Next
प्रतिसाद
प्रफुल्लचंद्र काळे, प्रसाद दीक्षित, मंगेश पांडुरंग निमकर, अर्चना
Friday, November 16 | 05:30 PM
15 0 0
Share this story

नवीन जाणीव निर्माण करणारा अग्रलेख
‘झी मराठी दिशा’च्या दि. २७ ऑक्टोबरच्या अंकातील ‘आवाजाची दुनिया’ हा अग्रलेख वाचला. दृक्-श्राव्य वारसादिनाच्या निमित्ताने लिहिलेला अत्यंत छान आणि विचारप्रवर्तक असा हा अग्रलेख आहे. एकापेक्षा एक अशी विविध माध्यमे सध्या सहजगत्या आपल्याला उपलब्ध आहेत. रेडिओ ते डिजिटल तंत्रज्ञान आणि यापुढील विज्ञानाची झेप काय असेल, याची कल्पनादेखील करता येत नाही. परंतु ही माध्यमे लोकहितासाठी आणि सर्वांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी असावीत, हीच एक अपेक्षा आहे. ही जाणीव निर्माण करण्यासाठी ‘झी मराठी दिशा’मधील अग्रलेख अत्यंत योग्य आहे.
प्रफुल्लचंद्र काळे, सातपूर कॉलनी, नाशिक
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

जुने ते सोने!
‘झी मराठी दिशा’च्या दि. २७ ऑक्टोबरच्या अंकातील ‘चित्र-वाणी’ या विशेष विभागामधील विविध लेख आणि याच अंकातील ऑनलाइन धमाक्यावरील लेख एकत्र वाचणे, हा एक अनोखा योगायोग वाटला. वेगाने बदलत जाणाऱ्या जगात जुने कसे आणि का टिकून राहते हा समान धागा दोन्हींकडे  जाणवला. इतक्या गोष्टी सहजपणे ऑनलाइन मिळत असताना रस्त्यावरच्या विविध दुकानांतली गर्दी जशी कमी होत नाही, तसेच इतकी दृक्-श्राव्य माध्यमे, समाजमाध्यमे येऊनही रेडिओच्या स्थानाला धक्का लागत नाही. माहिती-तंत्रज्ञानातील अद्ययावत प्रणाली वापरून ऑनलाइन कंपन्या ग्राहकांना जास्तीत जास्त ‘पर्सनलाइज्ड’ सेवा देऊ पाहतात; परंतु ग्राहकांना व्यक्तिगतरीत्या ओळखणाऱ्या, त्यांच्या आवडीनिवडी जाणणाऱ्या दुकानदाराशी त्याची तुलना होऊ शकत नाही. वृत्तवाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आशयघन वृत्तपत्रे, नियतकालिके आपापले स्थान टिकवून आहेत. तसेच काहीसे रेडिओचेही आहे. एकाच वेळी अनेक इंद्रियांचा ताबा घेऊन करमणुकीच्या नावाखाली त्यांना शिणवू पाहणाऱ्या माध्यमांच्या गर्दीत फक्त निखळ श्रवणेंद्रिय-सुख देणाऱ्या रेडिओचे महत्त्व भविष्यातही नक्कीच टिकून राहील. या ‘चित्र-वाणी’ विभागातील लेखांप्रमाणेच दर्जेदार लेख ‘झी मराठी दिशा’ने वाचकांना देत राहावे, हीच अपेक्षा!      
प्रसाद दीक्षित, ठाणे

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

दूरदर्शनने स्वत:चे अॅप काढावे
दूरचित्रवाणी काल, आज आणि उद्या हा दूरदर्शनची माहिती देणारा लेख आवडला. किलबिलपासून नाट्यावलोकनापर्यंत सगळेच कार्यक्रम दर्जेदार असायचे. काळ पुढे सरकतो तसे नवीन काही बदल होतात आणि जुने आठवणीच्या कप्प्यात जाऊन बसतात. नव्या पिढीला मुंबई दूरदर्शनचा सुवर्णकाळ कसा होता हे कळले पाहिजे. त्यासाठी हे सारे गाजलेले कार्यक्रम सोशल मीडियावर प्रक्षेपित झाले पाहिजेत. मुंबई दूरदर्शनने स्वत:चे अॅप अथवा यूट्यूब चॅनेल काढून त्यांच्या साहाय्याने नव्या पिढीशी नाते जोडले पाहिजे. नाहीतर हे सारे संचित इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही.                  
मंगेश पांडुरंग निमकर, कळवा

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

वैचारिक फराळाचा विशेषांक
‘झी मराठी दिशा’चा ‘उत्सव प्रकाशाचा’ हा दिवाळीविशेषांक खास लेखांची मेजवानी घेऊन आला आणि दिवाळीसणाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली. या विशेषांकात माहितीपूर्ण लेख, वैचारिक फराळ आणि मन प्रसन्न करणारे असे बरेच काही होते. दिवाळी शुभेच्छा देता-घेताना ‘झी मराठी दिशा’ची आठवण येणार असेच लिखाण आम्हा वाचकांना मिळाल्यामुळे रोजच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी नवी उमेद मिळून मनोबलही वाढले.     
अर्चना काळे, नाशिक


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link