Next
गणित, बुद्धिमत्तेच्या ट्रिक्स आणि टिप्स
फारुक नाईकवाडे
Friday, May 31 | 02:15 PM
15 0 0
Share this story


राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर दोन म्हणजेच सी सॅट पेपरमधील गुणांच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा घटक आहे अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता. तीन उपघटकांवर एकूण २५ प्रश्न विचारले जातात. या ढोबळ वर्गीकरणात समाविष्ट असणारे प्रश्नांचे पुन्हा खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आयोगाने यापूर्वी राज्यसेवा परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे प्रकार व त्यांचे स्वरूप हे मागील लेखात आपण पाहिले. या लेखात त्यांची तयारी व सरावाबाबत चर्चा करूया.

अंकगणित  
सर्वसाधारणपणे या उपघटकामध्ये गणिती क्रियांवर ६ ते ८ प्रश्न आणि संख्यामालिकेवर २ ते ५ प्रश्न विचारण्यात येतात.
  • पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ व घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असल्यास ही गणिते झटपट व आत्मविश्वासाने सोडवता येतात.
  • संख्यामालिका, आकृतीमधील गणिती प्रक्रिया सोडविण्यासाठी १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. या बेसिक्सबरोबर अंकाक्षरमालिकाही विचारण्यात येत आहेत.
  • शेकडेवारी, व्याज, नफा-तोटा, भागीदारी, गुणोत्तरप्रमाण, समीकरणे, काळ-काम-वेग-अंतर, माहितीचे विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिले पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.
नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच, परंतु हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.
तर्कक्षमतेच्या प्रश्नांमध्ये डेटा सफिशिएन्सीचे उपयोजन करण्यासारखे प्रश्नही विचारण्यात येत आहेत.

तर्कक्षमता
तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्षपद्धती, नातेसंबंध, बैठकव्यवस्था हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास व त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडवता येतात.
निष्कर्षपद्धतीतील विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.
नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वतःस कल्पून ते प्रश्न सोडवावेत. मागील काही वर्षांपासून दिलेली माहिती नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पर्याप्त आहे किंवा कसे अशा प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे डेटा सफिशिएन्सी आणि नातेसंबंध यांची सांगड घालता येणे आवश्यक आहे.
बैठकव्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.
घड्याळातील काट्यांचे कोन, आरशातील प्रतिमा, कॅलेंडरमधील लीप इयरचा विचार या बाबी सरावाने सोप्या होतील.
  • दिशांबाबतच्या प्रश्नांमध्ये सरळ सांगितलेल्या मार्गाचे आरेखन करत गेल्यास योग्य उत्तर लवकर सापडते.

बुद्धिमत्ताचाचणी

व्यक्तींच्या माहितीच्या संयोजनावरील प्रश्न सोडविताना टेबलमध्ये माहिती भरत गेल्यास अचूक उत्तर व कॉम्बिनेशन्स सापडतात.
आकृतिमालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषणक्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. यामध्ये घड्याळाच्या काट्याच्या किंवा उलट्या दिशेने ठरावीक कोनांतून बदलणारे स्थान किंवा दोन आकृत्यांच्या बेरीज वा ठरावीक स्थांनावरील घटकांची वजाबाकी अशा प्रक्रियांच्या आधारे उत्तरे शोधता येतात.
अक्षरमालिका आणि अंकाक्षरमालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलट्या क्रमाने लिहावी व त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. याआधारे अक्षरमालिका, अंकाक्षरमालिका व आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत. सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत.
इनपूट-आऊटपूट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द-संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत.
हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. पाचवी व आठवीची स्कॉलरशिपची गाईड्स; आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाईड्स; तसेच स्पर्धापरीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा. राष्ट्रचेतनाचे राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे, तसेच अगरवाल यांचे यावरील पुस्तक यासाठी उपयोगी ठरतील.
यातील जास्तीत जास्त व शक्य असल्यास सगळ्याच प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव करत राहिल्यास आपोआप इंटरेस्ट वाटू लागतो. एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, ट्रिक्स, टिप्स समजल्या की त्या सरावाने लक्षात ठेवणेही सोपे होते. जे उमेदवार या घटकांमध्ये किमान पन्नास ते साठ टक्के प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात हे गेल्या चार वर्षांतील उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांच्या विश्लेषणावरून लक्षात येते. त्यामुळे या मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास २५ ते ३५ गुण निश्चितपणे मिळवता येतात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link