Next
उत्तुंग शिखरांचा प्रदेश
विशेष प्रतिनिधी
Friday, November 16 | 05:30 PM
15 0 0
Share this story

महाराष्ट्र हा झपाटलेल्या कार्यकर्त्यांचा प्रदेश आहे असे महात्मा गांधींनी म्हटले होते, पण त्याचबरोबर महाराष्ट्र हा उत्तुंग व्यक्तिमत्त्वे असलेल्या व त्यांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या लोकांचाही प्रदेश आहे. सह्याद्री व गोदा-कृष्णेच्या या प्रदेशाने अनेक महनीय व्यक्तिमत्त्वांना जन्माला घातले आणि त्यांचा सन्मान केला. सध्या हा प्रदेश पु. ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर या तीन लाडक्या व्यक्तिमत्त्वांचे कृतज्ञतेने व प्रेमाने स्मरण करीत आहे. हे या तिन्ही सरस्वतीपूजकांचे जन्मशताब्दीवर्ष आहे. या तिघांनी आपल्या साहित्य व संगीतकृतींनी मराठी मनावर गारुड केले आहे आणि त्याचा भर ओसरण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. नव्या पिढीने या महानुभावांना प्रत्यक्ष पाहिले नाही, पण ते त्यांना त्यांच्या साहित्य, संगीत व काव्यातून पाहत असतात. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तरुण पिढीला आपल्या या कलावारशाची अधिक ओळख होत आहे. ही नवी पिढी या तिघांच्याही कलाकृतींचा अनुभव आपापल्या पद्धतीने घेत आहे. एका तरुण गायक-संगीतकारांच्या गटाने गदिमा-फडके यांच्या गाजलेल्या चित्रपट व भावगीतांचे आपल्याला भावलेल्या पद्धतीने सादरीकरण केले आहे, ते अद्भुतच म्हणावे लागेल, तर काही तरुण मंडळींनी पुलंच्या साहित्यकृतींचे पुलंच्या शैलीशी नाते सांगणाऱ्या शैलीतच सादरीकरण केले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांचा गेल्या अर्धसहस्रकापासून महाराष्ट्रावर प्रभाव आहे, तसाच प्रभाव पुल, फडके, गदिमा यांचा महाराष्ट्रावर दीर्घकाळ राहणार आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या मंगेशकर घराण्यातील भावंडांचे वाढदिवस नुकतेच महाराष्ट्राने उत्साहात साजरे केले. सह्याद्रीच्या उतुंग शिखरासारखी ही व्यक्तिमत्त्वे आज पन्नाशी ते सत्तरीच्या घरात पोहचलेल्या लोकांचे आदर्श होते. त्यांना पाहत, ऐकत, वाचत ही पिढी म्हातारी झाली आणि आता या आदर्शांचा वारसा त्यांनी तरुण पिढीकडे सोपविला आहे. विसाव्या शतकाने महाराष्ट्राला खूप मौल्यवान अशी नररत्ने दिली. या नररत्नांनी मराठी माणसांचे जीवन समृद्ध केले, त्यांच्या आयुष्याला अर्थ दिला. पाच पिढ्या उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्र न्या. रानडे, लोकमान्य टिळक, आगरकर, फुले, आंबेडकर यांना विसरलेला नाही, विसरू शकत नाही, ते त्यामुळेच. अलिकडेच यशवंत देव, लालन सारंग व अॅडमिरल मनोहर आवटी यांचे निधन झाले. शंभरी गाठण्याची तयारी करत असतानाच ते आपल्यातून निघून जावेत हे दुर्दैव आहे, पण ते शरीराने गेले असले तरी त्यांचा वारसा कायम महाराष्ट्राच्या हृदयात आणि मनात जिवंत असणार आहे. मराठी रंगभूमी हा भारताच्या नाट्यइतिहासातला चमत्कार आहे. या रंगभूमीने अनेक दिग्गज नट निर्माण केले. आज त्यातले काही नव्याने भेटायला येत आहेत, याचा मराठी मनाला खूप आनंद होत आहे. आपण एकेकाळी ज्यांचा जिवंत अभिनय याचि डोळा पाहिला, त्यांची आता कथा, दंतकथा, गौरवकथा चित्ररूपात पाहायला मिळावी हा एक अजब चमत्कार आहे. ‘झी मराठी दिशा’ या सर्व महनीय व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करीत आहे, आणि ते करीत असतानाच या व्यक्तिमत्त्वांना जवळून पाहणाऱ्यांकडूनच त्यांची महती आपल्या वाचकांना कळावी यासाठी प्रयत्नशील आहेे. त्यामुळे अशा महान व्यक्तींवर तितक्याच योग्यतेच्या व्यक्तींकडून लेख, आठवणी लिहून घेतल्या आहेत. या सर्व लेखकांनी ‘झी मराठी दिशा’ची विनंती मान्य करून एक ऐतिहासिक कार्य केले आहे. येत्या काळात हे लेख ऐतिहासिक दस्तावेज म्हणून पाहिले जातील यात शंका नाही.

‘झी मराठी दिशा’ वेळोवेळी या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला असाच उजाळा देत राहील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link