Next
रोगजंतूंशी लढणारे जंतुभक्षक!
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

“खोकला झाला म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो. मला वाटलं होतं की ते प्रतिजैविकं (अँटीबायोटिक्स) देतील आणि मला चटकन बरं वाटेल,” सोहम तक्रारीच्या सुरात म्हणाला, “पण डॉक्टरांनी ‘गुळण्या कर, गरम पाणी पी, दरवेळी लगेच प्रतिजैविकं नकोत घ्यायला,’ हेच ऐकवलं. याला काय
अर्थ आहे?”
“बरोबरच आहे डॉक्टरांचं,” तनुजाताई म्हणाली, “सारखी प्रतिजैविकं घेतली तर जंतूसुद्धा प्रतिजैविकांना दाद देईनासे होतात. किंबहुना, आजसुद्धा अनेक रोगांच्या जंतूंचे वाण कोणत्याच प्रतिजैविकाला दाद देईनासे झाल्यामुळे रोग्यांना बरं करण्यासाठी कोणता उपाय वापरायचा, हा प्रश्न डॉक्टरांना भेडसावू लागला आहे.”
“एकेकाळी प्रतिजैविकं म्हणजे जणू जादूची गोळीच, असं आम्हांला वाटायचं. आमच्या लहानपणी जे रोग असाध्य होते, ते प्रतिजैविकांनी चुटकीसरशी बरे व्हायला लागले!” ललिताम्मांनी आपला अनुभव सांगितला.
“पण चुटकीसरशी रोग्यांना बरं करण्याच्या नादात नंतर प्रतिजैविकांचा वापर नको तितका वाढला,” राहुलदादा म्हणाला, “त्यामुळे हळूहळू प्रतिजैविकांनाही दाद न देणारे महाजंतू (सुपरबग) जंतूंपासून निर्माण होऊन प्रतिजैविकांनी रोगी बरे होईनासे झाले. हे असंच चालू राहिलं तर २०५० पर्यंत दरवर्षी एक कोटी लोक महाजंतूंमुळे मृत्यूमुखी पडू शकतील.”
“पण,” अमनाने विचारले, “शास्त्रज्ञ नवनवीन प्रतिजैविकं का शोधत नाहीत?”
“संशोधनातून नवनवीन प्रतिजैविकं सापडतच राहतील, असं पूर्वी शास्त्रज्ञांना वाटत होतं,” विद्याताई म्हणाली, “पण गेल्या तीस वर्षांत एकही नव्या प्रकारचं प्रतिजैविक सापडलेलं नाही. प्रतिजैविकांच्या संशोधनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. पण आता संशोधनावर असा प्रचंड पैसा खर्च करायला औषधकंपन्या फारश्या उत्सुक नाहीत. त्यामुळेच पाच वर्षांपूर्वी वेगवेगळ्या संभाव्य ८०० प्रतिजैविक रसायनांवर संशोधन चालू होतं, तर आज ही संख्या रोडावून अवघी पन्नासावर आली आहे.”
“पण नवं प्रतिजैविक शोधणाऱ्या कंपनीला ते विकून प्रचंड फायदा कमावता येईल की! मग का नाही कंपन्या प्रयत्न चालू ठेवत?” शाश्वतने विचारले.
“नवं प्रतिजैविक सापडलं तरी ते प्रचंड प्रमाणात न वापरणंच शहाणपणाचं ठरेल,” स्वप्नीलदादा म्हणाला, “नाहीतर भरमसाठ वापरामुळे नवं प्रतिजैविकही लवकरच निष्प्रभ ठरेल. फक्त दुर्धर रोगजंतूंवर नवं प्रतिजैविक वापरून तो रोग बरा करावा लागेल. मग, मर्यादित वापरामुळे जंतूंपासून नव्या प्रतिजैविकाला दाद न देणारे महाजंतू तयार होणार नाहीत. याच मर्यादित वापरामुळे नव्या प्रतिजैविकाचा खप एवढा कमी असेल की ते जास्त किंमतीला विकलं तर रोग्यांना परवडणार नाही आणि कमी किंमतीला विकलं तर संशोधन करणाऱ्या कंपन्यांसाठी तो आतबट्ट्याचा धंदा ठरेल. हे लक्षात आल्यामुळेच बहुतेक कंपन्या या संशोधनातून काढता पाय घेत आहेत.”
“असं झालं तर, प्रतिजैविकांच्या शोधापूर्वी लोक जसे रोगांपुढे हतबल होते, तसंच पुन्हा होईल!” सुस्कारा टाकत ललिताम्मा म्हणाल्या.
“एवढं हताश व्हायचं कारण नाही,” स्वप्नीलदादा म्हणाला, “नव्या प्रतिजैविकांचा शोध जरी तेवढ्या वेगाने चालला नसला तरी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या युद्धशास्त्रातल्या तत्त्वाचा वापर रोगजंतूंच्या नाशासाठी करण्यासाठी शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.”
“आपला मित्र ठरेल असा रोगजंतूंचा शत्रू आहे तरी कोण?” सानियाने विचारले.
“असा शत्रू आहे ‘जंतुभक्षक’ (बॅक्टेरियोफेजेस) विषाणू,” विद्याताई म्हणाली, “नावाप्रमाणे हे विषाणू जंतूंवर ताव मारून आपली गुजराण करतात. पृथ्वीवर लक्षावधी प्रकारचे जंतूभक्षक आहेत. जंतूभक्षक वापरून जंतूंचा नायनाट करण्याची कल्पना शंभर वर्षांपूर्वीच जीवशास्त्रज्ञांना सुचली होती. मात्र नंतर प्रतिजैविकांच्या शोधामुळे जंतूंवर रामबाण औषध सापडलं, असं वाटून यावरचं संशोधन फारसं पुढे गेलं नाही. आता याच प्रतिजैविकांनी महाजंतूंपुढे हात टेकल्यामुळे जगभरातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये महाजंतूंना मारण्यासाठी जंतुभक्षकांवर संशोधन सुरू झालं आहे.”
“हे जंतुभक्षक महाजंतूंना मारतील, तसे आपल्या पेशींनाही विघातक ठरू शकतील. त्याचं काय?” प्रथमेशने विचरले.
“ज्याप्रमाणे वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या गोष्टी खातात, त्याप्रमाणे वेगवेगळे जंतुभक्षक वेगवेगळे जंतू खातात,” तनुजाताई म्हणाली, “त्यामुळे विशिष्ट जंतूंना मारण्यासाठी विशिष्ट प्रकारचेच जंतुभक्षक उपयोगी पडतात. आपल्या पेशींना विघातक ठरणार नाहीत असे जंतुभक्षक शास्त्रज्ञांना निवडावे लागतील. म्हणजे रोगजंतूंना मारणाऱ्या जंतुभक्षकांमुळे आपल्या शरीराला कोणताही अपाय होणार नाही.”
“पण औषध म्हणून असे जंतुभक्षक मोठ्या प्रमाणात वापरायचे तर त्याचीही किंमत अवास्तव वाढणार नाही का?” मुक्ताने विचारले.
“नाही,” राहुलदादा म्हणाला, “मुख्य खर्च हा संशोधन करून असे जंतुभक्षक शोधण्यावरच होईल. एकदा योग्य जंतुभक्षक शरीरात टोचला की रोगजंतूना मारता-मारता आपली संख्या वाढवण्याचं काम तो स्वतःहून करत राहील. त्याचबरोबर, ते रोगजंतू संपले की खाद्याचा पुरवठा संपल्याने जंतुभक्षकांची संख्या घटायला लागेल.”
“रोगजंतूंनाशासाठी जंतुभक्षकांचा वापर प्रत्यक्षात झाला आहे का?” प्रथमेशने विचारले.
“हो,” स्वप्नीलदादा म्हणाला, “अलिकडेच ’नेचर मेडिसिन’ या शोधनियतकालिकात डॉ. ग्रॅहम हॅटफुल आणि सहसंशोधकांनी शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. लंडनच्या ‘ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटल’मध्ये एक १५ वर्षांची मुलगी दाखल झाली होती. कोणत्याही प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या ‘मायकोबॅक्टेरियम ॲबसेसस’ या महाजंतूंचा तिला संसर्ग झालेला होता. या महाजंतूंवर जंतुभक्षकांचा वापर करून तिला रोगमुक्त करण्यात या शास्त्रज्ञांनी यश मिळवलं. जगभरातले शास्त्रज्ञ वेगवेगळ्या महाजंतूंवर लागू पडण्याजोग्या जंतुभक्षकांचा शोध घेत आहेत. सध्या कोणत्याही प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या महाजंतूंनी होणारे रोग भविष्यात पुन्हा एकदा मानवाच्या नियंत्रणाखाली येऊ शकतील.”
 “अरे वा,” मुक्ता म्हणाली, “मानवाला अनेकदा त्रासदायक ठरणाऱ्या विषाणूंचा वापर करून महाजंतूंवर मात करण्याचा हा उपाय म्हणजे चक्क काट्याने काटा काढण्याच्या युक्तीचा वैद्यकीय अविष्कार आहे!”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link