Next
खड्ड्यांच्या देशा...
विशेष प्रतिनिधी
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आरेच्या जंगलातील मेट्रोचे कारशेड आणि मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे हे सध्या मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. मुंबईकरांच्या समस्यांकडे सरकारचे किती आस्थापूर्वक लक्ष आहे, हे या दोन्ही समस्यांच्या उत्तरावर अवलंबून आहे. मेट्रो कारशेड व त्यानिमित्ताने पर्यारवणाच्या उपस्थित झालेल्या मुद्यांची चर्चा गेल्या अंकात केली आहे. या अंकात या विषयाच्या दोन्ही बाजू वाचकांपुढे मांडण्यात आल्या आहेत. लोकांना मेट्रो हवी आहे, त्याबरोबरच शहरातील राखीव जंगलही हवे आहे, त्यामुळे आता या दोन्ही गोष्टींत समतोल साधून निर्णय घ्यायचा आहे. रस्त्यांवरील खड्डे हा मात्र अत्यंत गंभीर विषय आहे, पण सरकार किंवा महापालिका हा विषय अजिबात गांभीर्याने घेत नाही, हे दरवर्षी सिद्ध होत आले आहे. वर्तमानपत्रे, सोशल मीडिया यांवरून या खड्ड्यांविषयी लोक दरवर्षी असंतोष व्यक्त करत असतात, परंतु सरकार कधीही त्याची दखल घेत नाही. याचे कारण लोक या खड्ड्यांविरुद्ध रस्त्यावर उतरत नाहीत हे आहे. अर्थात मुंबईकर त्यांच्या रोजच्या रोजीरोटीच्या संघर्षात एवढे अडकलेले असतात की त्यांना आपल्या समस्यांसाठी आंदोलन वगैरे करण्यासाठी वेळही नसतो. सरकार वाशीच्या पुलासाठी प्रत्येक वाहनाकडून टोल घेते, दररोज काही कोटी रुपये या टोलपोटी जमा होतात, पण या पुलावर सध्या सहस्र खड्डे पडले आहेत व वाहतूककोंडी होत आहे. रस्ता दुरुस्त न करता टोल वसूल करण्याचे टोलवाले व सरकार यांचे धारिष्ट्य वाखाणण्याजोगे आहे. त्यासाठी जो एक जबर निर्लज्जपणा लागतो तो या मंडळींजवळ आहे. टीव्ही, नाटकांत काम करणाऱ्या मराठी मंडळींनी सामाजिक जाणीव दाखवून अलीकडच्या महापुरात पूरग्रस्तांसाठी मदत जमवून मोलाची कामगिरी केली, तशीच त्यांनी आता रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, तेव्हा सर्व मतदारांनीही आपल्या मतदारसंघातील सर्वच उमेदवारांना खड्ड्यांसंबंधी जाब विचारला पाहिजे. खड्ड्यांना कुणी एक राजकीय पक्ष जबाबदार नाही, सर्वच आहेत. इतकी वर्षे काँग्रेसचे सरकार होते तर तरी खड्डे होतेच, आता भाजपचे सरकार आले तरी खड्डे आहेत आणि मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असली तरी खड्डे आहेत आणि नवी मुंबई महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असली तरी खड्डे आहेत. खड्ड्यांना कारणीभूत असणारी मंडळी सर्व पक्षांत आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांवर याप्रकरणी भडिमार करून भंडावून सोडले तरच काही बदल होण्याची अपेक्षा ठेवता येईल. दरवर्षी पावसाळ्याआधी रस्तेदुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे दिसते, परंतु एक पाऊस होताच हे दुरुस्त रस्ते एकदम नादुरुस्त होतात, याचे गौडबंगाल काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. भ्रष्टाचाराबद्दल बड्या राजकारण्यांना जेलमध्ये पाठवणारे भाजपचे सरकार रस्तेबांधणी कंत्राटदार, टोलवसुली करणारे यांना जेलमध्ये का नाही पाठवत? येत्या विधानसभा निवडणुकीत फक्त रस्ते आणि त्यावरील खड्डे एवढाच विषय मतदारांनी लावून धरला पाहिजे. या विषयावर ‘झी मराठी दिशा’च्या वाचकांना आपली मते व्यक्त करता यावीत यासाठी आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. वाचकांना आपली मते, प्रतिक्रिया पाठवून आवाज उठवण्याची ही चांगली संधी आहे. या प्रतिक्रियांची दखल घेऊनही या खड्ड्यांवर उपाययोजना झाली नाही तर महाराष्ट्राचे वर्णन ‘खड्ड्यांच्या देशा...’ असे करावे लागेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link