Next
धडाकेबाज मार्टिन क्रो
सतीश स. कुलकर्णी
Friday, April 19 | 03:00 PM
15 0 0
Share this story

बाराव्या विश्वचषकस्पर्धेला ३० मेपासून सुरुवात होत असून क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. या निमित्ताने विश्वचषकस्पर्धेतील काही घटना, प्रसंग, गमतीजमती आणि खेळाडूंच्या पैलूंवर प्रकाश टाकणारी ही लेखमालिका
.
‘इंडियन प्रीमियर लीग’चा बारावा मोसम आता ऐन भरात आला असला, तरी जगातल्या सगळ्या क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत बाराव्या विश्वचषकस्पर्धेचे! ही स्पर्धा दोन दशकांनंतर माहेरी म्हणजे इंग्लंडमध्ये होत आहे. ‘इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड’ यंदाचे आयोजक आहेत. स्पर्धा कोण जिंकणार, संघांची निवड, त्यातले कच्चे अन् पक्के दुवे याची चर्चा आता भरात येईल. आव्हाने दिली जातील आणि पैजा लागतील. या स्पर्धेचा मानकरी कोण ठरेल? कोणता संघ नि कोणता खेळाडू?
विश्वचषकाच्या पहिल्या चारही स्पर्धांमध्ये प्रत्येक सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू (‘मॅन ऑफ द मॅच’) निवडला गेला; पण पूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूची  (मॅन ऑफ द सीरिज) निवड मात्र कधी केली गेली नाही. ही उणीव दूर झाली पाचव्या स्पर्धेपासून. तेव्हापासून पुढच्या प्रत्येक स्पर्धेत अशा गुणी खेळाडूची निवड केली जाऊ लागली.
स्पर्धेची ही पाचवी आवृत्ती अनेक अर्थांनी वेगळी ठरली. दक्षिण गोलार्धात झालेली ही पहिलीच स्पर्धा. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे २२ फेब्रुवारी ते २५ मार्च १९९२ या काळात तिचं आयोजन केलं. सत्तरच्या दशकात ‘पॅकर सर्कस’नं खळबळ उडवून दिली होती; तसंच काहीसं नावीन्य या स्पर्धेत पाहायला मिळालं. खेळाडूंचे रंगीत पोषाख, प्रकाशझोतातील सामने, पांढऱ्या चेंडूचा वापर, या सगळ्याला सुरुवात झाली. वादग्रस्त डकवर्थ-लुईस नियमाचा फटका पदार्पण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला बसला तो याच स्पर्धेत.
स्पर्धेपूर्वी संभाव्य विजेत्या संघांच्या यादीत न्यूझीलंडला कुणी फारसं गांभीर्यानं घेतलं नव्हतं. त्याचं कारणही तसंच होतं. विश्वचषकाच्या अगदी आधी पाहुण्या इंग्लंडनं या सहयजमानांना त्यांच्याच भूमीवर कसोटी आणि एक दिवसीय, अशा दोन्ही मालिकांमध्ये सपाटून मार दिला होता. त्यामुळेच न्यूझीलंड कुणाच्या खिसगणतीत नव्हतं. विश्वचषकस्पर्धेचं स्वरूप या वेळी पुन्हा एकदा बदललं होतं. ऐन वेळी दक्षिण आफ्रिकेच्या रूपानं नवव्या संघास मान्यता देण्यात आली. त्यातूनच साखळी पद्धत आली. सहभागी सर्व संघांना एकमेकांशी सामना खेळायचा होता. साखळीतले सगळे सामने आपल्याच देशात, आपल्या नेहमीच्या वातावरणात खेळायला मिळणार, हे न्यूझीलंडसाठी फायद्याचं होतं.
दोन यजमानांमधील लढतीनं स्पर्धेला सुरुवात झाली. ऑकलंडच्या इडन पार्कवर हा सामना झाला. निकालाचा अंदाज व्यक्त करताना बहुतेकांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला झुकतं माप दिलं. कारण कागदावर तोच संघ सरस दिसत होता. न्यूझीलंडचा कर्णधार मार्टिन क्रो आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात मात्र काही वेगळं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३७ धावांनी हरवून त्यांनी स्पर्धेतला पहिला धक्का दिला. असे बरेच धक्के बसलेले नंतरच्या महिनाभरात पाहायला मिळाले. या विजयानंतर न्यूझीलंडचा दबदबा वाढला. त्याला जागत संघानं सलग सात सामने जिंकले. संभाव्य विजेत्याच्या यादीत क्रोच्या संघाचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाऊ लागलं.
शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यातून खूप काही बिघडलं नव्हतं. परंतु घात झाला तो उपांत्य सामन्यात. न्यूझीलंडची गाठ पुन्हा एकदा पाकिस्तानशी पडली. जखमी झालेला क्रो क्षेत्ररक्षणाच्या वेळी मैदानाबाहेर थांबला; अंतिम सामन्यात तंदुरुस्त असावं म्हणून. परंतु त्याला तंबूत बसून पाहावं लागलं ते सामना हातातून पुरता निसटल्याचं आणि विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न भंगल्याचं!
या स्पर्धेत क्रोची कामगिरी अफलातूनच होती. फलंदाज म्हणून आणि धोरणी कर्णधार म्हणूनही! ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा संघाची अवस्था नाजूक होती, दोन बाद १३. समोर क्रेग मॅकडरमॉट आणि ब्रूस रीड यांचा तोफखाना सुरू होता. सलामीचा रॉड लॅथम बाद झाला तेव्हा संघाच्या धावा होत्या ५३. तिथून पुढं क्रोनं सूत्रं हाती घेतली. केन रुदरफोर्डला साथीला घेऊन त्यानं चौथ्या जोडीसाठी ११८ धावांची भागीदारी केली. डाव संपायला एक चेंडू बाकी असताना त्यानं शतक पूर्ण केलं. एकूण ११ चौकारांसह १३४ चेंडूंमध्ये नाबाद १००. कर्णधाराला साजेशी खेळी.
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड बून व जिऑफ मार्श यांना दुसऱ्याच षटकात आश्चर्याचा मोठा धक्का बसला. ख्रिस केर्न्स याचं षटक संपल्यावर मार्टिन क्रोनं चेंडू दिला फिरकी गोलंदाज दीपक पटेल याच्याकडे. त्याची भरपूर पिटाई होणार असं समालोचनकक्षात बसलेल्या दिग्गजांना वाटत असताना पटेलनं पहिल्या सात षटकांत फक्त १९ धावा दिल्या. नंतर त्यानं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅलन बॉर्डर याचा बळी मिळवला. ‘जुगार’ म्हणवला जाणारा डाव क्रोनं फत्ते ठरवला होता.
पहिल्या सामन्यातील शतकानंतर फलंदाज म्हणूनही क्रोनं स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्ध पाच आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद तीन अशा खेळींनंतर त्याचा तडाखा बसला तो झिम्बाब्वे संघाला. त्या सामन्यात त्यानं ८ चौकार व २ षटकारांसह ४३ चेंडूंमध्ये ७४ धावा तडकावल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध ८१ चेंडूंमध्ये नाबाद ८१ (डझनभर चौकार), भारताविरुद्ध नाबाद २६, इंग्लंडविरुद्ध ८१ चेंडूंमध्ये नाबाद ७३ (चार चौकार) असा रतीब घालत तो संघाला विजयाकडे नेत राहिला. साखळीतील शेवटच्या सामन्यात, पाकिस्तानविरुद्ध मात्र क्रोला जेमतेम तीन धावा काढता आल्या. उपांत्य फेरीत पुन्हा पाकिस्तानविरुद्ध ८३ चेंडूंत त्यानं ९१ धावा फटकावल्या. त्यात त्याचे सात चौकार व तीन षटकार होते. एकूण तीन वेळा तो सामन्याचा मानकरी ठरला.
स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या मार्टिन क्रो यानंच. त्यानं ११४च्या सरासरीनं तब्बल ४५६ धावा कुटल्या. त्याचा स्ट्राइक रेट ९०.४३ होता. म्हणूनच सर्वानुमते तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. विश्वचषकस्पर्धेत असा बहुमान मिळवणारा तो पहिला खेळाडू!
मात्र केवळ फलंदाजीमुळे क्रोची यासाठी निवड झाली, असं म्हणणं त्याच्यातील कर्णधारावर अन्याय केल्यासारखं होईल. सामन्यागणीक त्यानं कर्णधार या नात्यानं आपली गुणवत्ता सिद्ध केली. विविध कारणांनी आगळ्यावेगळ्या ठरलेल्या या स्पर्धेची काही वैशिष्ट्यं वाढवण्यास त्यानंही हातभार लावला. नवा चेंडू फिरकी गोलंदाजाच्या हाती ठेवण्याची कल्पना त्यातलीच एक. (खरं तर १९७९च्या स्पर्धेत त्याच्याच संघाविरुद्ध भारतानं हा प्रयोग केला होता. तेव्हा भारताचा कर्णधार व्यंकटराघवन यानं डावातील दुसऱ्या षटकासाठी चेंडू बिशनसिंग बेदीच्या हातात दिला होता!)
‘पिंच हिटर’ संकल्पनेचा जनकही क्रो हाच होता. पहिल्या १५ षटकांमध्ये असणारे क्षेत्ररक्षणाचे निर्बंध लक्षात घेऊन, त्याचा फायदा उठवण्यासाठी स्फोटक खेळ करणाऱ्या मार्क ग्रेटबॅच याला सलामीला पाठवण्याचा निर्णय त्यानं घेतला. तीन अर्धशतकांसह ३१३ धावा तडकावून ग्रेटबॅचनं कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. तो दोन वेळा सामन्याचा मानकरी ठरला. जलदगती गोलंदाजांपेक्षा मध्यमगती गोलंदाजावर विश्वास टाकण्याची क्रोची खेळीही यश देऊन गेली. कल्पक धोरणं आखणारा आणि त्याची अंमलबजावणी करणारा कर्णधार होता तो. त्यामुळेच अंतिम सामना खेळलेल्या दोन्ही संघांमधील कोणत्याही खेळाडूऐवजी मार्टिन क्रो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला.

अंतिम सामन्यात अक्रम सर्वोत्तम
मेलबर्न इथे २५ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचा २२ धावांनी पराभव केला. इंग्लंडला तिसऱ्या वेळी अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानकडून अष्टपैलू खेळ करणारा वसीम अक्रम सामन्याचा मानकरी ठरला. त्यानं आधी मोक्याच्या वेळी १८ चेंडूंमध्ये ३३ धावा तडकावल्या. नंतर १० षटकांत ४९ धावा देऊन तीन गडी बाद केले; त्यात इयान बॉथम आणि अॅलन लँब यांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link