Next
क्रिकेटचे ‘लाड’के प्रशिक्षक!
नितीन मुजुमदार
Friday, July 19 | 03:00 PM
15 0 0
Share this story

तो  बारा वर्षांचा मुलगा त्यांच्या नजरेस पडला तो एक ऑफस्पिनर म्हणून. तेव्हा त्यांच्यातील पारखी नजरेने त्याच्यातील क्रिकेटपटू हेरला, त्याला फीमाफीची सवलत शाळा व्यवस्थापनाकडून मिळवून देत, शाळा बदलायला लावून त्या प्रशिक्षकाने त्या मुलातील क्रिकेटपटूला स्वतःच्या पंखांखाली घेतले आणि मुलातील क्रिकेटपटू घडवण्यास सुरुवात केली. काही काळ तो शाळेच्या संघाकडून ऑफस्पिनर म्हणूनच खेळला. एक दिवस सर शाळेत येताना त्यांना एक मुलगा बॅटीने पाठमोरा नॉकिंग करताना दिसला, सरांच्या चाणाक्ष नजरेने त्या मुलातील ‘फलंदाज’ ओळखला. ते थांबले, त्याच्याशी थोडी बातचीत केली आणि... आणि लगेच त्याला नेटमध्ये फलंदाजी करण्यास पाठवलेदेखील! तेथेच ऑफस्पिनर रोहित शर्माच्या जागी एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांचा बादशाह रो‘हिट’ शर्माचा जन्म झाला होता!
रोहित शर्मातील फलंदाज त्याच्या लहानपणीच ओळखणाऱ्या दिनेश लाड यांच्याशी खास बातचीत करताना, लहानग्या सचिनच्या क्रिकेटसाठी धावपळ करणाऱ्या आचरेकरसरांची हमखास आठवण होते. योगायोग म्हणजे दिनेश लाड हेदेखील आचरेकरसरांचेच शिष्य. १९७६ ते १९८१ अशी पाच वर्षे लाडसरांनी आचरेकरसरांकडे प्रशिक्षण घेतले. आणखी एक योगायोग म्हणजे आचरेकर व लाड या गुरुशिष्यांच्या जोडीने प्रशिक्षक म्हणून वेगवेगळ्या वेळी भारताला एक एक महान फलंदाज दिला आहे. आचरेकरसरांनी सचिनला घडवले तर दिनेश लाड यांनी रोहितच्या सुप्त गुणवत्तेला आकार दिला.
दिनेश लाड यांचा जन्म १६ मार्च १९६१ रोजी मुंबईत गिरगाव येथे झाला. हे कुटुंब मूळचे गोव्याचे. लोकमान्य विद्यामंदिर, माहीम ही त्यांची शाळा तर रुपारेल हे त्यांचे महाविद्यालय. १९८२ साली ते रेल्वेमध्ये खेळाडू म्हणून रुजू झाले. काळाच्या ओघात तेथे प्रशिक्षक-मेंटर म्हणूनही काम केले.
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल या बोरीवलीतील शाळेच्या क्रिकेटसंघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द प्रामुख्याने ओळखली जाते. प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची एक छान आठवण त्यांनी सांगितली. ते म्हणाले, “१९९८ साल असावे. एकदा एका आंतरशालेयस्पर्धेत आमची गाठ होती शारदाश्रमबरोबर. सामना जिंकल्यावर अचानक पाठीवर कौतुकाची थाप कोणाची पडली हे बघण्यासाठी मागे बघतो तर काय दस्तुरखुद्द आचरेकरसर! माझ्या संघाच्या कामगिरीचे कौतुक आचरेकरसरांनी केले ही माझ्या कारकिर्दीतील एक अत्यंत सुखद आठवण.”
रोहितबरोबरच शार्दूल ठाकूर, स्वतःचा मुलगा उगवता फलंदाज सिद्धेश लाड, हरमितसिंग हे लाड सरांचेच शिष्य. शार्दूल ठाकूर शाळेपासून ६० किलोमीटर दूर असलेल्या पालघरचा. त्यामुळे दहावीच्या वर्षी तर तो लाडसरांच्या घरीच राहिला होता. अतिफ अत्तरवाला हा उदयोन्मुख डावरा अष्टपैलू खेळाडू ओळख नसतानाही सरांकडे प्रदीर्घ काळ राहिला होता, हे त्यांच्या गुरुशिष्य नात्याचा पदर उलगडवून दाखवणारे एक प्रातिनिधिक उदाहरण. लाडसरांचा मुलगा सिद्धेश वडिलांविषयी बोलताना म्हणतो, “वडिलांनी मला क्रिकेट केवळ गंभीरपणे खेळायलाच शिकवले असे नाही, तर या खेळाचा आदर करायलाही शिकवले. माझ्या खेळाचा पायादेखील त्यांनी पक्का केला. तुम्ही इतर कितीही प्रगती केली तरी तुमचा पाया पक्का नसेल तर अवघड परिस्थितीत तुम्हाला टिकणे अवघड होते असे ते नेहमी सांगतात.” सिद्धेश गेली काही वर्षे मुंबईकडून खेळताना अक्षरशः खोऱ्यांनी धावा काढतोय. अगदी अलीकडे तर तो मुंबई संघाचा ‘क्रायसिस मॅन’ म्हणून ओळखला जातोय. गेल्या वर्षीच त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले. भारतीय ‘अ’ संघाकडूनही त्याने संधी मिळेल तशी उत्तम कामगिरी केली आहे.
‘मी मुलांना अतिशय सुरुवातीच्या, म्हणजेच त्यांचे क्रिकेट जडणघडणीच्या काळात प्रशिक्षण देतो. माझ्याकडे अगदी लहान वयात मुलं येतात तेव्हाच त्यांच्या खेळाचे तंत्र पक्के करणे महत्त्वाचे असते. नंतर मी त्यांच्या तंत्रात फार बदल सुचवत नाही”, असे लाडसरांनी सांगितले. रोहितबद्दलची एक आठवण सर सांगतात, “ऑस्ट्रेलियात कॅनबेरा येथे तिरंगीस्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध रोहितने ७० चेंडूंत ६४ धावा केल्यावर सरांशी रोहित फोनवर बोलला,“सर, मैने अच्छा किया ना, आपने देखी ना मेरी बॅटिंग?” तेव्हा रोहितने भारतीय संघात नुकताच प्रवेश केला होता. आतादेखील विश्वचषकाआधी त्याच्याशी बोलताना सरांनी त्याला “तू जास्तीत जास्त वेळ विकेटवर थांब, धावा आपोआप होतील” असा सल्ला दिला होता.
आजही लाडसरांचे क्रिकेट प्रशिक्षण स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या छोट्या मैदानावर चालू असते आणि महत्त्वाचे म्हणजे ते निःशुल्क असते. लवकरच लाडसरांकडे मुंबईच्या मुलांच्या १६ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात येणार आहे. गेली २५ वर्षे लाडसर क्रिकेट प्रशिक्षण देत आहेत. सुवेद पारकर, आयुष जेठवा, आर्यन बढे, अद्वैत व अर्जुन लोटलीकर, मानस पाटील ही सरांकडे प्रशिक्षण घेणाऱ्या काही उदयोन्मुख लहानग्या क्रिकेटर्सची नावे. आपल्या मुलीच्या मुलाला, तीन वर्षांचा नातू रणवीरलादेखील सर प्रशिक्षण देत आहेत. आपल्या कारकिर्दीत पत्नी दीपाली यांची साथ महत्त्वाची असल्याचे लाडसर आवर्जून नमूद करतात.
‘The interesting thing about coaching is that you have to trouble the comfortable and comfort the troubled’ हे ऑस्ट्रेलियाचा माजी हॉकीपटू रिक चार्ल्सवर्थचे अवतरण, लाडसरांनाही भावलेले आणि यातच त्यांच्या प्रशिक्षणाचे सार असावे!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link