Next
हत्तीमधील बदल
आनंद शिंदे
Thursday, August 15 | 04:30 PM
15 0 0
Share this story

साधारण २००३ ची घटना आहे. त्या वर्षी हत्तीचा कोकण आणि कोल्हापूर परिसरामध्ये वावर असल्याचं लक्षात आलं. तो वावर हा ठरावीक ऋतूपुरता मर्यादित होता. तेव्हा ते पाहुणे होते. लोकांनीदेखील तेव्हा त्यांचं स्वागत केलं यात शंका नाही. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या काही छायाचित्रांत लोक हत्तीच्या पावलांच्या ठशाची पूजा करतानाही आपल्याला दिसतात. मग अचानक थोड्या काळात काय घडलं, की ज्यामुळे ‘ही ब्याद इकडून घेऊन जा’ असं बोलण्याइतका  बदल लोकांमध्ये झाला?
कोकणातल्या लोकांनी याचं कारण उलगडून सांगितलं. सुरुवातीला त्या भागांत  हत्ती आला, त्याची अडचण ना तिकडच्या लोकांना होती, ना हत्तीला.  कालांतरानं ठरावीक काळापुरता असलेला आपला मुक्काम हत्तीनं वाढवला, तशी थोडी धास्ती वाटू लागली. दोडामार्गात लोकांची भावना अशी होती की हत्ती आल्यावर भजन केलं तर हत्ती निघून जातो. मात्र कालांतरानं त्या वातावरणाची सवय झाली आणि हत्ती थांबू लागला. मग मुक्कामात शेतीचं नुकसान वाढलं तेव्हा लोकांनी पूजा घातली असं कळलं. परंतु नंतर त्याचीही सवय झाल्यानं हत्तीनं मुक्काम वाढवला. मग आपलं शेत वाचवायला लोकांनी आधी डबे, मग इतर वाद्यं वाजवली. कालांतरानं हत्ती याही गोष्टीला सरावला आणि तिथेच थांबू लागला. मग लोकांनी फटाक्यांचा वापर केला. त्याचा बराच परिणाम हत्तींवर झाला, पण हत्तीला त्याचीही सवय झाली. मग रात्रीच्या वेळी आलेल्या हत्तीवर बॅटरी किंवा मशालीचा उजेड टाकण्याचा प्रकार सुरू झाला. अशानं सुरुवातीला हत्ती निघून जाऊ लागला, पण नंतर त्याचाही परिणाम हत्तीवर होईना. उलटपक्षी प्रकाशझोत हत्तीवर टाकला तर त्या दिशेनं धावत येऊन हत्ती हल्ला करू लागला. त्यामुळे हा उपायही बाद झाला. या सगळ्या प्रकारांतून लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हत्तीला पळवून लावण्यासाठी केलेले सगळे प्रयोग आणि उपायांमुळे हत्तींनी त्यांच्या जीवनात बदल केले. ज्या गोष्टीची भीती वाटेनाशी झाली, तेव्हा तो तिथेच थांबला आणि त्रास होतोय असं वाटल्यावर त्यानं
हल्ला केला.
माणसाच्या कृतीनुसार हत्तींनी त्याच्या विचारांत आणि मानसिकतेत बदल केला आणि बऱ्याचदा एक पाऊल पुढे जात गेला. हत्तीनं शेतात येऊ नये म्हणून शेतकरी त्याच्या शेताला कुंपण घालू लागले, तेव्हा हत्तीनं ते कुंपण उखडलं. त्यावर उपाय म्हणून साध्या बांबूंऐवजी सिमेंटचे पक्के खांब वापरात आणले. हत्तीला ते उखडता आले नाहीत तर तो ते खांब तोडत असल्याचं लक्षात आलं. मग त्या कुंपणाला विजेचा करंट दिला गेला. खरं तर यानं हत्ती निघून जायला हवा होता, परंतु हत्तीच्या मानसिकतेनुसार समोर असलेला अडथळा पार करणं हे त्याला जास्त आवडतं, हे लक्षात येतं. त्यामुळे हत्तीनं त्या भागातील उपलब्ध असलेली झाडं उखडून त्या कुंपणावर टाकायचा उपाय शोधला. झाड पडल्यावर तारा सहज तुटू लागल्या. विजेचं सर्किट तुटलं आणि त्याच झाडाच्या आधारे हत्ती सहज शेतात प्रवेश करता झाला. थोडक्यात, जसा प्रसंग आला तसा बदल हत्तीनं स्वत:मध्ये घडवत त्या प्रसंगावर मात करण्याचा मार्ग शोधला.
या वागणुकीतील बदलामध्ये अतिशय साधीसरळ मानसिकता आहे. हत्तीला पुढे जायचं असतं आणि त्यामुळे समोर आलेल्या अडचणीवर मात करण्याशिवाय काही पर्याय हत्ती स्वत:साठी ठेवत नाही. आपली सगळी बुद्धी व चातुर्य तो पणाला लावतो आणि स्वत:मध्ये बदल घडवून आणतो.
एकंदरीत बदलत्या वातावरणानुसार हत्तींमध्ये अगदी वेगळे असे बदल दिसून येतात. आफ्रिकेतील माली भागात हत्तींचा एक गट वास्तव्याला आल्याचं तिथल्या अभ्यासकांच्या लक्षात आलं. हत्तींची खाण्याची आणि पाण्याची गरज लक्षात घेता अशा वाळवंटात हत्तीनं कसं काय वास्तव्य केलं याबद्दल अभ्यासकांना कुतूहल वाटलं. मात्र अभ्यासाअंती असं लक्षात आलं की मानवी वस्त्यांमध्ये झालेल्या वाढीमुळे हत्तीनं शेवटी स्वत:च्या वास्तव्यासाठी या भागाची निवड केली. पाण्याच्या कमतरतेमुळे या हत्तींच्या मातांनी स्वत:मध्ये फार वेगळे बदल करून घेतल्याचं लक्षात आलं. येथील आई हत्तीण सहा वर्षांच्या आपल्या पिल्लाला आपलं दूध पाजताना दिसते. सहसा एवढं मोठं झाल्यावर पिल्लू आईचं दूध पित नाही, पण पाण्याची कमतरता बघून त्या आई हत्तिणींनी त्यांच्या पिल्लांसाठी स्वत:मध्ये केलेला तो महत्त्वाचा
बदल आहे!
‘नेचर जिओसायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात असं म्हटलं आहे की  तुम्हाला पृथ्वी वाचवयाची असेल तर तुम्हाला हत्ती वाचवावा लागेल. हत्ती एवढा महत्त्वाचा आहे!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link