Next
चांगली भूमिका मिळाल्याचा आनंद
प्रतिनिधी
Friday, February 08 | 03:30 PM
15 0 0
Share this story



अण्णांची भूमिका कशी मिळाली?

‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या सीझनमध्ये अण्णांची भूमिका मी साकारली होती. अर्थात ती भूमिका लहान होती. मालिकेचा दुसरा भाग करायचे ठरल्यावर निर्माते सुनील भोसले यांनी संपर्क साधला. पहिल्या सीझनमध्ये अण्णा मरतात. मग दुसऱ्या सीझनमध्ये काय दाखवणार, असे त्यांना विचारले.  त्यांनी सांगितले, “आपण आधी घडलेली गोष्ट म्हणजे ‘प्रीक्वेल’ दाखवतोय. ” चित्रपट-मालिकांमध्ये ‘सीक्वल’ पाहायला मिळालेत मात्र एखाद्या मालिकेत ‘प्रीक्वल’चा प्रयोग पहिल्यांदा होत असल्याने मीही त्यासाठी उत्सुक होतो. त्यामुळे मी होकार दिला. अण्णांचे एकंदरीत वागणे, स्वभाव यावर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यासह पहिल्या सीझनवेळी लोकांना पडलेल्या प्रश्नांची उकल या ‘प्रीक्वल’मधून होणार आहे.

अण्णांच्या व्यक्तिरेखेबद्दल कल्पना होती?
ही व्यक्तिरेखा इतकी निर्दयी रासवट असेल, याची अजिबात कल्पना नव्हती. दुसऱ्या सीझनमध्ये अण्णांच्या क्रूर स्वभावाच्या एकेक गोष्टी उलगडत जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणे मलाही कमालीची उत्सुकता आहे. अण्णा लहान मुलांवर हात उगारतात, त्यांना मारतात. अर्थात कलाकार म्हणून मी ते करत असलो तरी माझा मूळ स्वभाव भावूक आहे. मात्र अण्णांच्या व्यक्तिरेखेप्रमाणे भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जे नसतो ते पडद्यावर साकारण्याचा एक वेगळा आनंद असतो. तो आनंद या भूमिकेने दिला आहे.

अशी व्यक्तिरेखा कधी पाहिली, वाचली होती का?
आजवरच्या वाचनात अगदी अशी व्यक्तिरेखा आली नाही. मात्र विजय तेंडुलकर यांच्या ‘सखाराम बाईंडर’ नाटकातील सखारामसारख्या काही भूमिकांचा अभ्यास केला. त्यावेळी अण्णांचा रासवटपणा, बेफिकिरी सखाराम बाईंडरमध्ये जाणवतो. ‘तुंबाडचे खोत’मधील खोत या भूमिकेशीही अण्णांची भूमिका थोडीफार मिळती-जुळती आहे.

मालवणी भाषेशी कसे जुळवून घेतले?
पहिल्या भागात माझा मृत्यू दाखवला असल्याने त्या सीझनमध्ये मोजकेच संवाद होते. दुसऱ्या सीझनमध्ये माझी भूमिका मध्यवर्ती असल्याने पूर्णपणे मालवणी भाषेत बोलावे लागेल, असे निर्माता-दिग्दर्शकांनी आधीच सांगितले होते. मी पुण्याचा असल्याने मालवणी भाषेशी फार संबंध आला नाही. नाही म्हणायला माझी आई कणकवलीची असल्याने मामा, मावश्या एकत्र आल्या की, थोडेफार मालवणी कानावर पडायचे. मात्र मालवणीमध्ये बोलण्याची वेळ आली नाही. त्यामुळे दुसऱ्या भागात काम करतेवेळी मालवणी नाटके पाहण्याची सूचना निर्माता-दिग्दर्शकांनी केली. मग प्रवास करताना गाडीमध्ये नाटके ऐकायचो. घरात असताना टीव्हीवर नाटके पाहायचो. मालवणी भाषा शिकवण्यात अभिनेता लीलाधर कांबळी यांनी खूप मदत केली. त्यांचे संवाद ऐकल्यामुळे मला मालवणी भाषेतील बारकावे समजून घेणे सोपे झाले. माझे मालवणी संवाद अधिक चांगले होण्याच्या दृष्टीने निर्मात्यांनी एका मुलाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मला आता मालवणी चांगली जमू लागली आहे.

प्रेक्षकांचा अभिप्राय कसा आहे?
माझ्या अभिनयासह मालवणी भाषेतील संवादाबद्दल कोकणासह मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांकडून कौतुकाची पावती मिळत आहे. प्रेक्षकांचे निरीक्षण मला मालवणी भाषा अधिक अस्खलित बोलण्यासाठी तसेच चांगला अभिनय करण्यासाठी मोलाचे ठरले आहे. प्रेक्षकांचे, कुटुंबीयांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. लोकांना अभिनय आवडतो आहे. मालिका पाहिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप येत नसल्याचे अनेकांनी सांगितले. अण्णांचा तळतळाट होवो, असेही काहींनी म्हटले आहे. चित्रीकरण संपल्यानंतर झोपण्यापूर्वीचे दोन-अडीच तास लोकांच्या प्रतिक्रियांना उत्तरे देण्यात जातात. प्रेक्षकांना वेगळे पाहायला आवडते, हे त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियांमधून जाणवते.

बालकलाकारांबाबत काय सांगाल?

मालिकेतील बालकलाकार स्थानिक आहेत. छायाची भूमिका साकारणारी मुलगी मूळची रेडी गावची आहे. काही मुले ऑडिशन्समधून आली आहेत. ही मुले प्रथमच कॅमेऱ्याला सामोरी जात असली तरी त्यांच्यात नावालाही नवखेपणा नाही. त्यांचा अभिनय व्यावसायिक कलाकारांना लाजवेल असा आहे. माझे मालवणी सुधारण्यात सर्व बालकलाकारांचा मोठा वाटा आहे. तातू आणि पांडू यांनाही मी मारतो तेव्हा मलाच खूप वाईट वाटते. मात्र शॉट संपल्यानंतर मी त्यांची आवर्जून जाऊन चौकशी करतो. मालिकेतील सर्व बालकलाकार हुशार आणि गोड आहेत. दुपारच्या जेवणावेळी आम्ही एकत्र बसतो त्यावेळी अनेक हास्यविनोद होतात. मालिकेत सस्पेन्स असली तरी सेटवरील वातावरण हलके-फुलके असते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link