Next
रुपेरी दिवाळी
संकलन : कपिल देशपांडे, योगिता राऊत, दीपश्री आपटे
Friday, November 02 | 05:00 PM
15 0 0
Share this story


यंदा दुग्धशर्करा योग!

यंदाच्या दिवाळीत मी ‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. खरं तर या वर्षीची दिवाळी माझ्यासाठी सर्वर्थानं खास आहे. दरवर्षी आम्ही मुंबईत लक्ष्मीपूजन करून नंतर पुण्याला जातो. यंदा पाडव्याला मुंबईत ‘काशिनाथ...’चा प्रीमिअर असल्यानं ते झाल्यावर आम्ही पुण्याला जाणार आहोत. त्यातही ९ तारीख म्हणजे माझ्यासाठी दुग्धशर्करा योगच! भाऊबीज, माझा वाढदिवस आणि पुण्यात ‘काशिनाथ...’चा प्रीमिअर. त्यामुळे सध्या माझी प्रचंड धावपळ सुरू आहे. खरेदीसाठीही वेळ नाही.

मी खूप सर्जनशील नसल्यानं कंदील वगैरे घरी बनवत नाही, परंतु यंदा माझा धाकटा मुलगा कंदील बनवणार आहे. पाडव्याला मंजिरीला ‘सरप्राइज’ देण्यापेक्षा तिच्या हातात मी पाकीट देऊन हवं ते घेण्याची मुभा देतो. दहावीला असेपर्यंत मी फटाके फोडले आहेत. त्यानंतर पर्यावरणाला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा किती त्रास होतो याची जाणीव झाल्यानं फटाके उडवणं मी बंद केलं. माझ्या मुलांना फटाक्यांचं वेड आहे, पण त्यांच्यावर मी बंदी घालत नाही. गांभीर्य लक्षात आल्यावर ते स्वतःच फटाके उडवायचे थांबतील.

दिवाळीच्या निमित्तानं कुटुंबासोबत वेळ घालवता येतो. नातेवाईक आणि मित्रपरिवाराची भेट होते. पुण्यात आमचा वाडा असल्यानं लहानपणी अंगणात किल्ले बनवायचो. अभ्यंगस्नान झाल्यावर आई ओवाळायची, मग फराळ, अशी पारंपरिक पद्धतीनं दिवाळी साजरी करायचो. आता बिझी शेड्युलमुळे यातील बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत.
- सुबोध भावेसर्वांना एकत्र आणणारा सण

पूर्वी आमचं एकत्र कुटुंब होतं.त्यामुळे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी कोणाकडे नाश्ता, कोणाकडे जेवण तर कोणाकडे फराळ व्हायचा. त्यात आम्ही सर्व लहान मुलं एकत्र असल्यानं धमालच असायची. किल्ला बनवताना तर अक्षरशः दंगा करायचो. किल्ल्याशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही. आम्ही सगळे जण दिवाळीचा फराळ बनवायलाही मदत करायचो आणि प्रत्येक पदार्थाची पहिली चव आम्हाला चाखायला मिळायची. शाळेत असल्यापासूनच प्रदूषणाचं महत्त्व कळल्यानं फटाक्यांसाठी आम्ही कधीच हट्ट केला नाही. एकत्र कुटुंबात कोणताही सण साजरा करण्याची मजाच काही निराळी आहे. आता आमच्यातील बरेच जण वेगळे राहत असल्यामुळं एकत्र येण्याचं निमित्त शोधत असतो आणि दिवाळीच्या दिवसांत ते आम्हाला मिळतं. पूर्वी दिवाळीत पहाटे मी मित्रांसोबत सारसबागेत जायचो, परंतु आता तिथे प्रचंड गर्दी असते, त्यामुळे आता तिथे जाणं टाळतो.

या वर्षीची दिवाळी मी फक्त घरच्यांसोबत, नातेवाईकांसोबत साजरी करणार आहे. मी चार दिवसांसाठी सुट्टीच घेतली आहे. आई-बाबा आणि साजिरीसोबत अहिरे या माझ्या मूळ गावाला जाण्याचाही विचार आहे. दिवाळीत खरेदी करण्याची क्रेझ आता जरा कमी झाली आहे. एक तर आपण वर्षभर खरेदी करतच असतो. तरीही पाडव्याला साजिरीसाठी काहीतरी घेईनच. मला लहान बहीण असल्यानं दरवर्षी मी भाऊबीजेला तिला तिच्या आवडीची वस्तू देतो. सध्या ती बंगळुरूला असल्यानं यंदा पहिल्यांदाच आमची भाऊबीज होणार नाही. त्याची कसर ती नंतर भरून काढेलच. दिवाळी म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण कुटुंबाला भेटण्याचं निमित्त आहे.
- अमेय ‌वाघ


सर्वांसाठी भेटवस्तू
दिवाळी आणि आईच्या हातचा फराळ हे माझ्यासाठी एक खास समीकरण आहे. आईनं तयार केलेल्या फराळाचे सर्वच पदार्थ मला खूप आवडतात. त्यातही अनारसे आणि चकल्या तर विशेष आवडीच्या आहेत.  लहान असताना आई चकल्या करायची तेव्हा मी चकलीच मळलेलं पीठ मी आवडीनं खायचे. चकल्या  बनवता येत नव्हत्या तरी बनवायच्या प्रयत्न करायचे आणि वाकड्यातिकड्या करायचे.

दिवाळीनंतर माझा वाढदिवस असल्यानं दरवर्षी दिवाळी माझ्यासाठी खूप खास असते. मी मूळची पुण्याची असल्यानं पुण्यात दिवाळीचा आनंद काही निराळाच असतो. हा आनंद माझ्या कुटुंबासोबत साजरा करायला खूप आवडतं. त्यामुळे दिवाळीत शक्यतोवर मी चित्रीकरण करत नाही. यंदाची दिवाळी मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं साजरी करणार आहे. या वर्षीच्या दिवाळीत माझ्या जवळच्या सर्वांना काहीना काही भेटवस्तू देणार आहे, मग ते माझ्या सोसायटीमधील वॉचमनकाका असू देत वा माझ्या घरी कामासाठी येणाऱ्या काकू…

दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना एक आवाहन करायचं आहे ते म्हणजे, दिवाळीचा आनंद घेत असताना प्रदूषण कमी कराच, शिवाय मुक्या प्राण्यांचाही जरूर विचार करा. कारण आपला क्षणभराचा आनंद त्यांच्यासाठी दु:खदायक असू शकतो, हे लक्षात ठेवा.
- ईशा केसकर


फटाक्यांपासून चार हात लांब
दिवाळीदरम्यान थंडीची चाहूल लागलेली असते. त्यामुळे एकंदरच सर्वत्र आल्हाददायी वातावरणात येणारा दिवाळी हा माझा आवडता सण आहे. या वर्षी जास्त आनंद या गोष्टीचा आहे, की दिवाळीत मी घरी असणार आहे. गेली अनेक वर्षं दिवाळीदरम्यान शूटिंग असायचं. यंदा ते नसल्यानं मागची सगळी कसर भरून काढणार आहे. यंदाची दिवाळी घरच्यांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारासोबत साजरी करणार आहे. दिवाळीत आम्ही सर्व मित्रमैत्रिणी नाश्त्याला एकत्र भेटतो. रात्रीच्या जेवणाचाही बेत असतो. आता बऱ्याच मित्रमैत्रिणींची लग्नं झाली आहेत, काहींना मुलंही आहेत. त्यामुळे या विस्तारलेल्या परिवारासोबत मजा करायची, असं ठरवलं आहे.  अनेक वर्षांपासून काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मी विशेष मुलांसोबतही दिवाळी साजरी करतो.

पुण्याच्या सारसबागेतील दिवाळीपहाट म्हणजे अप्रतिम अनुभव. दिव्यांच्या रोशणाईनं सर्व परिसर उजळलेला असतो. पूर्वी न चुकता मित्रांसोबत तिथे जायचो. दिवाळीत मला सर्वात जास्त आवडतं, ते किल्ले बनवायला. त्यासाठी लागणारे मावळे, चित्रं यांची खरेदी मी आवर्जून करतो. दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच गडकिल्ल्याची कोणती कथा उभारता येईल, याचा विचार सुरू असतो. हल्ली वेळेअभावी हे शक्य होत नाही तरीही दिवाळीच्या पहिल्या दिवशी छोटासा तरी किल्ला बनवतोच. फराळात मला पाकातले चिरोटे प्रचंड आवडतात. यावेळी मी जरा निवांत असल्यानं फराळावरही मस्त ताव मारणार आहे. फटाके फोडणं कटाक्षानं टाळतो. लहानपणी फटाक्यांचं कौतुक होतं, परंतु ते पर्यावरणाला किती घातक आहेत, याचं गांभीर्य लक्षात आल्यानं फटाक्यांपासून चार हात लांबच राहतो.
- सुयश टिळक


लज्जत फराळाची

दिवाळीचा सण आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र येऊन साजरा करत असल्यानं त्याचा आनंद द्विगुणित होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाची दिवाळीही  मी कुटुंबासोबतच साजरी करणार आहे. चित्रीकरणाचं वेळापत्रक इतकं व्यग्र असतं की घरच्यांना पुरेसा वेळ देताच येत नाही. मात्र यंदाच्या दिवाळीत मी खास घरच्यांसाठी वेळ काढणार आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे. घरातील प्रत्येक सदस्य कितीही व्यग्र असला तरी दिवाळीसाठी वेळ काढतोच.  प्रत्येक सणाला एकत्र यायचं व सण आनंदानं साजरे करायचे असा आमच्या घरातील अलिखित नियमच आहे, असं म्हटलं तरी चालेल. हा नियम आम्ही सर्वच अगदी काटेकोरपणे पाळतो. आईच्या हातची चकली आणि चिवडा मला खूप आवडतो.

आपल्याकडे जे काही सण आहेत ते परिवाराला एकत्र आणतात आणि एकमेकांना भाविनक नात्यात एकत्र गुंफून ठेवतात. हे सण आपल्याला छान आठवणी देऊन जातात. आजही मला लहानपणी आम्ही दिवाळीत केलेली मजा आठवते. लहान असताना दिवाळीत आम्ही आजीकडे जायचो. तिचे लाड, तिच्या हातचा फराळ आजही आठवतो… तिनं केलेल्या फराळावर आम्ही सर्व भावंडं अक्षरश: तुटून पडायचो… ती चव जिभेवर आणि आठवण मनात अजूनही कायम आहे.  दिवाळीतील भाऊबीज तर माझ्यासाठी पर्वणीच असते. या दिवशी खूप गिफ्ट मला मिळायच्या, आजही मिळत असल्यानं दिवाळीतील हा दिवस विशेष आवडता आहे.

माझ्या चाहत्यांना मला एक आवाहन करायचं आहे, यंदाच्या दिवाळीत फटाके फोडू नका. आनंद साजरा करण्याचे खूप सारे पर्याय आहेत. आपणच आपल्या पर्यावरणाची काळजी घेऊन इकोफ्रेंडली दिवाळी साजरी करायला हवी ना!
-ह्रता दुर्गुळे


इकोफ्रेंडलीचा आग्रह

दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा… असं म्हटलं आहे, ते अगदी खरं आहे. दिवाळीत लवकर उठून, उटणं लावून अभ्यंगस्नान करण्याचा आनंद काही न्यारा असतो. हा आनंद फराळाच्या विविध पदार्थांमुळे अधिकच द्विगुणित होतो. सध्या माझं डाएट सुरू असल्यानं  फराळाचा आस्वाद घेण्यावर थोडे निर्बंध आले आहेत. तरीदेखील दिवाळीचा आनंद कमी होणार नाही. यंदाची ही दिवाळी माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून मी घराघरात पोहोचले आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांचं मोठं ओझं असून देखील त्यातून मिळणारा आनंदही आहेच. मालिकेच्या चित्रीकरणातून घरच्यांसाठी आवर्जून वेळ काढून ही दिवाळी मी त्यांच्याबरोबरच पुण्याला जाऊन साजरी करणार आहे. पुण्यात दिवाळीचा आनंद, तिथला माहोल काही औरच असतो. शनिवारवाड्यासमोर मोठ्या, देखण्या रांगोळ्या काढल्या जातात. संपूर्ण वाड्याला दिव्यांची रोशणाई केलेली असते. दिवाळीच्या दिवसांमधील शनिवारवाड्याचं रूप बघण्यासारखं असतं. हे सर्व अनुभवणं आनंददायी असतं. दिवाळी हा सण दिव्यांचा आहे. मात्र दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे या दिवसांत प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे सर्वांना मी एक नम्र आवाहन करते, की फटाकेविरहित इकोफ्रेंडली दिवाळी साजरी करून आपण सर्वांनी दिवाळीचा आनंद घ्यावा. दिव्यांची आकर्षक आरास, फराळात पदार्थांचे वैविध्य आणून त्याचा आनंद सर्वांबरोबर लुटावा…
-प्राजक्ता गायकवाड


यंदाची दिवाळी सर्वार्थानं खास
यंदाची दिवाळी माझ्यासाठी सर्वार्थानं खास आहे. ‘झी मराठी’ अॅवॉर्ड्समध्ये मला ‘विशेष लक्षवेधी चेहरा’चा पुरस्कार मिळालाय. यानिमित्तानं मला मिळालेली नथ मी दिवाळीत आवर्जून घालणार आहे. माझे बाबा आणि माझा भाऊ मर्चंट नेव्हीत असल्यानं दोघंही शिपवर असतात. त्यामुळे दिवाळीत आम्ही सर्व एकत्र असं फार कमी वेळा घडतं. यावेळी योगायोगानं दोघांनाही एकाचवेळी सुट्टी असल्यानं आमची दिवाळी एकदम दणक्यात असणार आहे. दिवाळीची तीन दिवसांची सुट्टी असल्यानं मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. पूर्वी आम्ही घरी कंदील बनवायचो, पणत्या रंगवायचो. रांगोळी काढायचो, तीसुद्धा दिवसातून दोनदा. पर्यावरणाला हानी पोचू नये म्हणून फटाके मी स्वतःही फोडत नाही आणि दुसऱ्यांनाही फोडू देत नाही.

लहानपणी सारसबागेतील पाडवापहाटला जायचो. तिथल्या दिव्यांचा लखलखाट अप्रतिम दिसतो. भरपूर गर्दी असते तरीही मजा येते. यंदाही जायचा विचार आहे. पूर्वी साजरी होणारी दिवाळी आणि आताची दिवाळी यांत निश्चितच फरक आहे. तरीही ती परंपरा जपण्याचा मी प्रयत्न करते. पुण्यात असताना आईला चिवडा, चकली असा फराळ करायला मदत करायचे. चिवडा बनवताना आईचं प्रमाण अनेकदा चुकायचं. कारण त्यात टाकण्यासाठी तयार ठेवलेलं खोबरं, डाळं, मिरची मी खाऊन टाकायचे. या वेळी शूटिंगमुळे मला खरेदी करता आलेली नाही, बघू या आता पुण्याला गेल्यावर भावानं काही ‘सरप्राइज’ आणलं आहे का?
-गायत्री दातारतलावपाळीवर उत्साही माहोल

मी मूळची ठाण्यातील. जन्मापासूनच ठाण्याशी नाळ जुळली आहे. इथं सगळेच सण उत्साहानं साजरे होतात. तलावपाळी भागात मी लहानाची मोठी झाले. दिवाळीत तळं सजलं, की त्याची शोभा अधिक वाढते. दिवाळीच्या दिवशी पहाटे ठाणेकर या तलावपाळीवर भेटतात. शोभेच्या फटाक्यांनी शहर अधिक सजून जातं. इथं सणावारी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. लहानपणी खरं तर याच कार्यक्रमांमधून कलाकार म्हणून घडण्याची सुरुवात झाली. केलेल्या सादरीकरणाला दाद मिळत गेली, कौतुक झालं आणि आत्मविश्वास वाढला. गडकरी रंगायतनमध्ये स्टेजवर जाणं, तिकडे प्रेक्षागृहात बसणं, गडकरी रंगायतनचा आरसे असलेला चमचमता पडदा पाहणं म्हणजे माझ्यासाठी दिवाळी असते.
-संपदा जोगळेकर
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
मी १९८४ सालापासून ठाण्यात राहतोय. कॉलेजही ठाण्यातच. पूर्वी मी दिवाळीच्या आधी फटाके विकण्याचा व्यवसाय साधारण तीन वर्षं केला. तेव्हा अर्थात दिवाळी म्हणजे फटाके आणि फराळ असंच समीकरण होतं. पुढे फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण जाणवलं आणि तेव्हापासून फटाके विकणं आणि वाजवणं पूर्णपणे थांबवलं. दिवाळीत ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पूर्वीपासूनच दिवाळीपहाटचे कार्यक्रम होत आले आहेत. आता त्याचं प्रमाण वाढलं आहे. दिवाळीच्या चार दिवसांत ‘दिवाळीपहाट’ आणि ‘दिवाळीसंध्या’ असे मिळून साधारण पंचवीस तरी कार्यक्रम होत होतात. कार्यक्रमांचं स्वरूप व्यावसायिक असलं तरी त्यातून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळतं. शिवाय प्रत्येक कार्यक्रमाला दर्दी रसिकांची आवर्जून उपस्थिती असते, हे विशेष.
-विघ्नेश जोशीरांगोळी अन् आकाशकंदील!

तुम्हा सर्वांप्रमाणे मीदेखील दिवाळीची आतुरतेनं वाट पाहत असते. दरवर्षी कुटुंबातील सदस्यांबरोबर मी दिवाळी साजरी करते. यंदाही कुटुंबासोबतच दिवाळी साजरी करणार आहे. मात्र माझ्या व्यग्र दिनक्रमामुळे दिवाळीची तयारी करायला फारसा वेळ मिळणार नाही. तरीदेखील वेळात वेळ काढून  परंपरेनुसार ज्या काही फराळाच्या गोष्टी असतात त्या आवर्जून करणार आहे. मला दिवाळीत रांगोळी काढायला आणि आकाशकंदील बनवायला खूप आवडतं. मी वेळ मिळाला की नक्की आकाशकंदील बनवते, रांगोळीही काढते. दिवाळीत मी स्वत:साठी कधीच नवे कपडे घेत नाही. वर्षभर मी वेगवेगळ्या कारणांनी कपडे घेतच असते. तसंही माझा वाढदिवस दिवाळीतच येत असल्यानं काहीना काही खरेदी होतेच. दिवाळीच्या निमित्तानं मित्रमैत्रिणी घरी येतात. त्यानिमित्तानं सर्वांच्या भेटीगाठी होतात. त्या आठवणी वर्षभर टॉनिकप्रमाणे पुरतात. दिवाळीची सुट्टी म्हटली की मला लहानपण आठवतं. शाळेत असताना दिवाळीच्या सुट्टीत रोज शुद्धलेखन लिहून आणा असं सांगितलेलं असायचं. त्यामुळे सुट्टी असूनही अभ्यासाला बसावं लागायचं. हे मला खूप कंटाळवाणं वाटायचं… लहानपणीची दिवाळीशी निगडित एक रम्य आठवण म्हणजे किल्ला बनवणं.  किल्ला बनवण्यात खूप वेळ जायचा… मातीनं हात-पाय, कपडे खराब व्हायचे, पण त्यातून जी निर्मिती व्हायची त्यातून मिळणारा आनंद खरंच अवर्णनीय असायचा.  दिवाळी म्हटलं की फटाके उडवणं हे ओघानं आलंच. परंतु फटाके फोडण्यापेक्षा कुठल्यातरी गरजवतांना अन्नदान करा, त्यांना नवीन कपडे घेऊन द्या… अशाप्रकारे दिवाळी साजरी केली तर या दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल…खरं ना?
-अनिता दाते 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link