Next
क्रिकेटपटूंवर आता ‘नाडा’ची नजर
अमित मधुकर डोंगरे
Thursday, August 15 | 04:00 PM
15 0 0
Share this story

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी समितीच्या (National Anti-Doping Agency) म्हणजेच ‘नाडा’च्या कक्षेत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे डोपिंगची कीड रोखता येणे शक्य झाले आहे. जमेची बाजू म्हणजे पृथ्वी शॉच्या डोपिंग प्रकरणातून मंडळाने हा शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. तरीही प्रश्न उरतोच, एवढी वर्षे क्रिकेट मंडळ नाडाच्या कक्षेत येण्यास नकार का देत होती? डोपिंगचे नियम पाळल्यामुळे क्रिकेट आणि क्रिकेटपटूचे काय नुकसान होणार होते, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
आता नाडातर्फे केव्हाही आणि कुठेही खेळाडूंची उत्तेजकद्रव्य सेवनचाचणी केली जाऊ शकते. नाडाच्या काही नियमांना वरिष्ठ खेळाडूंनी याआधी विरोधच केला होता. या नियमातील तरतुदींनुसार प्रत्येक खेळाडूला ‘व्हेअर अबाउट’ या नियमाचे पालन करावे लागणार आहे. खरे तर खेळाडूंच्या सुरक्षेसाठीच मंडळ व ज्येष्ठ खेळाडू याला विरोध करत होते. पृथ्वी शॉचे डोपिंगप्रकरण तसेच मंडळावरील प्रशासकीय समितीचा दबाव यामुळे अखेर क्रिकेट मंडळाने नमते घेतले आहे. यापूर्वी बीसीसीआय खेळाडूंची डोपिंग चाचणी घ्यायची.
बीसीसीआय स्वायत्त असूनही तिला अनेक बाबतीत सरकारी मदतीची गरज पडते. खेळाडूंचे व्हिसा, आयपीएल, मायदेशात होणाऱ्या मालिकांसाठीची सुरक्षाव्यवस्था तसेच करसवलत या व अशा अनेक बाबतीत मंडळाला सरकारची मदत घ्यावी लागते. त्यामुळे अखेर नाडाच्या कक्षेत जाण्याचा निर्णय घेऊन बीसीसीआय बॅकफूटवर गेले आहे. या रोगाचा वेळीच इलाज केला नाही तर ही वाळवी संपूर्ण क्रीडाक्षेत्राचा विनाश घडवेल, अशी आजची स्थिती आहे. नाडाच्या नियमानुसार आता खेळाडूंना त्यांचा ठावठिकाणा जाहीर करावा लागणार आहे. प्रत्येक मालिकेनंतर खेळाडू कुठे जातात, काय करतात याबाबत नाडाला सगळी माहिती असेल तरच त्यांची चाचणी घेणे सहज शक्य होणार आहे.
पृथ्वी शॉ याच्याबाबतीत जे घडले ते पाहता खेळाडूंना डोपिंगबाबत जागरुक करणे गरजेचे आहे, याची जाणीव बीसीसीआयला झाली आहे. पृथ्वीने खोकल्याचे औषध घेतले होते, मात्र त्यात असलेल्या टर्बटलाइन या द्रव्यावर जागतिक उत्तेजक सेवनविरोधी समितीची बंदी असल्याचे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे तो अडचणीत आला व त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी (१६ मार्च ते १५ नोव्हेंबर २०१९) घातली आहे. पृथ्वीने हे औषध घेण्यापूर्वी संघाचे व्यवस्थापक तसेच फिजीओ यांच्याशी चर्चा करायला हवी होती. याशिवाय समितीकडून कोणत्या औषधांवर बंदी आहे, याची माहिती घेतली असती तरीही पृथ्वीकडून अशी चूक झाली नसती. बीसीसीआयनेही बंदी असलेल्या औषधांची यादी प्रत्येक खेळाडूपर्यंत पोचवायला हवी होती. याबाबतील मंडळाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
आता प्रश्न असा उरतो, की पृथ्वीवर घातलेली बंदी मागील तारखेपासूनची आहे. असे असेल तर त्याने ज्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला त्याचे काय? एकीकडे पृथ्वी उत्तेजक द्रव्यसेवनप्रकरणी दोषी असल्याचे बीसीसीआय सांगत आहे मग अशी अनाकलनीय कारवाई कशासाठी? येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ही बंदी लागू असून या कालावधीत कोणत्याही स्पर्धेत तो सहभागी होऊ शकणार नाही. जागतिक व्यावसायिक खेळाडूंप्रमाणेच क्रिकेटपटूंनीदेखील आता व्यावसायिक होण्याची गरज आहे. आधुनिक साहित्य, उपकरणे तसेच डोपिंगबाबतदेखील अनेक खेळाडू माहितगार झाले आहेत. मग भारतीय क्रिकेटपटूच लांब का राहीले आहेत?
खेळाडूंनी स्वत:च्या मनाने कोणतेही औषध घेऊ नये, त्यासाठी प्रशिक्षक, व्यवस्थापक यांच्याशी सल्लामसलत करावी. अन्यथा पृथ्वी शॉ प्रकरणाची पुनरावृत्ती होताना दिसेल. या स्पर्धांचा झगमगाट त्यातून मिळणारी प्रसिद्धी तसेच प्रत्येक सामन्यानंतर रंगणाऱ्या पार्ट्या यांमुळे खेळाडूंचे डोळे दिपतात. या सगळ्यांतून स्वत:ला लांब ठेवणे खूपच कमी जणांना जमते बाकीचे. मात्र यात वाहवत जातात व त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणणे जिकीरीचे ठरते. असो, आता मंडळ नाडाच्या कक्षेत आल्यामुळे बंदी असलेल्या औषधांबाबत खेळाडूंची जागृती करता येणार आहे. क्रिकेटसह सर्वच क्रीडाक्षेत्राला लागत असलेली ही कीड वेळेवरच रोखली पाहिजे.

डोपिंग आणि भारतीय क्रिकेटपटू
आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तानचा अहमद शहजाद, पाकिस्तानचे महंमद युसूफ, शोएब अख्तर आणि यासीर शाह, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न, वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल, श्रीलंकेचा उपुल थरांगा यांच्याबरोबरच भारताचे युसूफ पठाण, प्रदीप संगवान आणि आता पृथ्वी शॉ हे डोपिंग चाचणीत दोषी आढळले. या सगळ्यांवर त्यांच्या क्रिकेट मंडळाच्या नियमांनुसार कारवाईदेखील झाली. भारतीय मंडळाने त्यावेळी प्रदीप संगवानवर १८ महिन्यांची बंदी लावली होती, तर पठाणवर पाच महिन्यांची. अलीकडेच दोषी आढळलेल्या पृथ्वी शॉ तसेच अक्षय दुल्लरवार आणि दिव्य गजराज यांच्यावर आठ महिन्यांची बंदी घातली आहे. मंडळाच्या उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी नियम १०.१०.२ च्या अनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे मात्र मंडळाच्या नियमानुसार नव्हे तर नाडाच्या नियमांनुसार क्रिकेटपटूंवर कारवाई केली जाईल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link