली नाहीत?”. मित्रांनो, त्या काळीसुद्धा परदेशातील शिक्षणच श्रेष्ठ असा समज होता. प्राध्यापक उसळून म्हणाले “फक्त परदेशी शिक्षण घेतले की झाले! आपल्या देशात असलेले ज्ञानभांडार पाहिलेत का कधी? परदेशी ज्ञानापेक्षा आपले पुरातन ग्रंथ नक्कीच श्रेष्ठ आहेत! मी परदेशात जाईनच; पण शिकण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठीच”! आपल्या भारतीय संस्कृतीचा व ज्ञानाचा सार्थ अभिमान असणारे हे प्राध्यापक म्हणजे आपले दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक जेव्हा म्हैसूर विद्यापीठ सोडून कलकत्ता विद्यापीठात जाण्यासाठी बग्गीतून निघाले तेव्हा ती बग्गी त्यांच्या विद्यार्थ्यांनी ओढत स्टेशनपर्यंत नेली.
पुढील काळात डॉ. राधाकृष्णन यांची कोलकोत्यातील नामांकित व्याख्यानमालेतील व्याख्याने खूप गाजली. ती व्याख्याने जगभरातील वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली. त्यानंतर डॉ. राधाकृष्णन यांना इंग्लंड, अमेरिका व इतर अनेक देशांतून व्याख्याने देण्यासाठी आमंत्रणे आली. १९२६ नंतर त्यांनी विविध देशांमध्ये आपल्या ओघवत्या वाणीद्वारे भारतातील जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व श्रोत्यांना पटवून दिले. परदेशातील विद्वानांनीसुद्धा त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
“पूर्वेकडील ज्ञानगंगा पाश्चिमात्यांपर्यंत नेऊन मी शिकवण्यासाठी परदेशात जाईन” हे मित्राला आत्मविश्वासाने ऐकवलेले बोल डॉ. राधाकृष्णन यांनी खरे करून दाखवले. या भारताच्या सुपुत्राला भारतरत्न सन्मानाने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस, ५ सप्टेंबर, आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link