Next
पाकिस्तानला पुन्हा नमवणार?
अमित मधुकर डोंगरे
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story

बाराव्या विश्वचषकस्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतीय संघाने आपली विजयी मोहीम धडाक्यात सुरू केली आहे. या स्पर्धेत आता इतरही सामने खेळायला मिळणार असले तरी १६ तारखेला होणारा भारतविरुद्ध पाकिस्तान सामना संपूर्ण स्पर्धेतील महत्त्वाचा सामना ठरणार आहे.
सलग तिसऱ्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे या स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे, तर भारतीय संघाने विनर ही बिरुदावली या स्पर्धेतील पहिल्या विजयाने टिकवली असली तरी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तानविरुद्धही असाच खेळ करावा लागणार आहे. असे असले तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. भारतीय पाठीराखे या सामन्याकडे नेहमीच लक्ष ठेवून असतात. आजवर झालेल्या विश्वचषकस्पर्धांमधील लढतींत पाकिस्तान संघ एकदाही भारतीय संघाला पराभूत करण्याचा चमत्कार करू शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर लूजरचा शिक्का बसला आहे. म्हणूनच या स्पर्धेतील सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘चोकर,’ भारत ‘विनर’ आणि पाकिस्तान ‘लूजर’ असेच चित्र रंगवले जात आहे.
या स्पर्धेची सुरुवात होत असताना जरी भारतीय संघाला जगज्जेतेपदाचा प्रमुख दावेदार समजले जात असले तरी इंग्लंडचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा संघदेखील एकदम जोशात आहे. आजवर विश्वचषकस्पर्धेत जेव्हा जेव्हा पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध खेळला आहे, त्या त्या वेळी भारतीय संघच विजेता ठरला आहे. यावेळीदेखील हीच परंपरा कायम राखण्यासाठी भारतीय संघावर थोडे दडपण राहणार आहे. पाकिस्तानचा संघाने या स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा दौरा केला होता. त्यात मोठ्या धावसंख्येचे सामने झाले, तरीदेखील यजमान इंग्लंडने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. या दौऱ्यामुळे पाकिस्तानी संघाला इंग्लंडमधील वातावरणाचा चांगलाच अनुभव मिळाला आहे. त्यामुळेच इंग्लंडला हरवून पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाला जणू इशाराच दिला आहे. दुसरीकडे, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सहज विजय मिळवत सुरुवात धडाक्यात केली आहे. पुढे याच आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि आफगाणिस्तानविरुद्ध सामने होत असले तरी १६ तारखेला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानचा संघ नव्याने घडत असल्याने भारतीय संघाला त्यांना पुन्हा एकदा पराभूत करण्याची चांगली संधी आहे. विश्वचषकस्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाकडून नेहमी पराभूत होणारा पाकिस्तान संघ ही परंपरा खंडित करणार का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानची गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली असली तरी त्यांचे क्षेत्ररक्षण खूपच गचाळ आहे, याचा लाभ भारतीय संघाला होऊ शकतो. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पाकिस्तानने उचल खाल्ली आहे, त्यामुळे भारतीय संघाला केवळ परंपरेवर अवलंबून राहून चालणार नाही. भारतीय संघाबाबत बोलायचे झाले, तर रोहित शर्मा, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फिरकी गोलंदाज चालले, मात्र पाकिस्तानविरुद्ध ते चालतीलच याची खात्री देता येणार नाही, कारण पाकिस्तानचे फलंदाज फिरकी गोलंदाजी चांगली खेळतात, आणि एकटा जसप्रीत बुमराह सगळ्या संघाला बाद करू शकत नाही. भारताची गोलंदाजी पाकिस्तानपेक्षा कमकुवत आहे याचा लाभ पाकिस्तान घेऊ शकतो. रोहित, धवन, विराट, धोनी यांच्याबरोबरीने केदार जाधव आणि हार्दिक पंड्या यांनाही फलंदाजीचा भार उचलावा लागणार आहे, कारण पाकिस्तानचा संघ कमजोर असला तरी कधीही उसळी घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे आणि भारताविरुद्ध त्यांचा खेळ आणखीन उंचावतो.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर रोहित, धवन, विराट यांच्याबरोबरच धोनी, केदार व पंड्या यांच्या फलंदाजीत सातत्य नाही ही वस्तुस्थिती आहे. एकटा रोहित किंवा विराट त्रिशतकी धावा उभारू शकत नाहीत, त्यासाठी सगळ्याच फलंदाजांना वाटा उचलावा लागणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल होऊन खूप दिवस झाले असल्याने येथील वातावरणाशी ते एकरूप झाले आहेत. तसेच, तिथल्या खेळपट्ट्यादेखील फलंदाजीसाठी पोषक ठरत आहेत. त्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो, मात्र बुमराह वगळता बाकी गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी चांगल्या कामगिरीवर भर द्यावा लागणार आहे. धवन, रोहित, राहुल यांच्या फलंदाजीत सातत्य नाही, ही बाब पाकिस्तानच्या पथ्यावर पडू शकते. पाकिस्तान संघात जरी नवखे खेळाडू असले तरी इंग्लंडविरुद्धची त्यांची कामगिरी पाहता भारतीय संघाला मोठे आव्हान देण्याची त्यांच्यात निश्चितच क्षमता आहे. महंमद आमीरसारख्या गोलंदाजाचा सामना कसा करायचा याचे दडपण भारतीय फलंदाजांवर निश्चितच राहणार आहे.
भारतीय संघ या स्पर्धेत पूर्ण ताकदीनिशी उतरला असला तरी संघाची फलंदाजी नेहमीसारखी बलाढ्य दिसत नाही. पहिल्या सामन्यात रोहितने शतक झळकावले असले तरी धवन, राहुलचे अपयश नक्कीच झोंबणारे आहे. एकटा कोहली प्रत्येक सामन्यात संघाला विजय मिळवून देणार नाही, त्यामुळे बाकीच्या फलंदाजांनाही जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. गोलंदाजीतही एकटा बुमराह बळी घेऊ शकत नाही.
या स्पर्धेत १९९२ च्या स्पर्धेप्रमाणे प्रत्येक संघाला इतर सगळ्या संघांशी सामना करणार असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी किमान सहा सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. भारतासाठी न्यूझीलंड, अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान यांच्याशी होणारे सामने गुण मिळवून देणारे ठरणार यात शंका नाही. मात्र वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला सर्वस्व पणाला लाऊन खेळ करावा लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना केवळ ट्रेलर ठरणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link