Next
धाकाची गोष्ट
मिथिला दळवी
Friday, April 12 | 04:00 PM
15 0 0
Share this story“साची, शी शी.. ते नाही घालायचं तोंडात.. बुवा येईल बघ!”
“आर्य, असं मारतात का मित्राला! देवबाप्पा रागावेल हं !”
“आरव, पटकन भाजी खाऊन टाक, नाहीतर पोलिसाला बोलवेन हां!”
मुलं लहान असताना असे उद्गार आपल्याला नेहमी आजूबाजूला ऐकू येतात...
मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून परावृत्त करायचं असेल, त्यांना चांगल्या- वाईटामधला फरक आपल्याला समजावून सांगता येत नसेल, तेव्हा पोलिस येईल, बुवा बघतोय, देवबाप्पाला नाही आवडणार... असं काहीतरी सांगितलं जातं.  बागुलबुवा तयार करून धाक दाखवला जातो.
गेले दोन आठवडे आपण ‘मुलं आणि भीती’ याबद्दल बोलतो आहोत. भीतीचं हे आणखी एक रूप... धाक! कदाचित थोडं सौम्य.
आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्याला असुरक्षित वाटत असतं. हे असुरक्षित वाटणं, शारीरिक आणि भावनिक, यापैकी एका किंवा दोन्ही स्तरांवर असू शकतं. धाक वाटतो तेव्हा त्या व्यक्तीच्या/गोष्टीच्या वाटेला गेलं, की काहीतरी नकोसं होईल, एवढंच मनात असतं. ती गोष्ट टाळण्याकडे आपला कल असतो.
शाळेत उशीर झाला, तर काही ना काही स्वरूपात त्याचे परिणाम भोगावे लागतात. काही शाळांमध्ये शिक्षा होते, काही ठिकाणी समज दिली जाते, काही ठिकाणी गैरहजेरी लावली जाते. हे सगळं अप्रिय असू शकतं, पण त्यानं असुरक्षित वाटत नाही.
अनेकदा सुव्यवस्था राखता यावी यासाठी थोड्या प्रमाणात धाक गरजेचा असतो. नियम, कायदे असणं, ही धाकाची रूपं आहेत. वाहतुकीचे नियम पाळले गेले नाहीत तर सावळागोंधळ होईलच, पण अपघातही होऊ शकतील. अशा वेळी शारीरिक सुरक्षितता महत्त्वाची असते. त्यामुळे हा धाक थोडा जास्त मोठा असणं गरजेचं असतं. बॅंकेत चेक बाऊन्स झाला तर काहीएक रकमेचा दंड होतो. हा ही एक प्रकारचा धाक.
मुलांच्या बाबतीत धाक आणि भीती यातलं आपल्याला काय नेमकं हवं आहे, याचं भान पालक म्हणून आपल्याला असणं आवश्यक आहे. मुलांसमोर बागुलबुवा उभे करताना बऱ्याचदा हे भान सुटतं.
बागुलबुवांबद्दल का सांगितलं जातं मुलांना? अनेक आईबाबांना हा प्रश्न विचारला की हमखास उत्तर येतं, “अहो, मग मुलांनी एखादी गोष्ट करू नये असं वाटत असेल तर आपण काय करायचं? इतक्या लहान मुलांना समजावून सांगितलेलं थोडंच कळतं?”
समजावून सांगितलेलं किंवा शब्दांचे अर्थ नक्कीच नाही कळत एक-दीड वर्षांच्या मुलांना! पोलिस, बुवा या शब्दांचे अर्थ तरी कुठे कळतात त्यानां? मूल जे काही करतं आहे, ते आपल्याला आवडतं आहे की नाही, हे आपली देहबोली, आपल्याला झालेला आनंद, किंवा चेहऱ्यावर उमटलेली नाराजी, यातूनच तर त्याच्यापर्यंत पोहचत असतं! आणि मूल त्यातून शिकत जातं.
सहा महिन्यांनंतर तर आईच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया पाहून खूपदा मुलांना आपण करतो ते योग्य आहे की नाही, याचा अंदाज येऊ लागतो. त्या नाराजीच्या किंवा रागाच्या चेहऱ्याशी जोडलेले शब्द म्हणून बहुतेक वेळा बुवा, पोलिस अशा शब्दांना धाकाचे रंग चढू लागतात.
त्यामुळे बहुतेक वेळा हा आईबाबांचा शॉर्टकट असतो. इतक्या लहान मुलांना एखादी गोष्ट कशी समजावून सांगायची, हा प्रश्न आईबाबांना पडलेला असतोच. मग डोळे मोठ्ठे आणि चेहरा घाबराघुबरा करून असा एखादा बागुलबुवा तयार केला, की सुरुवातीचा काही काळ ही मात्रा लागू पडते. मात्र हे उपाय फार काळ चालत नाहीत.
आरवला भाजी नाही आवडत. लहान आहे म्हणून कोणता ना कोणता बागुलबुवा उभा करून आई-बाबा त्याला काही काळ भाजी खायला लावू शकतील, परंतु कायम नाही. कधीतरी आरवला या धाकामधला फोलपणा कळतो आणि तो बधेनासा होतो.
धाकाच्या बागुलबुव्यामधली हवा गेली, की आईबाबांना अतिशय हताश वाटू लागतं. मग येनकेन प्रकारेण मुलांना शिस्त लावायचे प्रयत्न होतात.
त्यात अगदी टोकाची भूमिकाही घेतली जाते. आरव भाजी खात नाही, म्हणून तुला आज जेवायलाच देणार नाही, असं सांगणं. यात गंमत म्हणजे, आरवला जेवायला दिलं जात नाही म्हणून आई व आजीला खूप वाईट वाटतं आणि मग त्या दोघीही जेवत नाहीत. मग दिवसभर लेकरू उपाशी आहे, यानं त्या दोघींना संध्याकाळी अगदीच अपराधी वाटू लागतं आणि मग त्यातून संध्याकाळी आरवला आवडणारी पावभाजी किंवा पाणीपुरी घरी बनते!
इथे नेमकी गंमत पाहा, आई आणि आजीला आरवच्या न जेवण्याचा धाक जास्त आहे, की आरवला भाजी खाण्याबाबत त्यांचा?
संध्याकाळी पावभाजी बनली यावरून काय कळतं, आई-आजीला आरवच्या उपास पडण्याचा जास्त धाक आहे... बस्स!
धाकाच्या गोष्टीतली मेख इथेच आहे... बागुलबुवा उभे न करता, अतिरेक टाळून मुलांना गोष्टी कशा सांगता येतील, हे पाहिलं पाहिजे. हे करणं का महत्त्वाचं, ते कसं साधायचं, ते पाहू पुढच्या भागात. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link