Next
‘सुखकर्ता’ गणराया
प्रतिनिधी
Friday, August 30 | 02:00 PM
15 0 0
Share this story

येत्या सोमवारी गणपतीबाप्पा वाजतगाजत येतील आणि आपले दहा दिवस चैतन्यमय करून टाकतील. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी सुरू केलेला हा गणेशोत्सव आता थोड्या वेगळ्या वळणाने जात असला तरी त्यातला आनंद कमी होणार नाही याची काळजी जागरूक मंडळी सतत घेत असतात. गणपतीउत्सव पर्यावरणपूरक, शांततामय आणि भक्तिपूर्ण राहावा यासाठी जुनीजाणती गणेशमंडळे प्रयत्न करत आहेत, ही समाधानाची बाब आहे. ‘झी मराठी दिशा’ या गणेशोत्सवाकडे एक साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमाची संधी म्हणून पाहत असते. यानिमित्ताने या वर्षीही ‘झी मराठी दिशा’चा गणेशोत्सव विशेषांक ‘सुखकर्ता’, सिद्धिविनायकाच्या साक्षीने धामधुमीत प्रसिद्ध झाला आहे. हा अंक गणपतीबाप्पाचे सांस्कृतिक व साहित्यिक संचित सांगणारा आहे, तसेच आपले आवडते टीव्ही-चित्रपट कलाकार, राजकारणी मंडळी या उत्सवातून काय प्रेरणा घेतात हेही सांगणारा आहे. त्याशिवाय चित्रकारांना हा गजानन कसा भावतो ते दाखवण्याची संधीही यावेळी ‘झी मराठी दिशा’ने ‘सुखकर्ता’ विशेषांकाच्या निमित्ताने दिली. महाराष्ट्रातील समस्त हौशी चित्रकारांनी त्यांच्या कल्पनेतील गणेशाचे चित्र साकारावे व ते आमच्याकडे पाठवावे असे आवाहन करण्यात आले होते, त्याला चित्रकारमंडळींनी अत्यंत भरघोस प्रतिसाद दिला. या चित्रकारांनी पाठवलेल्या चित्रांपैकी परीक्षकांनी निवडलेल्या सात चित्रांची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली, तसेच ही चित्रे ‘सुखकर्ता’च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही सात निवडक चित्रे म्हणजे या चित्रकारांच्या मनातील गणेशस्तोत्रच म्हणावे लागेल. गणेशाची भक्ती ही अशी कुंचल्यातूनही करता येते, अशी वेगळीच जाणीव या स्पर्धेच्या निमित्ताने झाली. याशिवाय ‘झी मराठी दिशा’च्या प्रस्तुत अंकात आमच्या वाचकांनी त्यांच्या गावातील गणपतीच्या देवस्थानांची पाठवलेली माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांना गर्दी टाळून शांत व प्रसन्न गणेशमंदिरांचे दर्शन घ्यायचे आहे, त्यांना ही गावोगावच्या गणपतींची माहिती उपयुक्त वाटेल. याखेरीज ‘झी मराठी दिशा’च्या वाचकांसाठी ‘आठवणीतला गणेशोत्सव’ ही लेखनस्पर्धा जाहीर करण्यात आली होती, त्यातही वाचकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. त्या स्पर्धेतील यशस्वी लेखकांचे लेख या तसेच पुढील अंकात प्रसिद्ध करण्यात येत आहेत. थोडक्यात, ‘झी मराठी दिशा’ने आपले वाचक, हितचिंतक, सुहृद, वर्गणीदार, जाहिरातदार यांना सामावून घेत या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यात आपण आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय व पत्रे पाठवून भाग घ्यावा. हा गणेशोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना विसरून चालणार नाही. गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय अनेक गणेशमंडळांनी घेतला आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. गणेशाेत्सवाच्या या आनंदात बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटनस्पर्धा जिंकून सुवर्णपदक पटकावल्याने  भरच पडली आहे. भारतात आता क्रिकेटेतर खेळांचा जमाना या निमित्ताने सुरू होत आहे. जागतिक स्तरावर खेळणारे अनेक भारतीय बॅटमिंटनपटू आहेत, परंतु सर्वोच्च पदक त्यांना हुलकावणी देत आले आहे. आता ती परंपरा मोडेल अशी अपेक्षा आहे. आता गणशोत्सवात अशाच चांगल्या व मन उल्हसित करणाऱ्या सुखकारक बातम्या याव्यात हीच गणरायाकडे प्रार्थना. हा गणेशोत्सव ‘झी मराठी दिशा’च्या वाचकांना ‘सुखकर्ता’ ठरो!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link