Next
बुद्धिबळातील उद्याचा आनंद
नितीन मुजुमदार
Friday, February 01 | 03:00 PM
15 0 0
Share this story

“हॉलंडमध्ये झालेल्या टाटा ओपन चेस मास्टर्स २०१९ या स्पर्धेत विदितने किमान सात गुण मिळवावेत, अशी माझी अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली आहे.” ही स्पर्धा संपल्या संपल्या विदितचे वडील डॉ. संतोष गुजराथी सांगत होते. ते स्वतः व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर, घरात कुठल्याही खेळांची व्यावसायिक पार्श्वभूमी नाही. वातावरण अगदी मध्यमवर्गीय. असे असताना डॉ. संतोष गुजराथी व डॉ. निकिता गुजराथी या दांपत्याने त्यांच्या मोठ्या मुलाला, विदितला बुद्धिबळात नुसतीच करिअर करायला परवानगी दिली असे नाही, तर संपूर्ण ताकदीने ते त्याच्या पाठीशी उभे राहिले. आज २४व्या वर्षी विदित जागतिक बुद्धिबळाच्या पटावर अत्यंत महत्त्वाच्या मोहऱ्यांमध्ये गणला जातोय, त्यामागे आहे त्याच्या आईबाबांचे प्रोत्साहन.
दहावीच्या परीक्षेच्या वर्षी निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हाही गुजराथी दांपत्याने विदितची बुद्धिबळकारकीर्द अजिबात अडखळणार नाही, एवढी काळजी घेतली. त्याच सुमारास त्याचे इएलओ रेटिंग २५०० गुणांपर्यंत पोचले होते. त्यामुळे कारकिर्दीच्या दृष्टीने निर्णय घेणे महत्त्वाचे होते. निर्णय घेणे त्यांनी विदितवर सोडले आणि मग त्याच्या निर्णयाला सर्व ताकदीने साथही दिली. नाशिककर असलेल्या विदितने त्याचे बुद्धिबळातील प्राथमिक धडेही नाशिकलाच गिरवले. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आर्थिक ओढाताणदेखील झाली. विदितने सुरुवातीचे सारे ग्रँडमास्टर नॉर्म्स भारतातील स्पर्धा खेळूनच मिळवले, कारण परदेशातील स्पर्धांमध्ये खेळणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे होते. विदितबरोबर विविध स्पर्धांच्या ठिकाणी जाता यावे म्हणून त्याच्या आईने, डॉ. निकिता गुजराथी यांनी काही वर्षे त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिसदेखील बंद ठेवली होती. राष्ट्रकुलस्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम्स) १२ वर्षांखालील गटात सुवर्णपदक मिळवून विदितने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. १४ वर्षांखालील मुलांच्या जागतिक स्पर्धेत त्याने अजिंक्यपदही मिळवले. विदितने नंतर त्याच्या कारकिर्दीच्या चाली रचताना कधी बचावात्मक धोरण स्वीकारलेच नाही. मात्र ग्रॅण्डमास्टरचे नॉर्म्स पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागली. या साऱ्या वाटचालीत त्याचा खेळ घडत होता आणि खेळाकडे बघण्याची त्याची बैठकही पक्की होत होती.
यंदा टाटा ओपन चेस मास्टर्स २०१९ मध्ये त्याने अतिशय आश्वासक कामगिरी केली आहे. २०१८ची टाटा ओपन चॅलेंजर्स स्पर्धा त्याने जिंकली. त्या स्पर्धेच्या विजेत्यास टाटा ओपन चेस मास्टर्समध्ये थेट स्थान मिळते. ही स्पर्धा म्हणजे बुद्धिबळातील अतिशय मानाची व प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. जगातील सर्वोत्तम १४ बुद्धिबळपटू या स्पर्धेत यंदा खेळले. विदितने ‘चॅलेंजर्स’ जिंकून या स्पर्धेत थेट स्थान मिळवले होते. स्पर्धेचे हे ८०वे वर्ष होते.
या स्पर्धेच्या १०व्या फेरीत विदितने व्लादिमीर क्रामनिकला हरवले (२००० मध्ये १५ वर्षे जगज्जेता असलेल्या कास्पारोवला हरवून व्लादिमीरने तब्बल ७ वर्षे जागतिक अजिंक्यपद स्वत:कडे राखले होते) व स्पर्धेतील मोठा अपसेट केला. विदित म्हणतो, “या सामन्यासाठी मी पूर्ण झुंज देण्याच्या तयारीत होतो, त्यामुळे एवढ्या पटकन विजय हा अनपेक्षितच होता.” हा विजय त्याने केवळ २९ चालीत नोंदवला! पुढच्याच फेरीत, म्हणजे १२व्या फेरीत त्याची लढत होती अझरबैजनच्या मामेदियरोव याच्याशी! मामेदियरोव हा तिसऱ्या क्रमांकाचे जागतिक रँकिंग असलेला खेळाडू. प्रचंड आक्रमक खेळासाठी तो प्रसिद्ध आहे. त्यालादेखील विदितने लीलया हरवले! लागोपाठ केलेल्या या दोन अपसेट्समुळे बुद्धिबळजगताने या भारतीय सेन्सेशनची दखल न घेतली तरच नवल! पुढच्या फेरीत विदित जिंकण्याच्या परिस्थितीत होता, मात्र या सामन्यात त्याने एका टप्प्यावर वर्चस्व गमावले व सामना अनिर्णित राहिला. हा सामना विदितने जिंकला असता तर त्याला या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवण्याची संधी होती. स्पर्धेतील त्याचा अखेरचा सामना होता विश्वनाथ आनंदशी! आनंदशी तो ‘क्लासिकल चेस’ प्रथमच खेळत होता. स्पर्धेतील हा त्याचा अखेरचा सामना होता. सामना अनिर्णित राहिला. विदित सांगतो, “हॉटेलमध्ये परतल्यावर त्या लढतीचा अभ्यास कम्प्युटरवर करताना असे लक्षात आले, की काही विशिष्ट चाली मी केल्या असत्या तर बाजू किंचित वरचढ होण्याची शक्यता होती.” सामना अनिर्णित राहिला तेव्हा विदितकडे एक प्यादे प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त होते.
मॅग्नस कार्लसन म्हणजे सध्याच्या फॉर्मवर बुद्धिबळातील फेडररच! या महान खेळाडूशी विदित आतापर्यंत दोन वेळा खेळला आहे आणि दोन्ही वेळा सामना अनिर्णित राहिला आहे. कार्लसनने आतापर्यंत सात वेळा टाटा ओपन स्पर्धा जिंकली आहे. २०१४ मध्ये आजवरच्या सर्वाधिक अशा २८८२ गुणांसह त्याने फिडे रेटिंगमधील सर्वोच्च स्थान मिळवले होते. एकूण १०२ महिने कार्लसनने जागतिक क्रमांक एक स्वत:कडे ठेवण्यात यश मिळवले आहे. २०१० मध्ये वयाच्या २०व्या वर्षी त्याने सर्वात कमी वयात जागतिक रँकिंग क्रमांक एक मिळवण्याचा विक्रम केला. अशा या महान खेळाडूशी २४ वर्षांच्या विदितने खेळलेले दोन्ही सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवले, ही कामगिरी खरोखर वाखाणण्यासारखीच आहे. या स्पर्धेत कार्लसनशी त्याची लढत तब्बल सात तास चालली. या सामन्यात एकूण १३१ चाली रचल्या गेल्या. हा कार्लसनच्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ खेळला गेलेला सामना होता. या स्पर्धेतील उत्तम कामगिरीमुळे विदितचे जागतिक फिडे रँकिंग आता ४५वरून ३६पर्यंत वर जाण्याची शक्यता आहे. फिडे रँकिंगच्या यादीत विदितच्या आधी असलेली पहिली ४४ नावे पाहिली तर यातील बहुतांश खेळाडूंचे वय हे विदितपेक्षा अधिक आहे. त्याच्यापेक्षा लहान असलेले चार-पाच खेळाडूच यादीत आहेत.
टाटा ओपननंतर विदित आता प्रो चेस लीग ही एक ऑनलाइन स्पर्धा मुंबई मूव्हर्स या संघातर्फे खेळणार आहे. पुढे मार्चमध्ये प्राग येथील एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. या स्पर्धेत जगातील टॉप ३० रँकिंगमधील खेळाडू असतील. टाटा ओपनमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याचे इएलओ रेटिंग आता २७११च्या आसपास येण्याची शक्यता आहे. या स्पर्धेआधी हे रेटिंग २६९५ होते. इस्रायलचा ग्रँडमास्टर ऍलन ग्रीनफिल्ड हा त्याचा गेले अनेक वर्षे प्रशिक्षक आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link