Next
टिकाऊ आणि चविष्ट!
मानसी बिडकर
Thursday, August 15 | 06:30 PM
15 0 0
Share this story

सुजाता कदम मूळच्या सातारच्या शेतकरी कुटुंबातील. त्यांचे वडील दूध आणि शेतीचा व्यवसाय करत. आई गृहिणी. सुजाताताईंचे बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण साताऱ्यामध्येच झाले. वडिलांची परिस्थिती बेताची. त्यामुळे बी.कॉम. करत असतानाच त्या टॅक्स कन्सल्टन्टकडे अकाऊंटची कामे करीत. त्यांना अगदी लहानपणापासून, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘कळायला लागल्यापासून’ स्वयंपाक करता येत होता. वेगवेगळे पदार्थ घरातील मंडळींना खाऊ घालणे हा त्यांचा छंद होता. सातारच्या अजित कदम यांच्याशी लग्न झाले. अजित यांचा साताऱ्यामध्ये वॉटरप्रूफिंगचा व्यवसाय होता. लग्नानंतर सुजाताही त्यांना मदत करू लागल्या. त्याचप्रमाणे त्या अकाउंट क्षेत्रातील कामही करीत होत्या. लग्नानंतर १० वर्षांनी त्यांनी व्यवसायवाढीसाठी पुण्याला यायचे ठरवले.  २००४ मध्ये पुण्यात आल्यावरही सुजाता अकाऊंटची नोकरी करीत होत्या.  परंतु त्यांना जास्त रुची खाद्यपदार्थांची होती. ते क्षेत्र त्यांना खुणावत होते.
त्यांची मुले हीच त्यांच्या व्यवसायाची प्रेरणास्रोत म्हणता येतील. मुलांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणे किंवा मुलांना आवडत नसलेल्या भाज्यांचे पराठे करून देणे व खायला लावणे, हे जेव्हा त्या करत, तेव्हा त्यांना जाणवले की बऱ्याच नोकरदार महिलांना असे करणे जमत नाही. नोकरी-व्यवसाय सांभाळताना घरातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणे शक्य होत नाही. आपणच आपल्या या पाककलेचा व्यवसाय चालू केला तर... सुजाताच्या मनात विचारचक्र सुरू झाले. त्यांनी पुण्यात ‘मिटकॉन’मध्ये प्रशिक्षण घेतले.  त्यानंतर त्यांनी व्यवसाय करण्यासाठी काही पदार्थांची निवड केली. त्यांची बरीचशी उत्पादने ‘फ्रोझन फूड’ प्रकारची आहेत. त्यातील काही उत्पादने एक ते दीड वर्षें टिकतात. जेव्हा हवे तेव्हा गरम करून खाता येतात. फ्रोझन फूडला परदेशातही खूप मागणी आहे.  ही उत्पादने उत्तम राहण्यासाठी कोल्डचेन मेंटेन करावी लागते. जेव्हा त्यांनी हे प्रॉडक्ट करायचे ठरवले तेव्हा बरीच आव्हाने समोर होती.  सुरुवातीची दीड-दोन वर्षे अगदी छोट्या स्वरूपात, प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी हा व्यवसाय करून बघितला. दीड वर्षें डीपफ्रिजमध्ये ठेवलेला पराठा तेवढाच ताजा, पौष्टिक,चवदार असतो याची आधी त्यांनी स्वतः खात्री करून घेतली. छोट्यामोठ्या ऑर्डरमधून त्यांना त्यांच्या उत्पादनांची पसंती कळत गेली.  त्यानंतर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पुढे न्यायचे त्यांनी ठरवले. घरच्यांनीही खूप मदत केली व प्रोत्साहन दिले. आणि सुजाताचे स्वप्न साकार झाले.
त्यांनी प्रॉडक्शनसाठी जागा बघितली. आठ-नऊ स्त्रिया मदतीला घेतल्या.  त्यानंतर डीपफ्रिझर, स्टफिंग मशीन, डोव्ह मेकिंग मशीन, भट्टी अशी आवश्यक ती मशिनरी खरेदी केली.  आणि चवदार फूड्स प्रा. लि. या कंपनीची सुरुवात झाली. पराठ्यासाठी उत्कृष्ट पॅकेजिंग करून घेतले. त्यानंतर वेबसाइट डिझाइन, मार्केटिंग सेल, करत करत त्यांचे पराठे बिग बाजारसारख्या रिटेल आऊटलेट्स, हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर जाऊ लागले. त्याचप्रमाणे त्यांनी ट्रेडमार्क सर्टिफिकेट घेऊन ‘के सन्स’ (कदम सन्स) या ब्रॅण्डने उत्पादने  वितरित करण्यास सुरुवात केली.
ताज्या भाज्या व गव्हाच्या कणकेपासून हे पराठे हाताने लाटून बनवले जातात. पूर्वी फक्त आलूपराठे बनवणाऱ्या सुजाता आता अनेक प्रकारचे ‘फ्रोझन स्टफ पराठे’ बनवतात. त्याच प्रमाणे फ्रोझन खवापोळी, पुरणपोळी, मोदक, पावभाजी, पुलाव हे ‘रेडी टू इट’ पदार्थ आता त्यांच्या यादीमध्ये आहेत.  हे  सर्व फ्रोझन पदार्थ डीपफ्रिजमध्ये ठेवून टिकवता येतात आणि हवे तेव्हा गरम करून खाता येतात.  
भविष्यात त्यांना प्रॉडक्टची रेंज वाढवायची आहे.  त्या वेगवेगळ्या ठिकाणी आऊटलेट्स व सर्व्हिंग काऊंटर बनवत आहेत. असेच एक आऊटलेट खोपोली फूडमॉल येथे त्यांनी नुकतेच सुरू केले आहे. त्या वेगवेगळ्या प्रदर्शनांत, पेठांत भाग घेतात. मीनल मोहाडीकर यांच्याबरोबर त्यांनी दुबई बिझनेस टूर करून परदेशात व्यवसाय वाढवण्याचे तंत्र शिकून घेतले. सामाजिक भान म्हणून वृद्धाश्रमांना पराठे देतात. त्यांच्या व्यवसायवृद्धीचे गमक म्हणजे गुणवत्ता, ताजेपणा, उत्तम पॅकिंग आणि चव.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link