Next
बॅडमिंटनमधील नवा पोस्टरबॉय
नितीन मुजुमदार
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this storyभारतीय बॅडमिंटनमधील वलय गेले दशकभर सायना, सिंधू आणि काही प्रमाणात श्रीकांत या तीन शटलर्सभोवती फिरत आहे. जागतिक अजिंक्यपदस्पर्धेनंतर आता या नामावलीत बी. साईप्रणीत या आणखी एक हैदराबादस्थित, गोपीचंदशिष्याची भर पडली आहे. बॅडमिंटनच्या जागतिक अजिंक्यपदस्पर्धेत तब्बल ३६ वर्षांनी भारतीय पुरुष खेळाडू पदकमंचावर उभा होता. “माझ्या विशलिस्टमधील एका महत्त्वाच्या बॉक्सवर आता टिकमार्क दिसत आहे!” या गोपीचंद यांच्या विधानामागे गुरुशिष्याच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येची किनार आहे.
बी. साईप्रणीत हा गोपीचंद अकादमीच्या अगदी सुरुवातीच्या विद्यार्थ्यांपैकी एक. जागतिक स्पर्धेत पदक मिळवल्यानंतर साई म्हणतो, “माझ्या यशामुळे गोपीसर खूप आनंदी झाले आणि मीदेखील खुश आहे.”
जागतिक स्पर्धेतील यशानंतर ‘झी मराठी दिशा’ने खास साईप्रणीतशी संवाद साधला. आता पुढील ध्येय काय हे विचारता साई उत्तरला, “अर्थात ऑलिंपिक बर्थ!” स्वतःच्या फिजिकल फिटनेसवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्याने विनम्रपणे नमूद केले. जागतिक स्पर्धेतील सर्वाधिक संस्मरणीय सामना कुठला, यावर तो म्हणाला, “असं सांगणं थोडं अवघड आहे, कारण उपांत्य फेरीच्या आधी मी खेळलेल्या बहुतेक खेळाडूंनी त्या आधी त्यांच्याशी खेळलेल्या सामन्यात मला हरवलं होतं. त्यामुळे स्पर्धेतील बरेच विजय माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.” उपांत्य सामन्याविषयी विचारले असता, आपण यापेक्षा अधिक चांगला खेळ करू शकलो असतो, असे प्रांजळपणे सांगितले. बासेल (स्वित्झर्लंड) येथील जागतिक बॅडमिंटनस्पर्धेचे ठिकाण साईप्रणीतसाठी याआधीदेखील यश घेऊन आले होते. येथेच त्याने स्विस ओपन ग्रँड प्रिक्सस्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. बासेल येथे असतानाच त्याला राष्ट्रीयस्तरावरील अर्जुन पुरस्कार मिळाल्याची बातमी कळली जी त्याचा उत्साह वाढवणारी होती. तो म्हणतो, “ एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अशी बातमी नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढवणारी असते.”
साईप्रणीत बॅडमिंटनकडे वळला तो त्याचे आजोबा डी.एस. शिवशंकर राव यांच्यामुळे. दहाव्या वर्षी त्याने एका स्थानिक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवल्यावर ते त्याला थेट आरिफसरांकडे घेऊन गेले (होय, तेच ते सायनाचे पहिले कोच!) साईप्रणीतची आत्यादेखील राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळली आहे. सुरुवातीला छोट्या साईप्रणीतला देशभर विविध स्पर्धांसाठी घेऊन जाण्याची जबाबदारीदेखील साईच्या आजोबांनी पेलली. अगदी सुरुवातीला साईप्रणीतचे वडील मुलाने बॅडमिंटनमध्ये करिअर करण्याच्या विरोधात होते. मुलाने शिक्षणाकडे लक्ष द्यावे, हेच पारंपरिक मध्यमवर्गीय मत त्यांचेही होते. मात्र साईप्रणीत बॅडमिंटनमधील वरच्या स्तरावरील पदके घरी आणायला लागल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. साईप्रणीतचा लहान भाऊ साईप्रवीण इंजिनीयरिंग करत आहे. त्याचे वडील सांगतात, “ बंगळुरू इथे दहा वर्षांखालील मुलांचे राष्ट्रीय अजिंक्यपद मिळाल्यावर लहानग्या साईप्रणीतचे छायाचित्र ‘स्पोर्टस्टार’ या राष्ट्रीयस्तरावरील क्रीडासाप्ताहिकात आल्यावर मला खूप आनंद झाला होता.” प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या तिसऱ्या सीझनमध्ये (पीबीएल-३) एकदा त्याचा बालपणापासून मित्र किदम्बी श्रीकांतविरूद्ध सामना होता. साईप्रणीतचे कुटुंबीय व नातेवाईक मिळून तब्बल १५ जण तो सामना बघण्यास उपस्थित होते. श्रीकांत व साई हे दोघेही अगदी सुरुवातीपासून गोपीचंद अकादमीत आहेत आणि एकमेकांचे छान मित्रदेखील.
इंडोनेशियाचा तौफिक हिदायत हा बॅडमिंटनपटू साईप्रणीतसाठी आदर्श बॅडमिंटनपटू आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे कारकिर्दीतील अखेरच्या पर्वात शेवटचा सामना तो साईविरूद्ध खेळला आणि तीन गेम्सच्या कडव्या झुंजीनंतर हिदायत पराभूत झाला. “सामन्यानंतर मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तो न बोलताच निघून गेला. कदाचित तो बोलण्याच्या मनःस्थितीत नसावा.” त्या सामन्याची आठवण सांगताना साईचा स्वर गदगदला होता.
साईप्रणीतचे आता वर्ल्ड रँकिंग आहे १५, तर श्रीकांत दहाव्या स्थानावर आहे. त्यांच्या कामगिरीची कमान चढती राहिली तर पुरुषांच्या रँकिंगमध्ये नजीकच्या काळात पहिल्या पाचांत दोन भारतीय दिसण्याचा दिवस दूर नाही. त्या दिवशी गुरू गोपीचंद यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा दिसेल!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link