Next
हिंदमातामध्ये तरुणांनी घेतली ट्यूबबोट
बागेश्री कानडे
Friday, September 06 | 01:00 AM
15 0 0
Share this story


मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला रे झाला की ‘हिंदमाता परिसरात पाणी तुंबले,’ ही आता दरवर्षीच्या पावसाळ्यातली हमखास बातमी झाली आहे. मुंबई
महापालिकेकडून ही परिस्थिती काही सुधारणार नाही व इथला पावसाळ्यातला तलाव नेहमीचाच, हे सत्य पचवून आता तेथील दोन स्थानिक तरुणांनी एक ट्यूबबोटच विकत घेतली आहे. हितेश चव्हाण व गांधार भोगले या दोघांनी गेल्या वर्षीच अडीच हजार रुपयांची ही टू-सीटर बोट खरेदी केली आहे.
  हिंदमातामध्ये पाणी भरले म्हणजे आपल्या रेल्वे, रस्त्यांची पार दुर्दशा होणार, असे समीकरणच जणू आता मुंबईकर बांधतात. खुद्द हिंदमाता परिसरात राहणारे लोक दरवर्षीच दहा-बारा तास अशा साचलेल्या पाण्याला सामोरे जातात. गेल्या दोन दिवसांतील पावसात इथे बारा तास पाणी भरले होते. त्याचवेळी बुधवारी दुपारी कंबरभर साचलेल्या पाण्यात ही बोट अवतरली.
दरवर्षीचे हे दुखणे असल्याने आम्ही २५०० रुपयांत या बोटीची ऑनलाइन खरेदी केली. त्याला एक वल्हेही आहे. परिसरात पाणी भरल्यावर आम्ही आमच्या गाड्याही बाहेर काढू शकत नाही व रोजचे व्यवहारही थंडावतात. या भागात सेंट पॉलच्या दोन शाळा आहेत, त्यातील विद्यार्थ्यांना येणे-जाणे जिकिरीचे होऊन बसते. त्यांच्या मदतीसाठी तसेच आमच्या नित्याच्या कामांसाठी आम्ही ही बोट घेतली आहे, असे हितेश चव्हाणने सांगितले.
या भागात पाणी साचू लागल्यावर महापालिका किंवा पोलिसांची वाट न बघता स्थानिक नागरिकच सजग होऊन इथली वाहतूक बंद करतात व उड्डाणपुलांवरून गाड्या न्यायला सांगतात. पाण्यातून रस्ते शोधणाऱ्या वाहनचालकांना आतील रस्त्यांची माहितीही देतात. पालिकेने गटार-पर्जन्यवाहिन्या मोठ्या केल्या, परंतु नालेसफाई व्यवस्थित झाली नसेल, तर फायदा काय, असा प्रश्न हितेश विचारतो.
मुंबईची सध्याची स्थिती पाहता अशा अनेक बोटी ठिकठिकाणी लोक जवळ बाळगू लागल्यास आश्चर्य वाटणार नाही.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link