Next
कैवल्यप्राप्तीची साधना
मानसी वैशंपायन
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

स्वामी विवेकानंद म्हणतात, की शरीरामधील किंवा बाहेरील एखाद्या स्थानावर मन स्थिर करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत गेल्यास त्या दिशेने प्रवाहित होण्याची शक्ती मनात येते. मनाच्या या अवस्थेला ‘ध्यान’ म्हणतात. ही ध्यानशक्ती इतकी वृद्धिंगत होते, की अनुभूतीचे बहिरंग हरवून तिच्या केवळ अंतरंगावर म्हणजेच अर्थावर मन ध्यानस्थ होऊन जाते. त्यावेळी त्या अवस्थेलाच समाधी म्हणतात. जिवाला उपलब्ध असलेल्या सर्व अवस्थांमध्ये ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. जोपर्यंत इच्छा आहेत, वासना आहेत तोपर्यंत खरे शाश्वत सुख प्राप्त होणार नाही. जेव्हा या ध्यानावस्थेतून साक्षीभावनेने सर्व वस्तूंकडे बघता येते तेव्हाच खऱ्या शाश्वत सुखाचा लाभ होतो.
समाधीचा सतत अभ्यास केला, तर मनाची चंचलतेकडे जी प्रवृत्ती असते ती तर नष्ट होतेच, त्याचबरोबर सत्प्रवृत्तीही नाहीशी होऊन जाईल. सत् व असत् दोन्ही प्रकारच्या प्रवृत्तींचा निरोध झाल्यामुळे आत्मा सर्व प्रकारच्या बंधनातून विमुक्त होऊन तो आपल्या सर्वज्ञ, सर्वव्यापी व सर्व शक्तिमान स्वरूपात प्रकट होतो.
धारणा, ध्यान व समाधी या तिन्ही साधना एकत्र झाल्या, की त्यास ‘संयम’ म्हणतात. यातील प्रत्येक साधनेला तीन पैलू आहेत. ते म्हणजे ध्याता, ध्यान व ध्येय. या त्रिपुटीमुळेच साधनेची प्रक्रिया पूर्ण होते. या तिन्हीमध्ये ‘ध्येय’ या अंगास महत्त्वाचे स्थान आहे. कैवल्यावस्थेची प्राप्ती करणे हे योगाभ्यासाचे उद्दिष्ट, अंतिम ध्येय आहे. ध्यानक्रिया ही ध्येयाधिष्टीत असते. साधकाच्या रोमरोमात ध्येयविषयच भरलेला असतो. ध्येयविषयाच्या ओढीमुळे व गोडीमुळे साधकाला बाकी सारे जग अगदी नगण्य वाटू लागते. विठ्ठलभक्तीच्या परिसीमेमुळे संत नामदेवांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ विठ्ठलाचेच रूप दिसत होते.
सबीज समाधीत बीजरूपात ‘मी’ शिल्लक असते व साधक पुन्हा भौतिक जगात परत येतो. कैवल्यावस्था प्राप्त झाली, की संपूर्ण ‘मी’ संपून परत भौतिक जगात येण्याचे प्रयोजन साधकाला उरत नाही.
अंतरंगयोगसाधनेत ध्याता (ध्यान करणारा) हा ध्येय प्राप्तीची इच्छा ठेवणारा, तर ध्यान हे माध्यम व ध्येय हे साध्य आहे. ध्यानसाधनेतील यश हे सर्वस्वी ध्यात्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. हा ध्याता म्हणजे नेमके कोण? तर माणसातील ‘मी’पणाचे प्रतिनिधित्व करणारे मन. आता हे मन चंचल, वेगवान, अगम्य, अनाकलनीय, गहन अशा ध्यात्याच्या भूमिकेत असते. ज्ञानदेव म्हणतात, की ‘वाहणे’ हा मनाचा धर्म आहे. पूर आलेल्या नदीच्या प्रवाहात जसा दुधी भोपळा सहज वाहत जातो. तसे मनोरथांच्या प्रवाहात मन सदा वाहत असते. विवेकबुद्धीला फसवणारे हे मन समाधान नष्ट करते. मनाच्या ठायी हे सारे अवगुण असले तरी या मनाचा एक चांगला गुणही आहे. गुळाला चिकटणाऱ्या मुंगळ्याप्रमाणे मन आवडीच्या, प्रिय विषयाला चिकटून राहते. अगदी मृत्यू आला तरी सोडत नाही. अशा या मनाला एकदा जरी ध्यानसुखाचा अनुभव मिळाला व त्यातील गोडी त्याला कळली तर मग मन ध्यानसाधनेत रमून जाईल.
या त्रिपुटीतील दुसरे अंग आहे ध्यान. ध्यान देणे हे मनाचे कार्य आहे. ध्यान म्हणजे मनाचा सहभाग. ध्यान देऊन ऐकणे, ध्यान देऊन पाहणे, ध्यान देऊन स्वाद घेणे असे शब्दप्रयोग आपण करतो. मनाचे अवधान इतके सखोल असते, की ध्यात्याला विषयाचा प्रत्यय दीर्घकाळ, सतत येत राहतो.
तिसरे व महत्त्वाचे अंग म्हणजे ध्येय. ध्येय विषय ध्यात्याच्या आवडीचा असेल तर ध्यानाची सहज गोडी व सवय लागते. योगशास्त्रात योगाचे अंतिम ध्येय आहे सबीज समाधी व त्यानंतर निर्बीज समाधी किंवा कैवल्यावस्था प्राप्त करणे. ही अवस्था माणसाच्या मनाच्या किंवा बुद्धीच्या आकलनाच्या पलिकडे असल्यामुळे त्या स्थितीत काय अनुभव येतो हे कोणालाही सांगता येत नाही. कारण अनुभव देणारी बुद्धी व मनच त्या अवस्थेत नसते. केवळ मूळ चैतन्यच असते, अशी योगशास्त्राची धारणा आहे.
स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस हे कालीमातेचे परमभक्त होते. कालीमातेने त्यांना दर्शन दिले होते. त्यामुळे कालीमातेच्या आराधनेत ते इतर साधकांनाही विसरून जात. एकदा रामकृष्ण परमहंस कालीमातेच्या समाधीत दंग झाले असताना एक श्रेष्ठ योगी तोतापुरी महाराज त्यांना भेटायला आले. भानावर आल्यावर रामकृष्ण परमहंसाना तोतापुरी महाराज म्हणाले, “कालीमातेवर तुमची असीम निष्ठा आहे, पण ही सगुण उपासना तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा ठरू शकते. कैवल्यावस्था प्राप्त होण्यासाठी कालीमातेच्या सगुणभक्तीचा त्याग करावा लागेल. यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले, “कालीमाता माझी जीव की प्राण आहे. मी तिच्याशिवाय कसा जगू?” तोतापुरी महाराज म्हणाले, “कालीमातेने ध्यानात दर्शन दिले, की निग्रहाने तिचे दोन तुकडे करून दूर फेकून द्या म्हणजे स्वत:च्या मूळ स्वरुपात विलीन व्हाल.” “पण मला हे नाही जमणार” रामकृष्ण म्हणाले. दुसऱ्या दिवशी दोघेही ध्यानस्थ झाले. दोघांचीही सबीज समाधी लागली. विशेष सिद्धी प्राप्त असलेल्या तोतापुरी महाराजांनी रामकृष्णांच्या मनातील सगुण कालीमातेचे दोन तुकडे करून फेकून दिले, त्याबरोबर रामकृष्ण परमहंसांची मनोकायिक अवस्था संपून ते शून्यात विलीन झाले. या कैवल्यावस्थेतून बाहेर आल्यावर त्यांना हे काहीही आठवेना. मग ते वारंवार निर्बीज समाधी अवस्थेत राहू लागले.
योगाभ्यासाच्या सर्वसामान्य अभ्यासकांना, साधकांना समाधी अवस्थेपर्यंत व त्यातूनही निर्बीज समाधी अवस्थेपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण आहे, परंतु सुदृढ शरीर व आनंदी मन इतके किमान नक्कीच साध्य करता येईल. योगाभ्यास ही आपली जीवनशैली झाली तर आयुष्याचा प्रवास ही नुसती यातायात न होता ‘आनंदयात्रा’ होईल हे नक्की!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link