Next
बुद्धीच्या बळावर कार्लसन जगज्जेता
शशिकांत सावंत
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this story

अपेक्षेप्रमाणेच मॅग्नस कार्लसनने टायब्रेकरवरचे सामने जिंकून बुद्धिबळातील विश्वविजेतेपद आपल्याकडे राखले आहे. बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत अनेक गोष्टीवर या निर्णयावर जुगार खेळला जातो; पण जेव्हा ६४ घरांचा राजाच जुगार खेळतो तेव्हा?
जगज्जेतेपदाच्या बाराव्या सामन्यात कार्लसनची स्थिती चांगली होती, तरीही त्याने बरोबरीचा प्रस्ताव मांडला आणि फॅबियानो कारुआना याने तो स्वीकारला. या गोष्टीने जगभरच्या चाहत्यांना धक्का बसलाच, पण खुद्द माजी जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह याने ट्विटमध्ये म्हटले, की माझा कार्लसनवरचा विश्वास उडाला. बाराव्या खेळातील आश्वासक स्थितीचा फायदा न घेता कार्लसनने टायब्रेकरवर जाणे पसंत केले याचे कारण म्हणजे तो रॅपिड आणि blitzमधला बादशहा मानला जातो.  ज्या वर्षी त्याने विश्वनाथन आनंदला हरवले त्याच वर्षी त्याने रॅपिड जागतिक स्पर्धा जिंकली होती. उलट कारुआना रॅपिड स्पर्धेत रेटिंगमध्ये त्याच्या बराच मागे आहे. त्यामुळेच टायब्रेकरवर आपण नक्की जिंकू, असा कयास त्याने मांडला.
पहिल्याच रॅपिड सामन्यात कारूआनानेही चूक केली होती. दोन हत्ती आणि प्यादी अशी जवळपास अनिर्णित डावाची शक्यता असताना कार्लसनकडे दोन जोड प्यादी तर काळ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या कारुआनाकडे एक प्यादे व हत्ती उरला होता. पण चुकीने कारुआना हरला. दुसऱ्या डावातही त्याने चूक केली. दोन्ही डाव जिंकल्यावर कार्लसनला आता फक्त अनिर्णीत डावासाठी खेळायचं होतं. उलट कारुआनाला दोन्ही डाव जिंकण्यासाठी. त्यात तो तिसराही डाव हरला.
कार्लसन आणि कारुआना दोघेही लहानपणापासून बुद्धिबळात चमक दाखवणारे खेळाडू आहेत. दोघेही वयाच्या पंधरा वर्षांच्या आतच ग्रँडमास्टर झाले. कारुआना हा इटालियन आणि अमेरिकन दाम्पत्याचा मुलगा. त्याचा जन्म १९९२ सालचा,  त्याचे बालपण अमेरिकेत गेले.तर कार्लसनचा जन्म १९९० मधला. तो नॉर्वेमध्ये जन्मला आणि लहानपणापासूनच त्याने बुद्धिबळात अफाट चमक दाखवल्यामुळे आईवडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने चक्क माजी जगज्जेता अनातोली कारपोव्हला हरवले आणि कास्पारोव्हशी बरोबरी केली. संगणकयुगात जन्मल्याचा त्याला पुरेपूर फायदा झाला. पूर्वेच्या खेळाडूंना जे केवळ पुस्तक, मासिकांतून उपलब्ध होत होते ते लाखो गेम्स त्याला इंटरनेटवर उपलब्ध होते. अर्थातच त्याचा फायदा कार्लसनला मिळाला.
काही काळ कारुआना इटलीमध्ये राहायला गेला आणि इटलीतर्फे खेळला. मग परत अमेरिकेला आला. कार्लसनच्या घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला पूर्णवेळ व्यवसायिक खेळाडू बनवले आणि तरुण वयातच टुर्नामेंट खेळत तो जगभर फिरू लागला. त्यासाठी त्याने चक्क शाळा सोडली होते. त्याची चमक चमक पाहून खुद्द कास्पारोव्हने त्याला काही काळ शिकवायचे ठरवले होते, पण ते होऊ शकले नाही. कार्लसन आणि कारुआना या दोघांनीही संगणकाचा पुरेपूर वापर, जगभरातील खेळांचा अभ्यास आणि वेगवेगळ्या टूर्नामेंटमध्ये सतत खेळत राहणे या तीन गोष्टींच्या जोरावर आपले कौशल्य परिपूर्ण केले.
टायब्रेकरवर  पंचवीस मिनिटांचे चार डाव खेळवले जाणार होते. कालसने पहिला डाव पांढऱ्या सोंगट्या घेऊन आणि दुसरा काळ्या सोंगट्या घेऊन जिंकला. दबावाखाली आलेल्या कारुआनावर आता दोन्ही डाव जिंकण्याची जबाबदारी होती. जो मुश्किल था मगर नामुनकिन नहीं था! पण कार्लसनने बरोबरीची स्थिती असतानाही तो डाव जिंकला. थोडक्यात  बारावा सामना अनिर्णित ठेवून टायब्रेकरवर जाण्याचा त्याचा जुगार यशस्वी झाला. आधीच्या अकरा डावांत दोघे तुल्यबळ होते. दोघेही अचूक खेळ करत होते. त्यामुळेच दोघांमधील सामने पाहताना दोन माणसे खेळत नसून जणू काही दोन यंत्रमानव खेळत आहेत असे वाटत होते आणि त्यामुळेच ओळीने बारा सामने अनिर्णित राहिले.

बुद्धिबळाचा खेळ तसा हजारो वर्षे आशियात आणि जगात चालू आहे.  पण खऱ्या अर्थाने जगज्जेतेपदाची स्पर्धा सुरू झाली ती १८८०च्या दशकात.  त्या काळात स्पर्धेचे नियम वेगळे होते. जगज्जेतेपदवीराला कोणीही आव्हान देऊ शकायचे आणि तो स्वतः विरोधक निवडायचा. एकोणिसावे शतक सुरू झाले तसे नियम बदलू लागले. जगज्जेतेपदाची स्पर्धा हरलेला पुन्हा रिमेस मागू शकत होता. या काळात कॅपाब्लँक, बोटान्विक, मॅक्स युवे, आलेखाईन असे अनेक जगज्जेते झाले. यात प्रामुख्याने रशियन खेळाडूंचा वरचष्मा राहिला. १९५०नंतर फिडे ही संस्था स्थापन झाली आणि तिने जगज्जेतेपदाच्या सामन्यांवर कब्जा मिळवला. त्यात थोडी शिस्त आली. आव्हानवीर कँडिडेट स्पर्धेतून निवडण्याची पद्धत सुरू झाली. यातूनच बॉबी फिशरसारखा खेळाडू पुढे आला, पण त्याच्या अटी मान्य नसल्यामुळे नंतरचा सामना न खेळताच कास्पारोव्हला विजयी घोषित करण्यात आले. मग कास्पारोव्ह आणि विश्वनाथन आनंद यांच्यातील मतभेदामुळे त्याने स्वतःची प्रोफेशनल चेस अॅकॅडमी सुरू केल्यामुळे तिच्या मार्फतही जगज्जेता निवडला जाऊ लागला. परिणामी एकावेळी जगात दोन जगज्जेते अशी स्थिती निर्माण झाली.
२००० नंतर कास्पारोव्हची संस्था विलीन झाली आणि विश्वनाथन आनंद तीन वेळा जगज्जेता झाला. आता जगज्जेत्याचे सामने निर्णायक होतील, असे नियम करण्यात आले.  कँडिडेट स्पर्धाही व्यापक झाली त्यातूनच कार्लसन आता जगज्जेता बनलेला आहे.

असा घडला कार्लसन
कार्लसन वयाच्या १२व्या वर्षी गॅरी कास्पारोव्ह आणि कार्पोव्ह यांच्याशी झुंज देत होता तेव्हा भारताचा विश्वनाथ आनंद जगज्जेता  होता. मॅग्नस कार्लसन २२ वर्षांचा झाल्यावर त्याने  कँडिडेट  जिंकली  आणि तो आव्हानवीर ठरला. २०१४ साली विश्वनाथ आनंदला हरवून तो जगज्जेता झाला. त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात तो आनंदाबरोबर पुन्हा जिंकला आणि तिसऱ्यांदाही. तीन वेळा जगज्जेता राहिलेला कार्लसन पहिल्यांदा अमेरिकन फॅबियानो कारुआनाशी जगज्जेत्यापदाची मॅच खेळत होता. अनेक दृष्टींनी ती मॅच ऐतिहासिक होती. १९७२ साली अमेरिकन बॉबी फिशरने, बोरिस स्पास्कीला हरवून रशियाचे जागतिक बुद्धिबळामधील आव्हान संपवले आणि पहिल्यांदाच एक अ-रशियन माणूस जगज्जेता झाला. यानंतर बॉबी फिशरने घातलेल्या अटी फिडेला अमान्य झाल्यामुळे जगज्जेतेपद आव्हानवीर कार्पोव्हला देण्यात आले. नंतर कार्पोव्ह आणि कास्पारोव्ह यांचे सामने गाजले. सामने सहा महिन्यांहून अधिक चालल्यामुळे त्याला स्थगिती देण्यात आली. यानंतर अनेक नियम सुटसुटीत करण्यात आले.
पूर्वीपासून बुद्धिबळ अडीच तासांत पहिल्या ४० खेळ्या याप्रमाणे नियंत्रित होतं. ४० खेळानंतर डाव अडजर्न म्हणजे स्थगित केला जायचा. शेवटची खेळी लिफाफ्यात ठेवून  काळे सोंगटीवाला पुढे पंचाकडे द्यायचा. परंतु गंमत अशी की त्यानंतर रात्रभर जागून पांढऱ्या आणि काळ्या सोंगटीवाले दुसऱ्या दिवशी काय होईल, याचा अंदाज घेऊ शकायचे. ही पद्धत काही वर्षापूर्वी बंद झाली आणि आता पहिल्या २ तासांत ४० खेळ्या कराव्या लागतात. नंतर २-२ तास वाढवून मिळतात. अशा प्रकारे जगज्जेतेपदाचा सामना खेळवला जातो.
सध्याची ही झुंज रंगेल असा अनेक तज्ज्ञांचा विश्वास होता. चेसबेस, चेस डॉट कॉम, चेस २४ अशा अनेक वेबसाइट्स अनेक ग्रँड मास्टर्सना हाताशी धरून सामन्याचे विश्लेषण करत असतात. बंद काचेआड जेव्हा सामना चालू असतो तेव्हा बाहेर अनेकदा सर्जीसारखे माजी आव्हानवीरही हजर असतात आणि त्यांच्या मुलाखती किंवा महिलांमधली जगज्जेती यांच्या मुलाखती यामुळे सामना क्रिकेटइतका नाही पण बऱ्यापैकी रंगतदार होतो.
अक्षरशः सर्व प्रकारची परम्युटेशन-काँबिनेशन या कॉमेन्ट्रीमध्ये येतात. पुन्हा डेनियल किंगपासून अनेक समालोचक त्यांच्या उत्तम शैलीने पाहणाऱ्यांना खिळवून ठेवतात. यावेळी या प्रत्येक सामन्याच्या वेळेस अक्षरशः लाखो लोक हा सामना लाइव्ह पाहत होते. शेवटच्या सामन्यात तर केवळ चेस बेसवरच ३३ हजार लोक पाहत होते. अनेक वेबसाइट सामना लाइव्ह दाखवत असतात. गार्डियनसारखी वृत्तपत्रे  दर १० मिनिटांनी अपडेट देत असतात. इतकं होऊनही हा सामना तितकासा रंजक झाला नाही आणि बाराही सामने अनिर्णित राहिले. बुद्धिबळात कधी फारसे रोमहर्षक  घडत नाही, पण एका सामन्याअगोदर कारूआना यांची तयारी  चालू असलेली २५ सेकंदांची क्लिप लीक झाली. दोन्ही खेळाडू काही ग्रँडमास्टर्सना हाताशी धरून, सेकंड्स म्हणून सराव करतात किंवा संभाव्य नव्या खेळ्या  खेळत राहतात, ज्याला नॉव्हेेल्टी म्हणतात. तर कारुआना, पेट्रॉफ डिफेन्सची तयारी करताना एक छोटीशी २५ सेकंदांची क्लिप अपलोड झाली. ही क्लिप मुद्दामच करण्यात आलेली आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली.
काही दादा खेळाडू विशिष्ट ओपनिंगसाठी ओळखले जातात. प्रामुख्याने बुद्धिबळात दोन प्रकारच्या ओपनिंग असतात. क्लोज आणि ओपन ओपनमध्ये स्वैर खेळायला वाव असतो. उदाहरणार्थ, सिसिलियन. क्लोजमध्ये पूर्ण सामना व्यूहरचनेवर आधारित असतो. उदाहरणार्थ, क्विन्स गँबिट, त्याला पोझिशनल रचना असे म्हणतात. ओपन रचना यावेळी मोठ्या प्रमाणात वापरण्यात गेली. तसेच पेट्रोफ डिफेन्स हेही वापरण्यात आले. कार्लसनचा आवडता रॉय लोपेझमधील बर्लिन बचाव यावेळी अभावाने दिसला.
हे दोन्ही खेळाडू एका नव्या पर्वातील आहेत, ज्यांची जडण-घडण संगणकयुगात झाली आहे. डिप ब्लूसारखा सेकंदाला लाखो खेळ्या करणारा संगणक आयबीएमने आणल्यावर, त्याने कास्पोराव्हला हरवले आणि एक नवे पर्व सुरू झाले. संगणकाचीही क्षमता इतकी वाढत गेली, की तुमच्याआमच्या हातातील स्मार्टफोनमधला चेस प्रोग्रॅम सेकंदाला लाखो खेळ्या करू शकतो. या सगळ्या कालावधीत कारुआना आणि कार्लसन मोठे झाल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचा खेळ निर्दोष आहे.
बुद्धिबळात अनेक प्रकारे जिंकता येते. समोरच्याच्या चुकीमुळे विजय मिळणे हे या जागतिक पातळीवरच्या खेळात अभावानेच घडू शकते. पहिल्या सामन्यात कार्लसनकडे असलेले अधिकचे प्यादे तो वजीर करू शकला नाही, नंतरच्या एकदोन सामन्यांत कारुआनाने त्याला जेरीला आणले होते, पण चिकाटीने लढत कार्लसनने डाव अनिर्णित ठेवले. बारावा सामना आता कुठे सामना रंगात येत असताना दोघांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला, असे गार्डियनच्या समालोचकाने म्हटले आहे. काहीही असो, परंतु जगभरातील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर बुद्धिबळ झळकते, हेही नसे थोडके!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link