Next
एका रेडिओ समालोचकाचे अर्धशतक!
नितीन मुजुमदार
Friday, February 08 | 05:00 PM
15 0 0
Share this story

रिची बेनोचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटसंघ भारतात आला होता. ब्रेबॉर्न स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात होता. शिक्षणाचे खूप महत्त्व असलेल्या घरातून एक पिता आपल्या क्रिकेटवेड्या मुलाला खास इंदूरहून सामना बघायला मुंबईला घेऊन आला होता. वडिलांना क्रिकेटमध्ये फार रुची नव्हती, पण मुलासाठी ते मुंबईत आले होते. सामन्याचा चौथा दिवस उजाडला, तरीही ही पितापुत्राची जोडी स्टेडियमबाहेरच आवारात उभी दिसत होती. तिकिटे मिळाली नव्हती. काळाबाजारात मिळणारी परवडत नव्हती. हे सारे बघणाऱ्या एका पोलिसाने अखेर त्यांची विचारपूस केली. सत्य कळल्यावर त्यालाही त्यांची दया आली. त्याने त्या मुलाला मदत करायची ठरवले, मात्र एक अटदेखील घातली. तो म्हणाला, ‘मी मुलाला आत सोडतो, पण वडिलांना नाही. त्यांनी स्टेडियमबाहेर उभे राहावे.’ वडिलांनी अट मान्य केली. तो १४-१५ वर्षांचा मुलगा आत शिरला. आत त्याची दैवते त्याने ‘याची देही याची डोळा’ बघितली आणि कृतकृत्य झाला. थोड्या वेळाने त्याची नजर वर समालोचन कक्षाकडे (कॉमेंटरी बॉक्स) गेली. तेथे त्याला विजय मर्चंट, बॉबी तल्यारखान दिसले. एक दिवस आपल्याला येथे बसून समालोचन करायला मिळेल का, असा भाबडा विचार त्याच्या मनात चमकून गेला! तो विचार त्या मुलाच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरला आणि तो मुलगा पुढे क्रिकेटच्या हिंदी समालोचनासाठी नावाजला गेला. त्याचे नाव सुशील दोशी! याहून मोठी योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यांनी काही वर्षांनी १९७२-७३ च्या मालिकेत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले ते याच ब्रेबॉर्न स्टेडियमच्या त्याच समालोचनकक्षामधून!

सुशीलजींचे रणजी करंडकस्पर्धेत समालोचक म्हणून पदार्पण झाले तोदेखील एक किस्सा आहे. सुशीलजी समालोचक होण्यासाठी अर्ज घेऊन गेले ऑल इंडिया रेडिओच्या इंदूरमधील स्टेशन डायरेक्टरकडे. त्याने या जेमतेम विशी पार केलेल्या तरुणांकडे आमूलाग्र निरखून पाहिले आणि सांगितले, ‘बाबारे, थोडा अनुभव घे, आम्हाला डोक्यावरच्या केसांचा रंग बदललेली माणसे हवी आहेत, जा पळ!’ मात्र सुशीलजींचे दैव बलवत्तर होते. नेमके त्याच सुमारास हिंदी समालोचनदेखील तत्काळ सुरू करण्यात यावे, म्हणून केंद्राकडून आदेश आला. प्रत्यक्षात हिंदी समालोचक नव्हते. अचानक स्टेशन डायरेक्टरला काही दिवसांपूर्वी आलेल्या सुशील दोशींची आठवण झाली. सुशीलजींच्या इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये बोलावणे घेऊन माणूस गेला, पण सुशीलकुमार दोशी सापडत नव्हते, कारण कॉलेजमध्ये त्यांचे नाव सुशील जैन असे नोंदवले गेले होते. अखेर प्रत्येक वर्गातून क्रिकेट समालोचकपदासाठी कुणी अर्ज केलाय का, म्हणून विचारणा झाली आणि सुशीलजींचा हात क्षणात वर गेला!

सुशीलजींचे रेडिओ समालोचक म्हणून पदार्पण रणजीस्पर्धेत १९६८ साली झाले. रेडिओ समालोचक म्हणून कारकिर्दीचे अर्धशतक गाठलेले ते पहिलेच भारतीय समालोचक असावेत. त्यांचे या क्षेत्रात पदार्पण मात्र काहीसे अयशस्वी झाले. त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र आपण आपली शैली स्वतः निर्माण करायला हवी, असे मनोमन ठरवून त्यांनी कठोर मेहनत घेण्यास सुरुवात केली. इंजिनीयरिंगचे विद्यार्थी असले तरी लहानपणापासून हिंदी साहित्याची त्यांना आवड होती. वर्गात हिंदीमध्ये ते पहिले येत असत. हिंदी समालोचनात अनेक शब्दप्रयोग त्यांनीच सर्वप्रथम रुजवले. ‘भाग्यशाली रहे के गेंदने बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया’, ‘और उसी के साथ गेंद चार रन के लिये सीमारेखा के बाहर’, ‘बाल बाल बच गये’ असे हिंदीत रुळलेले अनेक शब्दप्रयोग सुशीलजींनीच सर्वप्रथम कॉमेंटरीमध्ये वापरले आहेत.

सुशीलजी इंदूरचे. गोविंदराम सेकसरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (जी.एस.आय. टी.एस.) या विख्यात कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगमधील पदवी मिळवली. वडील निरंजनलालजी दोशी यांचा प्रभाव असल्याचे सुशीलजी आवर्जून नमूद करतात. सुशीलजींचे तिन्ही बंधू एम.टेक. झाले. गेली अनेक वर्षे त्यांच्या फर्मकडून पाण्याच्या टाक्या उत्पादित केल्या जात. शिवाय इतरही काही व्यवसायांत पुढची पिढी कार्यरत आहे. ९ जून १९४७ रोजी जन्मलेल्या सुशीलजींच्या क्रिकेट कारकिर्दीला काही महिन्यांपूर्वीच ५० वर्षे पूर्ण झाली. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये एक स्टँडला त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव देण्यात आले आहे.

आज ७१व्या वर्षीदेखील ते समालोचकाच्या क्षेत्रात आहेत. अगदी अलिकडे त्यांनी रणजी करंडकस्पर्धेच्या उपांत्य सामन्याचे समालोचन केले होते. वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला होता तेव्हाही ते समालोचक होते. आजवर त्यांनी सुमारे ८५ कसोटी व ४५०हून अधिक एकदिवसीय सामन्यांचे समालोचन केले आहे. पाच विश्वचषक व पाच टी-२० विश्वचषक अशा एकूण १० विश्वचषकस्पर्धांमध्ये त्यांनी रेडिओ समालोचन केले आहे. २०१६ साली त्यांना पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले. जसदेवसिंग, अनंत सेटलवाड, सुरेश सरैया, नरोत्तम पुरी ही मंडळी त्यांची समकालीन. रेडिओवर समालोचन ऐकणाऱ्याला त्याच्या डोळ्यांसमोर सामना उभा करण्याचे कठीण कार्य समालोचकाला करायचे असते. आज चाळीशी-पन्नाशी पार केलेल्या सर्व क्रिकेटशौकिनांचे भावविश्व तेव्हा रेडिओ समालोचकाच्या आवाजाच्या चढउताराबरोबर हेलकावे खात असे. सामन्यातला रोमांच क्रिकेटरसिकांच्या रोमारोमात पोहोचवण्याची ताकद त्या काळातील बऱ्याच रेडिओ समालोचकांकडे होती. मराठीत हे काम ज्येष्ठ क्रिकेटसमीक्षक वि. वि. करमरकर, बाळ ज. पंडित, प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी आदी दिग्गज करायचे. काळाच्या ओघात रेडिओ समालोचनाचे महत्त्व कमी झाले असले तरी काही पिढ्यांचे क्रिकेटशी नाते कायमसाठी जोडले गेले ते या ‘आँखो देखा हाल’ अर्थातच रेडिओ कॉमेंटरीमुळेच!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link