Next
शब्दांचे कारंजे
डॉ. नीलिमा गुंडी
Friday, September 20 | 04:30 PM
15 0 0
Share this story

तुम्ही  पाण्याचे कारंजे पाहिले असेल ना?  कवितेत जणू शब्दांचे कारंजे असते! कवितेत शब्दांचे लयबद्ध  नृत्य असतेच, शिवाय  रंग, गंध, नाद, स्पर्श, रस अशा अनेक संवेदनांना जाग आणण्याचे सामर्थ्यही कवितेत असते. भा. रा. तांबे  लिहितात
पिवळे, तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर  
यातून संध्याकाळचे रूप कसे  अचूक रंगच्छटांसह डोळ्यांसमोर उभे राहते! यशवंतकवी नदीची गती कशी शब्दांत टिपतात पाहा-
रांगत, लोळत, दौडत, घोळत
कडेकपारीतुनि खळाळत
आक्रमिते निज पंथ
दु. आ. तिवारी ‘मर्दानी झाशीवाली’  या कवितेत आवेशपूर्ण शब्दांत लिहितात
पडघम बिगुलांच्या नादी, शिंगे कर्णांचे नाद
खाली वरती भरलेला संग्रामाचा उन्माद
यातून युद्धाच्या वातावरणातला नाद नेमका जाणवतो. कृ. ब. निकुंब यांच्या कवितेतले
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
हे शब्द वाचताना पहाटे वाऱ्याबरोबर येणारा फुलांचा सुगंध आठवतो. माझ्या एका कवितेत  मुलांचा ‘खजिना’ वर्णन करताना मी लिहिले आहे   
टपोऱ्या गुंजा लाल , खळ्ळ् करती काचा
मध्येच एखादा त्यात मऊ धागा लोकरीचा!  
हे शब्द स्पर्शसंवेदना जागी करतात. पां. श्री. गोरे यांच्या ‘आम्ही तर जंगलची पाखरे’ या कवितेतले हे शब्द पाहा
खुडुनि मुगाच्या शेंगा कधी कोवळ्या
जाता येता खाव्या पाटातल्या  
गुळचट शेंगा चवळीच्या  वा जरठ पोपटी भल्या
लागती भाजुनि किती चांगल्या!
वाचताना तोंडाला पाणी सुटले ना? याला म्हणतात रससंवेदना! अशाप्रकारे कवितेतून आपण  आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांशी निगडित असलेल्या संवेदनांचा आनंद मनाने घेऊ शकतो, तेही समोर प्रत्यक्ष व्यक्ती वा वस्तू काहीही नसताना! आहे किनई कवितेचे सामर्थ्य अद्भुत!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link