Next
कठीण समय येता...
अमृता दुर्वे
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सोशल मीडिया हा सध्या आपल्याला अनेक गोष्टी पुरवतो. नवीन मित्र-मैत्रिणी करण्यापासून ते जुन्या मित्र-मंडळींच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाची मदत तर होतेच, शिवाय मनोरंजन, माहिती या सगळ्याबरोबरच आजूबाजूच्या घडामोडींची माहिती याच सोशल मीडियावरून मिळते. हाच सोशल मीडिया इमर्जन्सीच्या काळामध्ये मदतीला धावून येतो. पावसामुळे अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस असो वा देशाबाहेर अडकलेले भारतीय प्रवासी असोत, सोशल मीडिया मदतीला आला. तुम्हाला जर सोशल मीडिया अडचणीच्या काळात वापरावा लागला, तर नेमकं काय करायचं, मदत कशी मागायची यासाठीच्या या काही टिप्स.


योग्य पेजेस किंवा हँडल्स फॉलो करा

एखाद्या घटनेविषयी किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींविषयी अपडेट मिळण्यासाठी योग्य फेसबुक पेजेस किंवा ट्विटर हँडल्स फॉलो करा. साधारणपणे ट्विटरवर तुम्हाला जास्त पटापट, थोडक्यात माहिती मिळते. बातम्यांसाठी लोक ट्विटरचा वापर जास्त करतात हे आढळून आलं आहे. म्हणून मग ट्विटरवरील खात्रीशीर हँडल्स फॉलो करा. वर्तमानपत्रं, न्यूज चॅनल्स आपापल्या हँडल्सवरून माहिती सतत देत असतात. याशिवाय मुंबई –ठाणे–नवी मुंबई–महाराष्ट्र पोलिसांची ट्विटर हँडल्स अतिशय अॅक्टिव्ह असून ती माहिती तर देतातच, तसेच तुम्ही त्यांना ट्वीट करून मदत मागितली तर तुम्हाला प्रतिसादही मिळेल. याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेचं ट्विटर हँडलही तत्पर प्रतिसाद देतं. गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी NDRFनं बचाव कार्यं केली आणि या एनडीआरएफचं ट्विटर हँडलही अतिशय अॅक्टिव्ह आहे. तुम्ही ज्या भागामध्ये आहात किंवा ज्या बाबतीत मदत हवी आहे, त्या कार्यक्षेत्रातील ट्विटर हँडल फॉलो करा. योग्य स्रोतांकडून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा. फेसबुकवरच्या चर्चा, व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्सवर विश्वास ठेवू नका. योग्य हॅश टॅग्स वापरा

सोशल मीडियावर माहिती देताना किंवा माहिती मिळवताना हॅश टॅग्स अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणूनच तुम्ही जर काही माहिती ट्वीट करत असाल तर योग्य हॅश टॅग्स वापरा. #MahalaxmiExpress आणि #MahalaxmiExpressRescue हे दोन हॅश टॅग्स महालक्ष्मी एक्स्प्रेस पाण्यात अडकल्यानंतर ट्रेंड होत होते. म्हणूनच तुम्ही काही माहिती पोस्ट करत असाल, तर योग्य हॅश टॅग्स वापरा. म्हणजे ती माहिती वाचणाऱ्यांपर्यंत तुमचा मुद्दा पोहोचेल. शिवाय तुम्हालाही असे विशिष्ट हॅश टॅग फॉलो करून त्याविषयी सुरू असणाऱ्या सर्व चर्चा एकाच ठिकाणी वाचता येतील. 


ट्विटर मोमेंट्स

भारतामध्ये ट्विटरमध्ये काय सुरू आहे त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा असेल तर ट्विटर मोमेंट्स इंडिया - @MomentsIndia हँडल फॉलो करा. इथे तुम्हाला चर्चा सुरू असलेल्या मुद्दे वा बातम्यांचा एकत्रित आढावा मिळेल. म्हणजे तुम्ही बातमी शोधत बसण्याऐवजी त्या घटनेबद्दलच्या बातम्या, ट्वीट्स तुम्हाला थेट वाचता येतील. मदत कशी मागाल?

सोशल मीडियावरून मदत मागताना योग्य ट्विटर हँडल्स टॅग करा. पोलिस, त्या भागातील महत्त्वाच्या व्यक्ती, अधिकारी, राजकारणी, संस्था, बचावकार्य होत असेल तर एनडीआरएफ या सगळ्यांना टॅग करा. मीडियाला टॅग करणंही फायद्याचं ठरू शकतं. कारण ‘ब्रेकिंग न्यूज’ घडत असताना मीडिया कंपन्यांच्या सोशल मीडिया टीम्स सतत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे तुम्हाला मदत हवी असल्याचं मीडियाच्या लक्षात आल्यास ही माहिती पुढे पोहोचायला मदत होऊ शकते. तुम्ही नेमके कुठे आहात हे बचावकार्य करणाऱ्यांना समजावं म्हणून लोकेशन शेअर करा. फेसबुकची वा ट्विटरची मदत घेऊन लोकेशन शेअर करून तुम्ही तुमच्याजवळ कोणी आहे का, याचा शोध घेऊ शकता. फेसबुक क्रायसिस रिस्पाँन्स

मोठ्या आपत्तीच्या वेळी फेसबुकवर एक क्रायसिस रिस्पॉन्स पेज सुरू होतं. यामध्ये स्वतःला ‘चेक-इन’ करून तुम्ही सुखरूप आहात हे इतरांना कळवू शकता. पण यासोबतच या रिस्पॉन्स पेजवर जाऊन तुम्ही मदत आणि माहिती मिळवू शकता. ‘The Flooding Across Western Maharashtra, India’ या पेजवर तुम्ही गेलात तर तुम्हाला माहिती मिळेल. आणि ‘Resources’ च्या टॅबखाली अन्न-पाणी- स्वयंसेवक–निवारा याविषयी लोकांनी देऊ केलेली मदत मिळवता येईल. तुम्ही सुरक्षित असाल किंवा जवळपास असाल आणि एखाद्या अडचणीच्या वेळी तुम्ही मदत करू शकणार असाल, तर तुम्हीदेखील त्या फेसबुक क्रायसिस रिस्पॉन्स पेजवर जाऊन तुमची मदत नोंदवू शकता.

मोबाइलची बॅटरी वाचवा

तुम्ही अडकला असाल तर मोबाइल सुरू राहणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच मग मोबाइलवर बॅटरी सेव्हिंग पर्याय सुरू करा. अनेक अॅप्स किंवा वेबसाइट्स आहेत ज्यांच्या लाईट व्हर्जन्स तुम्हाला वापरता येतील. या लाईट व्हर्जन्स कमी डेटा वापरतात. अशा वेळी फोनवर एकाचवेळी फार अॅप्स वापरू नका. त्यानं बॅटरी झटपट संपेल. आवश्यक ती अॅप्स सुरू ठेवा आणि इतर अॅप्स हायबरनेट करा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link