Next
गुढीपाडवा म्हणजे आनंदाचा सण
शब्दांकन : योगिता राऊत
Friday, April 05 | 04:00 PM
15 0 0
Share this story

 चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी आपल्याकडे गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. इंग्रजी नवीन वर्षाला जसे संकल्प केले जातात, तसेच संकल्प याही दिवशी केले जातात आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. आपल्या लाडक्या कलाकारांनीही या नवीन वर्षासाठी संकल्प केले आहेत. जाणून घेऊ या त्यांचे हे संकल्प आणि गुढीपाडव्याविषयीच्या त्यांच्या आठवणी...आनंद द्विगुणित
- नंदिता पाटकर

गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. नवीन गोष्टी, नवीन काम याचे नेहमीच वेध लागलेले असतात. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही नवीन कामाने व्हावी, अशीच इच्छा असते. परंतु एखाद्या वर्षी पाडव्याच्या दिवशी काही काम नसेल तर परिवारासोबत सण साजरा करणे हे अगदी नेटाने होते. आईला गुढी उभारायला मदत करणे, स्वयंपाक करण्यात हातभार लावणे आणि छानशी साडी नेसून पारंपरिक पद्धतीने नटणे ही सगळी हौस या दिवशी भागवून घेते. त्यातही पाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या शोभायात्रा बघायला प्रचंड आवडतात. हा पाडवा माझ्यासाठी सर्वार्थाने खास आहे. या वर्षात दोन खूप महत्त्वाच्या आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारायला मिळाल्या. विशेष म्हणजे या दोन्ही भूमिकांसाठी मला नामांकनेही मिळाली. ‘आमच्या हिचं प्रकरण’ या नाटकासाठी ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’ आणि ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री.’यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो? वेगळ्या धाटणीच्या भूमिकेसाठी कौतुकाची थाप मिळणे कलाकारासाठी नेहमीच महत्त्वाचे असते. याशिवाय मे -जूनदरम्यान माझा एक चित्रपटही प्रदर्शित होत असल्याने यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी विशेष आहे.

-------------------------

नवीन माध्यमाचा अनुभव घ्यायचाय
- हृता दुर्गुळे

गेल्या सहा वर्षांपासून गुढीपाडवा सेटवरच साजरा करते आहे. बरेच सण मी दोनदा साजरे करते. एक माझ्या खऱ्या कुटुंबासोबत आणि एक सेटवरील कुटुंबासोबत. मुंबईत राहूनही आणि अनेकदा प्रमोशनच्या निमित्ताने गिरगावची शोभायात्रा पाहायला मिळत नव्हती. शोभायात्रेतील सहभागाचा अनुभव खूपच सुंदर असतो. रंगीबेरंगी वातावरण, पारंपरिक पोशाख, ढोल-ताशांचा गजर, एकंदरच भारावून जाणारा नजारा असतो. मात्र या वर्षी मला हा आनंद लुटता येणार नाही. अर्थात हा गुढीपाडवा माझा आनंद द्विगुणित करणारा आहे. माझी इच्छा होती की यावर्षी तरी नाटक यावे आणि ‘दादा एक गुड आहे’च्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. विविध माध्यमांमधून मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेय आणि तो यशस्वीही होत आहे. शिवाय ‘सर्वोत्कृष्ट आकर्षक अभिनेत्री’ म्हणून पारितोषिक मिळाल्याने मी खुश आहे. पाडव्याच्या दिवशी ‘दादा एक गुड न्यूज आहे’चा प्रयोग असल्याने वर्षाचा हा पहिला दिवस माझ्यासाठी खास आहे. येणाऱ्या वर्षातही मला एखाद्या नवीन माध्यमाचा अनुभव घेता यावा, अशी माझी मनापासूनची इच्छा आहे.

-------------------------

यंदाचा पाडवा खासच
- संतोष जुवेकर

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. त्यामुळे पहिल्या दिवशी जोमानं काम करायला मला जास्त छान वाटते. त्यामुळे बऱ्याचदा गुढीपाडवा मी सेटवरच साजरा केला आहे. चित्रीकरण नसेल त्यावेळी मी हा सण घरच्यांसोबत साजरा करतो. प्रत्येक गुढीपाडवा हा माझ्यासाठी खासच असतो. तरीही लहानपणीचा गुढीपाडवा हा नेहमीच लक्षात राहणारा आहे. तेव्हा कामांचा व्याप नव्हता. कसली चिंता नव्हती. या दिवशी सुट्टी मिळाली, की घरच्यांबरोबर, मित्रांबरोबर फक्त धमाल करायची बस्स. आता तसे नाही आणि तसे असावे, अशी अपेक्षाही नाही. यंदाचे हे वर्ष माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आणि उत्सुकता वाढवणारे आहे. ‘डिसोनन्स’ ही जर्मन शॉर्ट फिल्म मी करतोय. यासाठी मी ऑडिशन दिली होती आणि नशिबाने माझी निवडही झाली. माझ्या कामाची दखल घेतली जातेय आणि मला काम करण्याची संधी मिळतेय, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठी माझ्या पाठीशी सर्वांचेच आशीर्वाद आहेत. त्यामुळे हा पाडवा माझ्यासाठी नक्कीच खास आहे.


तब्येतीची काळजी घेणार

- सुरुची आडारकर

गुढीपाडवा हे हिंदू नववर्ष आहे. नवीन वर्षाचा आनंद मला कुटुंबासोबत घरी साजरा करायला आवडतो. यंदाचं हे नवीन वर्ष, ‘एक घर मंतरलेलं’च्या कुटुंबासोबत साजरं करणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचा उत्साह यंदाही टिकून आहे. नवीन वर्ष हे सुख-समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं असं आपण नेहमी म्हणतो. ही भरभराट अनुभवण्यासाठी फिट असणं गरजेचं आहे. यंदाच्या नवीन वर्षाचा संकल्प म्हणून, मी स्वतःकडे लक्ष देऊन, फिट राहायचं ठरवलं आहे. असाच संकल्प तुम्हीदेखील करा. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

कामात सातत्य राखायचं आहे
- यशोमन आपटे

हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! लहानपणापासूनच घरच्यांसोबत गुढीपाडवा साजरा करतो आहे. लहानपणी नेहमीच गुढी उभारण्याचं काम माझ्याकडे असे. मला ते फारसं कधी जमलं नाही. मग शेवटी लाह्या,बत्तासे आणायचं काम माझ्यावर सोपवून, बाबाच गुढी उभारायचे. ‘फुलपाखरू’ मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून यंदाही घरच्यांसोबत नवीन वर्ष साजरं करणारआहे. संकल्पाचं म्हणाल, तर यंदा विशेष असं काही ठरवलेलं नाही. सणांच्या दिवशी एक सकारात्मक ऊर्जा आपोआपच आपल्याला मिळत असते. त्यानुसार सकारात्मक होऊन, एखादी नवीन गोष्ट सुरू करून त्यात सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल.


संकल्प झाडं लावण्याचा
- विजय आंदळकर


सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! दरवर्षी एक संकल्प मी नियमित करतो, तो म्हणजे वृक्षारोपण करणे. यंदाही हा संकल्प असणारच आहे. हा संकल्प आपण सर्वांनीदेखील करावा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. शिवाय, एक सुज्ञ नागरिक म्हणून, ट्रॅफिकचे नियम पाळणं, हे आपलं कर्तव्य आहे. ते माझ्याकडून नीट पाळले जातील याची काळजी यंदाच्या नवीन वर्षांपासून घेणार आहे. 


नाटक पाहायचं आणि करायचंही!
- तितिक्षा तावडे


आमच्या गावच्या घरी, अगदी न चुकता गुढी उभारली जाते. कामात व्यग्र असल्याने, दरवर्षी गावाला जायला जमत नाही. परंतु, मालिकांच्या निमित्ताने गुढीपाडव्याचा सण आवर्जून साजरा करायला मिळतो, याचा आनंद आहे. यंदाही ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेच्या सेटवर आम्ही गुढीपाडवा उत्साहात साजरा केला. मराठी नवीन वर्षाचा संकल्प म्हणून भरपूर मराठी नाटकं पाहण्याचं ठरवलं आहे. ही नाटकं पाहून, एखाद्या उत्तम मराठी नाटकात काम करायची संधी मलाही मिळवता यावी अशी माझी इच्छा आहे. मराठी नवीन वर्षाच्या, आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा!नवीन वर्षात भरपूर काम करायचं आहे
- जुई गडकरी


गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा! गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी व्हायला मला खूप आवडतं. यंदा मी गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. लहानपणापासून गुढी सजवण्याची खूप आवड आहे. आजही गुढी सजवताना लहानपणीच्या आठवणी मनात रुंजी घालतात. यंदाच्या वर्षात फार सकारात्मक राहून काम करायचं आहे. जेणेकरून, खूप चांगल्याप्रकारे आणि भरपूर काम करता येईल.


भरपूर मराठी  पुस्तक वाचणार
- सिद्धार्थ बोडके


गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, बाबांसोबत बाजारात जाऊन येणं, त्यांना गुढी उभारायला मदत करणं या गोष्टी ठरलेल्या असायच्या. त्याचबरोबरीने मनसोक्तपणे, आईनं केलेली पुरणपोळी खाणं म्हणजे सुख. गेल्या दोन वर्षांत मात्र कामाच्या व्यापामुळे गुढीपाडव्याच्या माझ्या या नित्यक्रमात खंड पडला आहे. ३१ डिसेंबरला जसा आपण एखादा संकल्प करतो तसाच मराठी नूतन वर्षाच्या निमित्तानेदेखील करायला हवा. या वर्षापासून वाचन वाढवण्याचा माझा संकल्प आहे. जास्तीत जास्त मराठी पुस्तकं या नवीन वर्षात वाचायची आहेत. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


घरासाठी वेळ देण्याचा संकल्प
- सुहृद वार्डेकर


नवीन कपडे घालणं, सर्वांनी मिळून गुढी उभारणं, आईच्या हातच्या चविष्ट पदार्थांवर ताव मारणं, अशी मजा लहानपणी केली आहे. आता कामाच्या व्यग्रतेमुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. कुटुंबाला फार वेळ देता येत नाही. यंदाचा माझा संकल्प हाच असणार आहे. ‘एक घर मंतरलेलं’ मालिकेच्या चित्रीकरणात आणि इतर कामांमध्ये व्यग्र असूनही घरच्यांसाठी आणि तब्येतीसाठी वेळ द्यायचा आहे. तुम्हीसुद्धा आपल्या व्यग्र वेळापत्रकातून, थोडासा वेळ यासाठी काढावा, अशी विनंती...

लोकांना भेटून शुभेच्छा द्या
शिवानी बावकर 

गुढीपाडवा आमच्याकडे अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गुढी उभारून तिची पूजा केली जाते. शाळेत असताना माझी आजी म्हणायची तुला जो विषय कठीण जातो त्या विषयाचा अभ्यास नवीन वर्षात सुरू केला तर तो विषय सोपा जातो, म्हणून मी त्या दिवशी अभ्यास करायचे. माझा नवीन वर्षाचा संकल्प असा काही नाही, पण ‘लागिरं झालं जी’ मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे घरी जाता येणार नाही. मात्र व्हिडिओकॉल करून फोनवर बोलणार आहे. लोकांना फक्त मेसेज करून शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्याशी बोलून आणि शक्य तितक्या लोकांना भेटून त्यांना शुभेच्छा देईन.


पारंपरिकतेची जपणूक
हार्दिक जोशी 
गुढीपाडवा आमच्याकडे अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. माझ्या आजोबा-पणजोबांपासून ज्या पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली जायची त्याच पद्धतीने सकाळी लवकर उठून पूजा करून गुढी उभारली जाते. घरी आई नैवेद्याचंछे जेवण करते, त्या दिवशी घरात सगळे एकत्र येतात. पण आता ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूरमध्ये होत असल्यामुळे घरी जाता येत नाही. मला आणखी एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे ती म्हणजे आपल्या सणांकडे सुट्टी म्हणून बघू नका तर ते पारंपरिक पद्धतीने साजरे करा जेणेकरून ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून आजपर्यंत रसिकप्रेक्षकांनी जे प्रेम दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, घरच्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करेन.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link