Next
पैशांचा खेळ
आदित्य जोशी
Friday, June 14 | 02:15 PM
15 0 0
Share this story


१६ जूनला भारत-पाकिस्तानमध्ये होणारा सामना मॅंचेस्टर, इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. जगभरातल्या सगळ्या क्रिकेटचाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष लागलं आहे. कारण याआधी दोघांमध्ये झालेला सामना २०१७ मध्ये चॅंपियन्स ट्रॉफीचा होता आणि त्यामध्ये पाकिस्ताननं भारताचा अनपेक्षितपणे मोठा पराभव केला होता. त्यामुळे भारत पराभवाचा बदला घेऊन विश्वचषकामध्ये पाकिस्तानशी कधीच न हरण्याचा सिलसिला कायम ठेवतो का याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड इथे होणाऱ्या मैदानाची प्रेक्षकक्षमता २५,००० आहे आणि पहिल्या बॅलमटमध्ये तिकिटांसाठी मागणी आली ४ लाखांची. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासुद्धा क्रिकेटमध्ये कट्टर दुश्मन आणि इंग्लंड तर आयोजक. त्या दोघांमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी तिकिटांची मागणी साधारण सव्वादोन लाखांची होती. एवढी तफावत भारत-पाकिस्तान आणि इतर सामन्यांच्या मागणीमध्ये होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २०१५ साली झालेला विश्वचषकस्पर्धेचा सामना २९ कोटी लोकांनी जगभरातून बघितला होता. या एका आकडेवारीवरून या दोन देशांमध्ये अधिकाधिक वेळा सामने व्हावेत अशी दोन्ही बोर्डांची का इच्छा असते हे लक्षात येईल.

भारतानं पाकिस्तानशी कोणत्याही प्रकाराची मालिका खेळायचं नाकारलं असलं तरी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये त्यांना एकमेकांशी खेळणं भाग आहे. आशिया कप असू दे, २०-२० विश्वचषकस्पर्धा किंवा चॅंपियन्स ट्रॉफी  या दोन देशांमध्ये सामना खेळला जावा असाच आयसीसीचा (आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्था) प्रयत्न असतो. २००७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषकस्पर्धेमध्ये १६ संघांची विभागणी ४ गटांमध्ये करण्यात आली होती. प्रत्येक गटातून २ संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार होते. भारताला त्यावेळी पहिल्या फेरीतच श्रीलंका आणि बांगलादेशनं हरवल्यामुळे घरचा रस्ता धरावा लागला होता. भारताच्या फॅन्सना याचं जेवढं दु:ख झालं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आयसीसीला झालं. कारण भारतानं केवळ तीन सामन्यांमध्ये भाग घेतला आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड यापैकी कोणाशीही लढत झाली नाही. आयसीसीसाठी ती स्पर्धा आर्थिकदृष्ट्या प्रचंड तोट्याची ठरली. त्यांनतर आयसीसीला शहाणपण आलं आणि प्रत्येक स्पर्धेचं स्वरूप भारत कमीत कमी पाच ते सात सामने खेळेल आणि मोठ्या देशांशी त्यांच्या लढती होतील अशी अलिखित तजवीज करून ठेवली. यावेळच्या विश्वचषकस्पर्धेमध्ये तर भारत सेमी फायनलला पोहोचला नाही तरी नऊ सामने खेळणार आहे. ज्या देशाकडून आयसीसीला ७० टक्के उत्पन्न आणि तेवढेच प्रायोजक मिळतात त्यांची एवढी काळजी तर घ्यायलाच हवी. 

खरं म्हणजे या दोन देशांमध्ये आयसीसीच्या कॅलेंडरप्रमाणे सामने होणं ही भारतापेक्षा पाकिस्तानची अधिक गरज आहे. कारण भारताएवढंच क्रिकेटवेड असूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे पैशांची चणचण  आहे. श्रीलंकेच्या टीमवर २००९ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर कोणत्याही देशानं पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. गेल्या दोन-तीन वर्षांत झिंबाब्वे आणि वेस्ट इंडिजन तुरळक सामने पाकिस्तानात खेळले आहेत. मात्र इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या सगळ्या टीम्सनी त्रयस्थ ठिकाणीच पाकिस्तानशी सामने खेळले आहेत. दुबई-अबुधाबीमध्ये होणाऱ्या या सामन्यांमध्ये जेमतेम दहा टक्के गर्दी होते आणि बोर्डासाठी पैसे कमावण्याचा मार्ग मर्यादित होतो. भारताशी एखादी मालिका जरी झाली, भले ती त्रयस्थ ठिकाणी असेल त्यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं नुकसान भरून निघू शकेल. परंतु भारतानं गेल्या कित्येक वर्षांत पाकिस्तानला तशी संधी दिलेली नाही. पाकिस्ताननं भारताविरुद्धच्या मालिकेसाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत. सरकारची परवानगी नसल्यामुळे बीसीसीआयनं आयसीसीकडे दाद मागून नुकसान भरपाईचा प्रयत्न देखील केला. आयसीसीमध्ये भारताच्या असलेल्या स्थानामुळे आणि प्रभावामुळे त्याचा अर्थात निभाव लागला नाही. बीसीसीआयला भारत सरकारने पाकिस्तानशी मालिका खेळण्याची परवानगी सातत्यानं नाकारली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनं आधीच श्रीमंत असलेलं बोर्ड अजून अधिक पैसे कमावू शकेल, पण गेल्या दहा वर्षांत अयपीएल आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय टीम्सचे सातत्यानं झालेले भारतदौरे यामुळे बीसीसीआयला कसलीच कमतरता राहिलेली नाही. मुख्य उत्पन्नाचा मार्ग हा आयपीएल आहे.

२०१७ ते २०२२ या कालावधीसाठी आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क स्टार नेटवर्कने १६,३४७ कोटींची बोली लावून विकत घेतले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाला वेगळा आणि अधिक सक्षम पर्याय उपलब्ध झाला. त्यामध्येदेखील पाकिस्तानच्या खेळाडूंना सहभागाची परवानगी भारतानं दिलेली नाही. प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूला आयपीएलमध्ये खेळावं असं वाटत असतं. त्यामध्ये असलेली अटीतटीची स्पर्धा, ग्लॅमर आणि अर्थातच पैसा याचं आकर्षण प्रत्येकाला असतंच. जगभरात अनेक देशांनी आपापल्या लीग चालू केल्या आहेत. मात्र आयपीएलची सर कोणालाच नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाकिस्तान प्रीमियर लीग गेली काही वर्षं चालू केली आहे. परंतु बहुतांश आंतरराष्ट्रीय खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळायला तयार नसल्यामुळे तीसुद्धा दुबई-अबुधाबीमध्ये होत आहे. त्यामुळे अर्थातच स्पर्धेला मिळणारं उत्पन्न कमी होतं. 

आतापर्यंत विश्वचषकस्पर्धांमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध नेहमीच जिंकत आला आहे. १६ जूनला तसंच व्हावं अशी अर्थातच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. परंतु मैदानाबाहेरच्या लढाईत भारतानं पाकिस्तानवर मोठा विजय आधीच मिळवला आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link