Next
माळरानावरील लांडगा
अतुल साठे
Friday, September 06 | 02:45 PM
15 0 0
Share this story


कोल्ह्याला धूर्त म्हटले जात असले, तरी काही प्रमाणात हा गुण लोकांनी लांडग्यालाही चिकटवला आहे. ‘लबाड लांडगं ढोंग करतंय’ यासारख्या गीतांतून याचा प्रत्यय येतो. मुळात शुष्क व दुष्काळी प्रदेशात राहत असल्याने मिळणाऱ्या संधीचे सोने करण्याच्या लांडग्याच्या सवयीमुळे लोकांचे असे मत झाले असावे. ‘लांडगा आला रे आला’ ही म्हण सर्वपरिचित आहे. पाश्चिमात्य देशांतील वेअरवुल्फची आख्यायिका व ‘लिटल रेड रायडिंग हूड’ यांसारख्या कथांतून लांडग्याचे नकारात्मक चित्र रंगवाले गेले. परंतु भारतासारख्या शेती व पशुपालन करणाऱ्या समाजात लोकांना हजारो वर्षे लांडग्यासोबत सहअस्तित्वाची सवय आहे. धनगरांच्या ओव्यांत माळरानावरील या शिकाऱ्याशी जुळवून घेण्याबाबतचा संदेश आढळतो. रुडयार्ड किपलिंगच्या जंगलबुकमध्येही माणसाच्या मुलाला आश्रय देऊन त्याचे संगोपन करणाऱ्या लांडग्यांच्या टोळीतील अकडू, पकडू, लीला व चमेली यांसारख्या पात्रांमुळे लांडग्याचे सकारात्मक रूप समोर येते.
जगभरात लांडग्याच्या २४ उपप्रजाती असून त्यातील दोन  उपप्रजाती भारतात सापडतात – भारतीय लांडगा व तिबेटी लांडगा. पहिल्या उपप्रजातीचा आढळ भारतासहित पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, टर्की, जॉर्डन व इस्रायलमध्ये आहे. दुसऱ्या उपप्रजातीचा आढळ भारतात लडाख, उत्तराखंड व हिमाचलच्या काही भागांत, तसेच तिबेट व चीनच्या काही प्रांतांत आहे. भारतीय लांडगा देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र, गुजरात, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये तुरळक ठिकाणी पुंजक्यांत उरलेल्या अधिवासांत सापडतो. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही मोजक्या भागांत लांडगे शिल्लक आहेत. कुत्र्यांच्या विविध जाती पूर्वीच्या काळी लांडग्यांपासूनच उत्पन्न झाल्या, असे म्हटले जाते. कॅनिस लुपस असे शास्त्रीय नाव असलेल्या लांडग्याला अन्य भाषांत वुल्फ (इंग्रजी), भेडिया (हिंदी), वृक (संस्कृत), थोला (कन्नड), ओनई (तमिळ), थोरेलु (तेलुगु) व चांगु (तिबेटी) अशी नावे आहेत.

सडपातळ व चपळ

इतर उपप्रजातींच्या तुलनेत भारतीय लांडगा सडपातळ व उष्ण प्रदेशात राहात असल्याने कमी केसाळ असतो. रंग राखाडी व पिवळट तपकिरी असतो आणि काही भाग काळे असतात. पोटाकडचा व पायांचा आतील भाग फिका असतो, तसेच उन्हाळ्यातही रंग थोडे फिकट होतात व केसांची दाटी कमी होते. क्वचित लांडग्याचे संपूर्ण शरीर काळे असते. काळे लांडगे सोलापूर जिल्ह्यात सापडल्याच्या नोंदी आहेत. मोकळ्या प्रदेशात राहत असल्यामुळे उन्हापासून संरक्षणासाठी पाठीवरील केस थोडे लांब असतात. दिसायला बऱ्याच प्रमाणात गावठी कुत्र्यासारखा दिसत असला तरी लांडगा जरा थोराड असतो व त्याचे डोके मोठे असते. एस. एच. प्रॅटर यांच्यानुसार भारतीय नर लांडग्याची उंची २ फूट २ इंच ते २ फूट ६ इंच असते, तर वजन १८-२७ किलो असते. उत्तरेकडील लांडगे जरा मोठे असतात.
मोकळे गवताळ प्रदेश व खुरटी झुडपे असलेले जंगल हा भारतीय लांडग्याचा नैसर्गिक अधिवास आहे. दाट जंगलात भारतीय लांडगा सहसा सापडत नाही. खडक, जमिनीतील घळी व कपारीत लांडगे आश्रय घेतात. तिथेच पिल्लांना जन्म दिला जातो. राजस्थानमध्ये लांडगे वाळूतसुद्धा घळ करतात. झाडांच्या सावलीत किंवा झुडपांच्या जाळीत लांडगे आराम करत बसतात. दिवसा व रात्री अशा दोन्ही वेळेला ते शिकार करतात. लांडगा ज्या अधिवासात राहतो, त्यानुसार तो भक्ष्य पकडतो. भारतीय लांडग्याच्या टोळ्या ६-८ या संख्येने असतात. सामान्यतः नैसर्गिक भक्ष्य उपलब्ध असलेल्या अधिवासात लांडग्याच्या आहारात कळवीट, चिंकारा, ससा, घूस आणि अन्य लहान प्राणी व पक्षी यांचा समावेश होतो. लांडगे कधी कधी खोकड्याच्यासुद्धा मागे लागतात. काळविटासारख्या वेगवान प्राण्याला पकडायला एकाहून अधिक लांडगे एकत्र प्रयत्न करतात. कोल्हा आणि काही ठिकाणी अस्वल व बिबट्या हे लांडग्याचे प्रतिस्पर्धी आहेत.

संवर्धन

अलीकडेच ‘ओवीतला लांडगा’ या प्रकल्पांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील लांडगे व धनगर यांच्यातील प्राचीन शाश्वत संबंधांचा अभ्यास करण्यात आला. भारतीय वेदिक परंपरेत लांडग्याच्या संवर्धनाला महत्त्व दिलेले असून माळरानावरील अन्नसाखळीतील त्याची भूमिका अधोरेखित केली आहे. शेतीचे नुकसान करणाऱ्या काळविटांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे मोलाचे काम लांडगे करतात. ब्रिटिशकाळात भारतातून चित्ते नष्ट झाले व लांडग्यांचीही मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. त्यामुळे उरलेले लांडगे आता अधिवासातील प्रमुख भक्षक आहेत. नैसर्गिक भक्ष्य बऱ्याच ठिकाणी कमी होत गेल्याने शेळ्या-मेंढ्या, गुरे, आणि माणसांवर (विशेषतः लहान मुले) लांडग्यांनी हल्ले केल्याच्या घटना अनेक दशकांपासून घडत आहेत. अशा वेळी ग्रामीण भागांत आत्मरक्षणार्थ लांडगे व त्यांच्या पिल्लांची हत्या होते. मानव-लांडगा संघर्ष बिकट होत जातो. घटता अधिवाससुद्धा संघर्षाला कारणीभूत ठरतो. डोंगराळ भागांतील जंगलांपेक्षा मोकळ्या भागांतील माळराने प्राधान्याने मानवी वस्ती, शेती व उद्योगांसाठी वेगाने नष्ट होतात. ‘वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२’ अंतर्गत भारतीय लांडग्याला पहिल्या श्रेणीतील संरक्षित उपप्रजाती ठरवण्यात आले आहे, परंतु लांडग्याचा बराचसा अधिवास संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर आहे. पूर्वीची निसर्गस्नेही जीवनपद्धती झपाट्याने बदलत असल्याने पूर्वापार राखलेला हा अधिवास संपतो आहे. आपण गरजा मर्यादेत ठेवून माळराने राखली व हौसेला लगाम घालून हरणांची शिकार थांबवली, तर येणाऱ्या दशकांत लांडगे पुन्हा मोठ्या संख्येने दख्खनच्या पठारावर हरणांचा पाठलाग करताना दिसू लागतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link