Next
स्वत:ला नीट ओळखायला हवं!
मंगला मराठे
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this storyआज लग्नाच्या बाबतीत शहरी शिक्षित मुलगे सर्वात जास्त गोंधळलेले आहेत. शहरात नाती व्यक्त करण्याच्या, संभाषणाच्या पद्धती बदलल्या आहेत, पण नात्यांचा गाभा बदललेला नाही. त्यामुळे जुनं चांगलं की नवं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात सतत भुणभुणत असतो. हाच प्रश्न उपवर मुलांना गोंधळात टाकतो. आपल्याला नेमकं काय हवंय हे त्यांना ठरवता येत नाही. मग सगळ्यात काहीतरी खोट काढतात किंवा कुठल्यातरी एखाद्याच गोष्टीच्या आहारी जाऊन (क्रेझी) निर्णय घेऊन टाकतात. पालकांना वाटतं मुलांना ‘जबाबदारी नको. स्वच्छंदी जगायला हवं.’ मात्र वास्तव तसं नाही. उलट मुलं जास्त विचार करताहेत. कारण सहजीवनाच्या कल्पना आता खूप विस्तारल्या आहेत. एकेकाळी मुलंबाळं झाली, घर नांदतं राहिलं की संसार झाला, इतकाच सहजीवनाचा अर्थ होता. आज तो प्रत्येक बाबतीत साथ-साथ असा आहे. त्यामुळे मुलांना सगळे मुद्दे महत्त्वाचे वाटतात. तेवढ्याच शंकाही त्यांच्या मनात उभ्या राहतात. आता काही प्रातिनिधिक शंका, प्रश्न पाहू -

अनेक बाबतीत दुसरी बाजूही त्यांना माहीत असते. परंतु ती पचवायला कठीण वाटते. म्हणून हा गोंधळ होतो. ‘पूर्वी फक्त मुलींचे आईवडील स्थळ शोधायचे, आता माझे आई-बाबा मुलींची स्थळं शोधतात आणि स्वत: फोन करतात. हे आपल्यालाच गरज असल्यासारखं नाही का होत?’

 ‘मलासुद्धा लग्न करायंच आहे. मग स्वत: विचारण्यात कमीपणा का मानायचा?’

‘मुलीला भेटल्यावर ठरवता येईल ना जमेल की नही ते? पण त्याआधीच किती चाळण्या लागताहेत. जात, वय, उंची, घर वगैरे. या गोष्टींचा एकमेकांशी पटण्याचा संबंध काय? पण बघितलेलं बरं. उगीच रिस्क नको.’

‘बायको सुंदर पाहिजे. परंतु सुंदर आहे म्हणून अॅटिट्युड दाखवत राहिली तर? खडूस असली तर? असं म्हणतात की ‘मनं जुळली की रंग-रूप काही जाणवत नाही. मग ‘आपलं माणूस ते आपलं माणूस’ हे खरं असेल का? पण मग आई-बाबा फॉर्म भरताना जात, वर्ण, उंची, शिक्षण अशा अटी का घालतात?”

“माणसाचा स्वभाव महत्त्वाचा हे खरं, पण तो बघायचा कसा? माझ्या बायकोने कसं वागायला हवं – कुणाशी न भांडणारी कुणाची तक्रार न करणारी हवी. माझं मध्ये सँडविच नको. माझे आईबाबा किती छान आहेत. ते काही त्रास देणार नाहीत. उलट लाडच करतील.’

‘पण तिला ते पटतील का? ते माझे आई-बाबा आहेत म्हणून मला आवडतात. तिला तितकेच आवडतील याची काय गॅरंटी? सगळ्यांशी गोड वागणारी असावी असं वाटतं. पण हे कसं शक्य आहे. आपलं तरी सगळ्यांशी कुठे सख्य असतं?’

‘समजूतदार म्हणजे खालमानेनं सगळ्यांचं सगळं ऐकणारी मुलगी, टिपिकल घरेलू. अशी मुलगी बायको म्हणून चालेल का आपल्याला? बायको कशी कर्तबगार, स्मार्ट पाहिजे. पण मग अशा मुली घरात कशा वागत असतील? आपला कचरा करेल का?’

‘मला माझ्या समकक्ष मुलगी हवी. म्हणजे प्रत्येक क्षणी समकक्ष. मग नवरा म्हणून माझं महत्त्व काय राहणार?’

‘मुली हल्ली खूप अटी घालतात. शंका-कुशंका काढत बसतात. जास्त शिकल्या तर जास्तच विचार करायला लागल्या. जरा भाव मिळायला लागला तर सगळ्या गोष्टी घासून बघायला लागल्या. मात्र त्यांच्या बाजूनं बघितलं तर बरोबर वाटतं. नवीन घरात नवीन माणसात यायचं तर त्यांना रिस्क वाटणारच. काय नेमकं बरोबर तेच कळत नाही. आपण डबल स्टँडर्ड वापरतो का? ऑफिसमधे ज्या बायका सारखी आमची मदत मागतात त्यांना आम्ही “कितीही शिकल्या तरी ह्या अशाच वागणार.” असे म्हणतो आणि ज्या स्वत: काही करतात त्यांना आगाऊ म्हणतो. इथे बोलणारी मुलगी असली तर ती डॉमिनेट करणारी वाटते. कमी बोलणारी असली तर बावळट वाटते.’

‘पूर्वी वधु-परीक्षा असायची आता मुलांसाठीही कठीण परिक्षा झालीय. सुंदर पाहिजे पण रूपवर्गिता नको. स्मार्ट गुहकृत्यद्क्ष, नम्र हवी पण डॅशिंग नको. हे गुलबकावलीचं फूल कुठे मिळणार? आपल्याला त्यातल्या काही पाकळ्याच मिळणार आहेत. त्या तरी नेमक्या कशा निवडायच्या? एखादा क्लास असता तर बरं झालं असतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती.’

वरील सर्व प्रश्न, शंका या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत. सगळीच मुलं अशी गोंधळलेली आहेत. त्यांना कुटुंबाचं पारंपारिक उतरंडीचं स्वरूप जे मनात रुजलेलं आहे, सवयीचं आहे तेही हवंसं वाटतं. कारण त्यात ते वरच्या पायरीवर आहेत. मैत्रीचं आधुनिक नातंही हवंसं वाटतं पण त्यासाठी उतरंड सोडायचं धाडस त्यांना होत नाही. आपण एकदा चालवून घेतलं तर ती कायम तीच अपेक्षा करेल. लोक आपल्याला बावळट म्हणतील, अशी भीतीही वाटते. शिवाय ‘घरातली आपली नाती ही येणाऱ्या एका मुलीमुळे बदलता कामा नयेत’ हा दबाव मुलांवर असतो. त्यामुळे त्यांना प्रत्येक स्थळात काही खटकतं तर काही आवडतं. निवडीचे निकष ठरविता येत नाहीत. निकष ठरवायचे तर प्रथम स्वत:ला नीट ओळखायला हवं. आपलं (आणि आपल्या कुटुंबाचे) गुणदोष, विचारसरणी, आवडीनिवडी नेमकेपणाने माहीत हव्या. तर मुलांना अनुरूप जोडीदार निवडता येईल. आपल्या प्राथमिकता आपण ठरविल्या पाहिजेत. आपल्याला कोणत्या गोष्टी आग्रहानं हव्याच आहेत; कोणत्या नसल्या तर किंवा असल्या तर चालतील आणि कोणत्या अजिबात चालणार नाहीत हे माहीत पाहिजे. एखादी गोष्ट आपण हवी म्हणतो तेव्हा त्याच्या अनुषंगानं येणारी दुसरी गोष्ट आपल्याला झेपणार की नाही याचा विचार करायला पाहिजे. उदाहरणच द्यायचं तर कर्तृत्ववान मुलगी असली तर तिच्याकडे निर्णयक्षमताही असणार. ती पावलोपावली मदतीसाठी वाट बघणार नाही. त्यात आपल्याला अपमान झाला असं वाटेल का? किंवा उलट, सतत मदत आणि आधार मागणारी मुलगी असेल तर आपल्याला अडकल्यासारखं, सतत जबाबदारीचं ओझं असल्यासारखं वाटेल का? प्रत्येक परिस्थितीत स्वत:ला ठेवून बघायचं. आपल्याला जे चांगलं वाटतं ते आपल्यासाठी आपले निकष असतात.

मुळात आपण आणि आपलं कुटुंब हे परिपूर्ण, आदर्श नाही. आयुष्यात नव्यानं येणारी व्यक्तीही परिपूर्ण असणार नाही. आपले गुणदोष, जबाबदाऱ्या, तिचे गुणदोष, जबाबदाऱ्या सगळं जमेत धरून आपल्याला संसार करायचा आहे. तडजोड प्रत्येकाला करावी लागते. मात्र ही तडजोड डोळसपणे करावी आणि आपल्याला झेपणारी असावी. गोल करून बसलेल्या लोकांमध्ये आणखी एक व्यक्ती आली तर गोलातल्या प्रत्येकाला थोडं सरकावं लागतं. आपल्या गोलात या मुलीसाठी हे करता येईल का, याचा विचार करायचा असतो. त्यासाठी एकमेकांशी बोलून एकमेकांचा परिचय करून घेऊन मग निवड करावी. लग्न हे जिगसॉ पझलसारखं असतं. आपल्याला आपल्या शेजारी सहज बसणारा तुकडा शोधायचा असतो. तो ठोकून, कापून बसवता येत नाही.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link