Next
नद्यांची व्यथा
दिलीप नेर्लीकर
Friday, February 08 | 05:00 PM
15 0 0
Share this story

“अरे काय झालं? केला ना देवाचा फोटो खराब. असा फोटो घरात ठेवू नये. जा नदीत विसर्जन करून या!” हा एकच नव्हे तर असे अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी घडत असतात, पण प्रत्येकावर तोडगा एकच... वाहत्या पाण्यात विसर्जन करा! देवावरची फुलं, पानं, काही विधित वापरलेलं अन्न, इतर पदार्थ एकदा का नदीत विसर्जित केले आणि तिथेच पाय धुवून डोळ्याला पाणी लावलं, की आपण पापमुक्त झालेल्या आनंदात घरी जायला मोकळे. इतकंच काय तर आपल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या गंगामाईत कोण काय विसर्जित करतात हे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, की आपण पवित्र मानतो त्या गंगा नदीचा जगातील मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालेल्या पाण्याच्या स्रोतात बराच वरचा नंबर का लागतो ते. भारत सरकारनं यासाठीच एक प्रयत्न म्हणून गंगाप्रदूषण रोखण्यासाठी वेगळा विभागच बनवला आहे. परंतु हे झालं गंगेपुरतं मर्यादित. आपल्याकडील प्रत्येक नदीची हीच कथा आहे, मग ती कृष्णा असो किंवा गोदावरी असो किंवा आणखी कुठलीही नदी असो. खरं तर या नद्या जीवनदायिनी आहेत. त्यांच्याचमुळे त्यांच्या काठावर सुफलाम (‘सुजलाम’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला नाही) शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालं आहे, पण या नद्यांची व्यथा आपल्यापैकी फारच थोड्या लोकांना समजते.

संथ वाहते कृष्णामाई, काठावरल्या सुखदु:खांची जाणीव तिजला नाही! मराठी चित्रपटातील हे गाजलेलं गाणं, पण आज त्याच कृष्णामाईची व्यथा पाहिली की तिच्याच सुखदु:खाची आपल्यालाच जाणीव नाही, असं खेदानं म्हणावं लागतं, कारण या पाण्यात काय काय मिसळतं हे वाचलं तर कदाचित तुम्ही पाणीही पिणार नाही. शेतातील पिकांवर अनेक प्रकाराचे रोग पडतात. मग त्यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकं फवारली जातात. पावसाच्या पाण्यानं, इतर कारणांनी फवारणी केलेली ही कीटकनाशकं जमिनीत झिरपतात आणि हे झिरपणाऱं पाणी अखेर नदीच्या प्रवाहात मिसळतं. नदीतील असंख्य जलचर प्राणिमात्रांवर यांचा परिणाम होतो. यातल्या काही उपकारक जाती नामशेषही  झालेल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणारा रासायनिक खतांचा वापरही पाणीप्रदूषणास जबाबदार आहे. तुम्ही नदीकाठावर असणाऱ्या गावातील असाल किंवा तुम्हाला तलाव, विहिरीतून पाणी मिळत असेल, तरीही तुमचं पाणी दूषित असण्याची शक्यता असते.

नदीला मिळणारे नाले, घराघरातील सांडपाणी, मैला, शेतीशी निगडित अशा जनावरांचे मलमूत्र यांचा पाण्यात होणारा निचरा तिचं पाणी दूषित करतात. शेतीत वापरली गेलेली रासायनिक खतं जमिनीत उतरतात आणि मग जमिनीत झिरपणाऱ्या पावसाच्या प्रवाहाबरोबर एक तर नदीत मिसळतात किंवा जमिनीवरून खाली खोल खडकात तयार होणाऱ्या पाण्याच्या  साठ्यापर्यंत (aquifers) पोचतात. असा हा खडकातील प्रदूषित साठा अनेक वर्षं तसाच प्रदूषित राहतो, कारण तो साठा पिण्यासाठी योग्य करणं शक्य नाही. तो बाहेर काढूनच त्यावर प्रक्रिया करावी लागेल. यावर एकच उपाय, पाण्याचं होणारं प्रदूषण थांबवा. हे वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल की झऱ्याचं पाणी हे नेहमी शुद्धच असतं, ही आपली संकल्पना किती चुकीची आहे.

युनोनं केलेल्या एका पाहणीत आणखी एक धक्कादायक गोष्ट निदर्शनास आली आहे, ती म्हणजे जगातील वापरलेल्या आणि प्रदूषित झालेल्या पाण्यापैकी ८० टक्के पाणी कोणतीही प्रक्रिया न करताच तसंच पुन्हा पाण्याच्या स्रोतात मिसळतं. काही काही मागासलेल्या राष्ट्रांत तर हे प्रमाण ९५ टक्क्यांच्या आसपास आहे. या बाबतीतली अमेरिकेतील आकडेवारी ही अत्यंत पुढारलेल्या देशांचीही छोटीशी रडकथा दर्शवते. खरं तर तिथं प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा बऱ्यापैकी कार्यरत आहे. तिथे दररोज अंदाजे १४० अब्ज लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी पाठवलं जातं, तरीही दररोज १० एक अब्ज लिटर पाणी प्रक्रिया न करताच तसंच प्रवाहात येतं. आपल्या देशात केलेल्या पाहणीत असं आढळून आलं आहे, की फक्त शहरी भागांतून दररोज ६२०० कोटी लिटर सांडपाणी तयार होतं आणि यातील फक्त २३३० कोटी लिटरवर प्रक्रिया केली जाते. राहिलेलं जसंच्या तसं पुन्हा पाण्याच्या स्रोतात येतं. निसर्गात प्रत्येक जीवाचं पोषण होण्यासाठी जे जे काही लागतं त्याच प्रमाण बिघडलं की काय होतं याचा विचार करताना आपण पाण्यावर तरंगणाऱ्या साध्या शेवाळाचा विचार करू, कारण ते दृश्य स्वरूपात लगेच दिसतं. आपल्या नद्यांवर, तलावांवर, मोठ्या पाणीसाठ्यांवर ते पटकन वाढतं. ते वाढण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे अतिरिक्त रासायानिक खतांचा पाण्यातून होणारा निचरा हा या शेवाळाच्या वाढीला पोषक ठरतो. त्यामुळे त्यांना लागणारा प्राणवायूचा पुरवठा हा त्याच पाण्यातून घेतला जातो, याला इंग्रजीत eutrophication असं म्हणतात  त्यामुळे पाण्यातील इतर वनस्पती आणि प्राण्यांना लागणाऱ्या प्राणवायूचा पुरवठा कमी होतो याचा परिणाम म्हणून एक तर असे प्राणी, जीवजंतू मृत होतात किंवा त्यांची संख्या घटते आणि याचा पाण्याशी संबंधित जैविक साखळीवर खूप मोठा आघात होतो. नदीकाठांवर असणारे रसायनं आणि खनिजावर प्रक्रिया करून बनवल्या जाणाऱ्या धातूंच्या कारखान्यातून निघणारं प्रदूषित पाणी हाही एक डोकेदुखीचाच विषय आहे. यातली काही रासायनिक द्रव्यं इतकी धोकादायक आहेत, की ते मानवजातीवर दूरगामी परिणाम करू शकतात. यात मुख्यत्वेकरून अॅल्युमिनियम, निकेल, जस्त, शिसे, कॅडमियम या धातूंचा मोठा भाग आहे, तर तांबं आणि पाऱ्याच्या संयुगांचा उपयोगही काही कीटकनाशकांत केला जातो आणि हे सर्व शेवटी पाण्यातून तुमच्यापर्यंत पोचतं!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link