Next
वृद्धांसाठी आनंदसेवा
वासंती वर्तक
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

सकाळची प्रसन्न वेळ. वीस-पंचवीस ज्येष्ठ नागरीक आवारात वावरत आहेत. वाऱ्याच्या एका झुळुकेबरोबर एक खमंग वास दरवळत येतो आणि क्षणार्धात साऱ्यांचे चेहरे खुलतात. वा... नाश्त्याला काहीतरी खास बेत दिसतोय. त्या दिवशीचा, खास ज्येष्ठांसाठी केलेला आरोग्यदायी मिसळपावचा बेत साऱ्यांची मनं जिंकून घेतो. मग ही खुशी पुढे महिनाभर टिकून राहते. कारण नेहमीच्या उपमा-पोहे-शिरा-थालीपीठाचा चौकोनी मेनू ओलांडून अप्पे, उत्तप्पा, पावभाजी, वडापाव असे चटकदार पण कटाक्षानं न बाधणारे पदार्थ नाश्त्याला मिळू लागतात. महिन्याचा मेनू १७ पदार्थांत विस्तारतो.
हळूहळू बागेचा कायापालट होतो. दर महिन्याला एखादा छानसा उद्बोधक करमणुकीचा कार्यक्रम सुरू होतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातील लोक संस्थेत येऊ-जाऊ लागतात. नवनवीन माणसं, गप्पा, खेळ, टीव्ही... एक चैतन्य जाणवायला लागतं. नामवंत व्यक्ती, कलाकारही संस्थेला भेट देतात. नवीन व्यवस्थापक, वृद्ध मंडळींचं व्यवस्थापन उत्तम करत आहे अशी भावना निर्माण होते.
हो, पण हे वर्णन आहे कुठलं ते सांगायचंच राहिलं की! हा आहे भिवंडीजवळील अनगाव इथला ‘वानप्रस्थी आश्रम’ आणि गेल्या वर्षी जयंत गोगटे हे तिथे व्यवस्थापक म्हणून रुजू झाले आहेत.
आतापर्यंत वानप्रस्थी आश्रमात फक्त हिंडते-फिरते ज्येष्ठच राहत असत. पण आता अगदी बिछान्याला खिळलेले परावलंबी ज्येष्ठही सामावून घेतले जातात. कारण तीच खरी गरज असते. यात व्यवस्थापकांची जबाबदारी नेमकी काय? यावर गोगटे हलकंसं हसतात. अगदी सकाळच्या चहा-नाश्त्यापासून रात्री सर्वजण आपापली औषधं घेऊन झोपेपर्यंत! डॉक्टरांच्या भेटीपासून देणग्या आणि खर्चाच्या हिशेबापर्यंत, बागेच्या पाण्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंत सारंच येतं की!
गोगटे सांगत होते, मी आल्याबरोबर नियम थोडे शिथिल केले. मोडले नाहीत पण जरूरी आहे तिथे वाकवले. स्वातंत्र्य मिळालं की माणसं आनंदात राहातात. दिनक्रमात थोडी शिस्त ठेवली. थोडं मानसशास्त्र जाणून प्रेमानं बरेच प्रश्न सुटतात. मग या कामातलं आव्हान काय? मी स्पष्टच विचारलं. कारण इथे वीस-पंचवीस ‘दुसरं बालपण’ उपभोगणाऱ्या व्यक्ती दिवसभर एकत्र असतात. गोगटे म्हणाले, “त्यांचा व्यक्तिगत मानपमान, भांडणं, वादविवादात मी फारसा पडत नाही. ते अवघड वाटलं सुरुवातीला. पण मग लक्षात आलं दिवसभर काहीही झालं तरी संध्याकाळी सिरियल बघण्यासाठी सारे एकत्र येतात. माझं काम सिरियलच सोपं करतात.”
अनगावला असलेल्या या आश्रमाला व्यवस्थापकाची गरज आहे कळल्यानंतर जयंत गोगटे आपणहून त्यांच्याकडे गेले. त्यांची एकच अट होती. “मी केलेल्या कामाचा कणभरही मोबदला घेणार नाही. फक्त केलेल्या कामाची तुम्हाला किंमत असावी. सेवेची बूज राखली जावी. माझ्याच असं नव्हे तर प्रत्येकाच्याच सेवेचं महत्त्व जाणावं.”
ही एवढी निरपेक्ष सेवावृत्ती आली कुठून? तर गेली दहा-पंधरा वर्षं गोगटे दांपत्य भाइंदरच्या सुबोध विद्यालय आणि कार्नेशन इंग्लिश स्कूलचं काम हौसेनं पाहत होते. त्यातील विविध स्पर्धा, मुलांच्या व्यक्तिविकासाचा भाग त्यांनी सांभाळला, तर पत्नी संस्कृत शिकवत. संस्थेचे अध्यक्ष सन्मित्र मिलिंद लिमये यांच्यासोबत गोगटे यांनी शाळेच्या विकासात भाग घेतला. भाइंदरच्या ब्राह्मणसभेचं कार्याध्यक्षपद सांभाळलं. कोचिंग क्लासेसमध्ये शिकवलंही. परंतु पत्नीला दुर्धर रोगानं गाठलं. तीन-चार वर्षं गोगटे आणि मुलांनी भरपूर खर्च केला, सेवा केली पण यश आलं नाही. “मी पुन्हा शून्यावर येऊन उभा राहिलो. तिथेच ठरवलं की आता कमवायला नको, गमवायला नको. सुदैवानं दोन्ही मुलं उत्तम शिकली. एक शेफ आहे आणि एक पत्रकार. मुलांनी मला पाठिंबा दिला अन् मी इथे दाखल झालो.”
आठवड्यातून एकदा गोगटे अंबरनाथला घरी जातात. मुल-नातवंडांत रमतात आणि पुन्हा आपल्या सेवेला हजर राहतात. मुलं म्हणतात, “बाबांनी आतापर्यंत खूप कष्ट केले. अत्यंत हुशार, पण व्यावसायिक यश लाभलं नाही. काही कमी नाही, पण भरपूरही नाही.” सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरपासून केमिकल कंपनीपर्यंत आणि मराठी स्पेशल सर्व वस्तूभांडारापासून पद्धतशीर पौरोहित्य करण्यापर्यंत सर्व व्यवसायात गोगटे प्रवीण झाले. मग आतातरी बाबांना त्यांच्या मनासारखं काम करू दोन्ही मुलांची मनापासूनची इच्छा. दूरदर्शनवर गोगटे यांनी वृत्तविभागात भाषांतराचं काम केलं. बातम्यांचं संपादन केलं. पण ते अनेक वर्षं रोजंदारीवर राहून.
उद्योगी स्वभाव आणि कष्टाचं शरीर त्यामुळे स्वस्थ बसवत नाही. उद्या आपण वृद्ध होणारच. मग आजच वृद्धांसमवेत राहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवायला निमित्तमात्र झाल्याचं समाधान आज गोगटे उपभोगत आहेत. ते म्हणतात, “प्रत्येक वृद्ध कौटुंबिक ताण सोसतो, शरीराचे भोगही ज्याचा त्याचा तोच भोगतो. बस हे वृद्धत्व आपण सुसह्य करायचं.” यापेक्षा अधिक चांगला सदुपयोग कोणता? स्वत:च्या शक्तींचा आणि वेळेचा... नाही का?”

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link