Next
दबाव झुगारून रस्ता बांधला
विनय श्रीकांत देगांवकर
Friday, August 09 | 03:00 PM
15 0 0
Share this story


सैन्यदल म्हणजे आव्हानांशी सामना करणे. हा सामना करण्यासाठी तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेण्याचे काम तुमची निवड झाल्यापासून अतिशय चोख पद्धतीने केले जाते. ही सर्व प्रक्रिया तुम्हाला सैनिक म्हणून घडवते शिवाय एक उत्तम माणूस म्हणूनही घडवत असते. तुमची क्षमता तपासणारे असंख्य अनुभव या काळात येतात आणि जेव्हा ही परीक्षा उत्तीर्ण होता तेव्हा तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी सक्षम आहात, यावर शिक्कामोर्तब केले जाते.
मी ‘जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम्स’ या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. आकिर्टेक्ट म्हणून काम करत असताना मी अनेक सरकारी कामे घेत होतो. मात्र त्यात मन रमत नव्हते. सरकारी कामे करत असताना अनेकदा खूप निराशा यायची. आपल्याकडे अधिकार असलेले पद असायला हवे असे कायम वाटायचे. माझ्या एका मैत्रिणीचे पती कर्नल विभोर पंत त्यावेळी लष्कराच्या सेवेत होते. त्यांनीच मला केंद्रीय सेवा दलाची एसएसबी (सव्हिर्सेस सिलेक्शन बोर्ड) परीक्षा देण्याचे सुचवले. त्यांचे योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबातूनही पाठिंबा मिळाल्याने मी सैन्यदलात भविष्य घडवू शकलो.
अनपेक्षितरित्या पहिल्याच प्रयत्नात माझी निवड झाली. या निवडीचे मुख्य श्रेय मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देईन. कारण या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या नेतृत्व, परस्पर संवाद, शिबिरांचे आयोजन यांसारख्या गोष्टी संघामुळे माझ्यामध्ये रुजल्या होत्या. त्यामुळे मला त्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीत. यामध्ये मैदानी खेळांचाही अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. मी सैन्यातील ‘कोअर ऑफ इंजिनीयर्स’ विभागात रुजू झालो. यामार्फत सैन्यदलासाठी पूल आणि रस्तेबांधणीचे काम केले जाते.
सैन्यासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे पूल तयार करण्यासाठी तुम्ही अतिशय तत्पर आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते. यात नदीवरील पूल, दोन डोंगरांना जोडणारा पूल अशी आव्हानात्मक कामे असतात. तसेच भूसुरूंग असलेल्या भागातही काम करावे लागते. सैन्यदलात तुम्हाला वेळप्रसंगी कोणतेही काम करावे लागू शकते. त्याचप्रमाणे मी बंगालमध्ये असताना वीज यंत्रणेतील कर्मचारी संपावर गेले. त्यावेळी या कामासाठी आमच्या ट्रूपला पाचारण करण्यात आले. आम्हाला अवघ्या दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन संबंधित काम दिलेल्या वेळेत पूर्ण करायचे असे सांगण्यात आले. त्यामुळे मी आकिर्टेक्ट असूनही मला विजेच्या प्रकल्पावर काम करावे लागले. तसंच एकदा अमृतसरमार्गावरील एका रेल्वेचे नेतृत्वही आम्ही केले. यामध्ये रेल्वेला कमांड करण्याचे काम आमच्याकडे होते.
काश्मीरमधील पूंच भागात नियुक्ती असताना त्याठिकाणचे रस्ते बांधण्याचे काम माझ्या गटाकडे होते. इतर ठिकाणी असणारा जमीन हस्तांतरणाचा संघर्ष येथेही सुरू होता. रस्ता अडवून वेठीस धरण्याचे प्रसंग येथेही घडत होते. मात्र या संघर्षांना तोंड देत आम्हाला काम पूर्ण करायचे होते. अशावेळी अतिशय शांत आणि संयमी राहून निर्णय घ्यावे लागतात. रस्ता बांधत असताना याठिकाणी स्थानिक आंदोलक आमच्या कामाला जास्त विरोध करायला लागले. दादागिरी, सर्व मार्गांनी दबाव टाकणे यामुळे कदाचित आम्ही काम थांबवू, असे त्यांना वाटले असावे. या विरोधकांनी मागील ८ ते ९ वर्षांपासून रस्त्याचे काम करू न दिल्यामुळे एका भागात मोठ्या अडचणी येत होत्या. मात्र शांतपणे जवळपास सहा महिने मी त्यांच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्याच्यावर त्यांनी केलेल्या एकेका गोष्टीवरून त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यानंतर ते हळूहळू काहीसे नरमले. इतकेच नाही तर मी या रस्त्याच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यासाठीही येथील मंत्र्यांना आमंत्रित केले. त्यामुळे आपल्या मागे राजकीय पाठबळ असल्याचा मेसेजही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला. या सगळ्यात जीवाला बराच धोका होता, मात्र न डगमगता शांत डोक्याने सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी या परिस्थितीवर मात करू शकलो. यानंतर १० किलोमीटर पुढच्या टप्प्यावरही अशाप्रकारचा एक जण होता.
एक दिवस ब्रिगेडियर आमच्या कामाच्या ठिकाणी भेट देणार म्हटल्यावर त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचे काम त्याने केले. इतकेच नाही तर ब्रिगेडियर गाडीतून खाली उतरल्यानंतर त्यांच्याकडे माझ्याविषयीच्या तक्रारी करण्याचेही काम या व्यक्तीने केले. त्यावेळी ब्रिगेडियरांनी माझीच पाठराखण करून कौतुक केले. कायद्याचे ज्ञान, तांत्रिक ज्ञान आणि मनुष्यबळ विकास अशा विषयांबाबत थोडाफार अभ्यास असल्याने मी या परिस्थितीला योग्य पद्धतीने तोंड देऊ शकलो. त्यामुळे एकूणच सैन्यात काम करत असताना अशाप्रकारच्या विविध अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, पण त्याला संयमाने, सारासार विचार करुन आणि आपल्या बुद्धिमत्तेचा योग्यतो वापर करून तोंड दिल्यास तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता.
शब्दांकन : सायली जोशी-पटवर्धन

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link