Next
संवादिनी (भाग २)
मोहन कान्हेरे
Friday, February 08 | 04:00 PM
15 0 0
Share this storyपूर्वीच्या काळी पेटीला ‘बाजा’सुद्धा म्हणत. लाकडी पेटीला आवश्यक असलेल्या दोन मुख्य गोष्टी म्हणजे की-बोर्ड आणि भाता. या भात्यामुळे पेटीच्या खालील भागात हवा कोंडली जाते आणि की-बोर्डवरील एक किंवा अधिक सूरपट्टी दाबल्यानंतर कोंडलेली हवा बाहेर पडते, सूरनिर्मिती होते. साधारणपणे पेटीला साडेतीन सप्तकं असतात. सप्तक म्हणजे सात सुरांचा समूह. सा रे ग म प ध नी हे सात सूर तुम्हाला ऐकून माहीत असतीलच. सप्तकं तीन असतात. मंद्र, मध्य आणि तार अशी त्यांची नावे आहेत. आपण जेव्हा पेटी विकत घेतो तेव्हा ती ट्यून (सुरांत लावलेली) केलेलीच असते. ‘काही महिने वापरानंतर आमच्याकडे घेऊन या, आम्ही तिचं परत एकदा ट्युनिंग करून देऊ,’ असंही काही विक्रेते सांगतात. पेटी नेहमीच्या वापरात असेल तर उत्तम सेवा देते, नुसतीच कव्हरमध्ये ठेवली तर कालांतरानं तिचं सर्व्हिसिंग करावं लागतं. हे वाद्य वाजवण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षणच घ्यावं लागतं. सूरपट्ट्या दाबण्याची बोटं ठरलेली असतात. ती आपल्या गुरूकडून शिकून घटवून घ्यायची असतात. जलद गतीनं वादन करताना मग समस्या येत नाही.

हे वाद्य मधुर आहे, गाणाऱ्याला स्वरसाथ मिळत राहते म्हणून खूप प्रिय आहे. मात्र या वाद्याची मोठी कमतरता म्हणजे त्यातून मींड मिळत नाही. ‘मींड’ म्हणजे स्वरसमूह न तुटता सलग, घसरत, वर किंवा खाली वाजणं! एखादा कलाकार कसलेला असेल तर मींडचा आभास निर्माण करू शकतो. ते ऐकताना श्रोते बेहद्द खूश होतात. अशा कलाकाराची बोटं गरजांनुसार एक तर पेटीवर हळुवार फिरतात किंवा स्वरांवर आघात करून आवश्यक परिणाम साधतात. तुम्ही मुलं जितकं गायन, वादन ऐकाल तितके तुमचे कान तयार होतील आणि स्वरज्ञान प्राप्त होईल.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link