Next
बुम बुम बुमराह
अमित मधुकर डोंगरे
Friday, September 06 | 03:00 PM
15 0 0
Share this story


जागतिक क्रिकेटमध्ये यशस्वी गोलंदाज व्हायचे असेल, तर त्याचा रनअप, स्टार्ट, रिलीज आणि गोलंदाजीची शैली अचूक असावी, लागते असे संकेत आहेत. मात्र या कोणत्याही तत्त्वात न बसता भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कमालीचा यशस्वी ठरत आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणारा बुमराह आज जागतिक क्रिकेटमधील सर्वात धडाकेबाज गोलंदाज म्हणून नावारूपाला आला आहे.
विचित्र परंतु तितकीच प्रशंसनीय गोलंदाजीची शैली असूनही बुमराहने अगदी थोड्या काळात देशाचा सर्वात वेगवान गोलंदाज अशी ख्याती मिळवली. अत्यंत अचूक यॉर्कर हेच त्याचे ब्रह्मास्त्र आहे आणि सामन्यात कोणत्याही क्षणी असे अचूक यॉर्कर टाकून भागीदारी फोडण्याचे त्याचे कसब कौतुकास्पद आहे. त्याचा स्टार्ट, रनअप, शैली, रिलीज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची शैली अत्यंत अनाकलनीय असूनही स्विंगवर असलेले नियंत्रणच त्याला इतर गोलंदाजांपेक्षा जास्त वेगळे बनवते. २०१६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२०, तर त्याच वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण करताना त्याने क्रिकेट समीक्षकांना तसेच सो कॉल्ड महान खेळाडूंना आश्चर्यचकित करून सोडले. त्याच्या राऊंड आर्म शैलीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते तसेच त्याला फारसे यश मिळणार नाही, असेही भाकीत केले होते. मात्र बुमराहने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने अशा भाकितकारांचीच विकेट काढली.
त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८ साली कसोटी क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले व केवळ एक वर्षाच्या आत तो भारतीय गोलंदाजीचा मेरुमणी ठरलाच शिवाय जगातील पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज ठरला. ज्या राऊंड आर्म शैलीमुळे त्याची गोलंदाजी यशस्वी होईल, असे वाटत नसतानाच त्याने या शैलीच्या जोरावर यॉर्करवर आपली हुकमत प्रस्थापित केली. दुखापत झालेल्या भुवनेश्वर कुमारच्या जागी त्याची संघात निवड झाली होती. त्यावेळी त्याने प्रत्येक सामन्यात स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करताना संघातील स्थान पक्के केले, आज तर त्याच्याकडे संघाचा सर्वात अग्रेसर गोलंदाज म्हणूनच पाहिले जाते.
गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा बुमराह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला. पदार्पणाच्याच मोसमात सर्वात जास्त बळी मिळवणारा जगातील तो तिसरा गोलंदाज ठरला, त्याने पहिल्याच मोसमात नऊ कसोटी सामन्यात ४८ बळी मिळवले आहेत. आजवर अकरा कसोटी सामने खेळताना त्याने बळींचे अर्धशतकदेखील पूर्ण केले. सर्वात कमी सामन्यांत अशी कामगिरी करणारा बुमराह हा अजित आगरकरनंतरचा दुसराच गोलंदाज ठरला आहे. त्याने ५८ एकदिवसीय सामन्यांत बळींचे शतक पूर्ण केले आहे त्याच बरोबर ४२ टी-२० सामने खेळतानाही त्याने बळींची पन्नाशी पार केली आहे. २०१३ साली गुजरातकडून खेळताना विदर्भविरुद्धच्या रणजी सामन्यातून त्याने प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने सात गडी बाद करत आपल्या अचूकतेची चुणूक दाखवली.
बुमराहने क्रिकेट समितीचे लक्ष वेधून घेतले ते २०१८ साली. देशांतर्गत क्रिकेटस्पर्धेत त्याने तब्बल ७८ बळी मिळवले होते. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करताना त्याने रॉयल चॅलेंजर बंगळुरूचे तीन बळी ३२ धावांत मिळवले होते, आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० सामन्यांच्या इतिहासात एकाच मोसमात सर्वाधिक बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज ठरला, त्याने पहिल्याच मोसमात २८ विकेट मिळवल्या.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत त्याच्याच गोलंदाजीच्या जोरावर भारताने मालिकाविजय साकार केला. पहिल्या कसोटीत त्याने केवळ सात धावा देताना पाच विकेट मिळवून इतिहास रचला. तसेच दुसऱ्या कसोटीत त्याने हॅटट्रिक करताना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा इरफान पठाण आणि हरभजनसिंग यांच्या नंतरचा तिसरा गोलंदाज बनण्याचा मान मिळवला.
श्रीलंकेच्या मलिंगाप्रमाणेच राऊंड आर्म शैलीचा बुमराहने अचूकतेसाठी खूपच उपयोग करून घेतला. सामन्यातील कोणत्याही क्षणी यॉर्कर टाकण्याची अफाट आणि अचाट क्षमता त्याने सिद्ध केली आहे. भारताचा आजवरचा सर्वात वेगवान गोलंदाज अशी ओळख त्याने फारच थोड्या काळात प्रस्थापित केली आहे, हे विशेष. पाकिस्तानचा महान डावखुरा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याला आदर्श मानणारा बुमराह आज जगातील महान गोलंदाजांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे. त्याने ताशी १५३.२६ किलोमीटर इतक्या वेगाने चेंडू टाकताना क्रिकेटच्या कथित जाणकारांनादेखील कोड्यात टाकले आहे.
-------------------------------------------------------

वसीम अक्रमकडून गुणगान


आजच्या आधुनिक क्रिकेटच्या काळात सगळ्या वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराह जास्त सरस असल्याचे सांगत खुद्द वसीम अक्रमने त्याचे गुणगान केले, तेव्हा या प्रशंसेच्या रूपाने सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला, असे बुमराह अत्यंत अभिमानाने सांगतो. गुजरातमधील अहमदाबादमध्ये १९९३ साली जन्मलेला बुमराह कितीही यशस्वी ठरत असला तरी त्याचे पाय जमिनीवर घट्ट आहेत. क्रिकेटपटूंना यश मिळाल्यानंतर स्वभावात दिसणारा माज त्याच्यात कधीच दिसला नाही. हसताखेळता चेहरा आणि सतत काहीतरी शिकण्याची त्याची आस त्याला अन्य गोलंदाजांपासून वेगळा ठरवते.

राईट सिलेक्शन
मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक जॉन राईट यांनी प्रथम बुमराहची गुणवत्ता ओळखली. त्यांच्या विनंतीमुळेच त्याची मुंबई इंडियन्सची संघात वर्णी लागली. यॉर्करवरच्या त्याच्या हुकमतीमुळे त्याला यॉर्करकिंग आणि डेथ ओव्हर बॉलर अशी बिरुदे मिळाली. टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अखेरच्या षटकांत फलंदाजाला वेगाने धावा करता येऊ नये यासाठी बुमराह सातत्याने यॉर्कर चेंडू टाकू शकतो, त्याची हीच गुणवत्ता त्याला खूपच कमी कालावधीत महान गोलंदाजांच्या पंक्तीत नेऊन बसवते.

मध्यमवर्गीय कुटुंब
बुमराहचा जन्म अहमदाबादमध्ये एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात झाला. सुरुवातीला देशांतर्गत पातळीवर तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महान गोलंदाज अशी ओळख निर्माण झाली, पैसा, पत, प्रतिष्ठा, मानसन्मान सगळे मिळाल्यानंतरदेखील मध्यमवर्गीय संस्कारांमुळे त्याच्या डोक्यात यशाची हवा गेली नाही. त्याचे वडील जसबीर हे लघुउद्योजक होते, तर आई दलजीतकौर या अहमदाबादमधील निर्माण हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. त्याची बहीण जुहिकादेखील जेबर हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे. बुमराह सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. परिस्थितीने अजिबात खचून न जाता त्याच्या आईने संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ केला. शिक्षणाबरोबरच बुमराहच्या क्रिकेटमधील कारकीर्द घडवण्याच्या स्वप्नांना पाठिंबा दिला.

पहिल्याच सामन्यात चुणूक
देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या सईद मुश्ताक अली क्रिकेटस्पर्धेतील पदार्पणाच्या टी-२० सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध खेळताना त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. किशोर त्रिवेदी यांच्याकडे त्याने वयाच्या चौदाव्या वर्षीपासून क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर केवळ चार वर्षांतच त्याने गुजरातच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले.

अफेअर्सची चर्चा


दक्षिण भारतीय अभिनेत्री राशी खन्ना आणि अनुपमा परमेश्वरन यांच्यासोबत बुमराहचे नाव जोडले जाऊ लागले. ज्यावेळी त्याने जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली तेव्हा काही व्यक्ती व प्रसार माध्यमांनी या गोष्टीला त्याच्या मैदानावरील कामगिरीपेक्षाही जास्त प्राधान्य दिले. कोणताही क्रिकेटपटू यशस्वी होतो तसेच वैयक्तिकरीत्या कोणा सेलिब्रिटीला भेटतो तेव्हा माध्यमांमध्ये अशा स्वरूपाच्या अफवांचे पीक येते. ट्वीटरवर बुमराहने काहीवेळा अनुपमालाच फॉलो केले म्हणून लगेच माध्यमांमध्ये त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. बुमराहने मात्र या सगळ्या अफवा असल्याचे सांगत सातत्याने या वृत्ताचे खंडन केले. मात्र त्याच्या खुलाशांचा कोणताही परिणाम झाला नाही.

सहकाऱ्यांकडून नामकरण
जर्मनीचा प्रख्यात टेनिसपटू बोरिस बेकर आणि पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज शाहीद आफ्रिदी यांना त्यांच्या वेगवान खेळामुळे बुम बुम अशी बिरुदे मिळाली, त्याचप्रमाणे अचूक आणि वेगवान यॉर्कर चेंडू सातत्याने टाकण्याच्या क्षमतेमुळे बुम बुम बुमराह असे त्याचे नामकरण झाले आहे. क्रीडाविश्वात खरे तर चाहत्यांकडून अशी नावे खेळाडूंना चिकटतात, इथे मात्र संघातील सहकारी खेळाडूंनीच बुमराहचे नामकरण केले. भारताच्या क्रिकेटवर्तुळात अमरसिंग आणि कपिल देव यांच्यानंतर इतकी सातत्यपूर्ण कामगिरी अन्य कोणी केलेली नाही. आजच्या घडीला जगातील सर्वात वेगवान गोलंदाज आणि तोदेखील एक भारतीय म्हणून त्याचे प्रचंड कौतुक होत आहे.

पैसा आणि प्रतिष्ठा
बुमराह जसजसा यशस्वी होत गेला तसतसा त्याच्याकडे लक्ष्मीचा ओघ सुरू झाला. मध्यमवर्गातील संस्कारी असलेल्या बुमराहला या यशाने हुरळून टाकले नाही, तर एक संवेदनशील व्यक्ती बनवले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्याशी प्रथम श्रेणीचा रिटेनरशिपचा सात कोटी रुपयांचा करार केला. याशिवाय त्याला एका कसोटीचे पंधरा लाख, एका एकदिवसीय सामन्याचे सहा लाख, तर एका टी-२० सामन्याचे तीन लाख रुपये या करारानुसार मिळतात.

ढोकळ्यासाठी वेषांतर
जन्म जरी पंजाबी कुटुंबात असला तरी बुमराह पक्का गुजराती बनला आहे. लहानपणापासूनच त्याला गुजराती पदार्थांची आवड लागली. मिष्टान्नापेक्षाही त्याला ढोकळा तसेच खमण प्रचंड आवडतो. आता तोच सेलिब्रिटी बनल्यामुळे त्याला पूर्वीप्रमाणे खाऊगल्लीत जाऊन आवडीचे पदार्थ खाता येत नाहीत. मग कधीतरी वेषांतर करून हा अवलिया ढोकळा खायला निवडक मित्रांबरोबर बाहेर पडतो आणि ढोकळ्यावर यथेच्छ ताव मारून येतो.

बच्चनसाहेबांचा चाहता
भारतात जसा क्रिकेट हा धर्म आहे आणि सचिन तेंडुलकर हा देव आहे, तसेच अमिताभ बच्चन हेदेखील सगळ्या देशवासीयांप्रमाणेच बुमराहसाठी देवच आहेत. लहानपणापासून त्याने कधीही बच्चनसाहेबांचे चित्रपट चुकवले नाहीत. शिक्षण घेत असताना किंवा क्रिकेटमध्ये व्यग्र असतानाही तो वेळात वेळ काढून आपल्या या लाडक्या अभिनेत्याचे चित्रपट आवर्जून पाहतो. बच्चनसाहेबांच्या चित्रपटांतून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते असेही त्याने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

नोबॉलमुळे निराशा
२०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहने टाकलेल्या नोबॉलमुळे खूपच टीका झाली. पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज फकर जमान बुमराहच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनीकडे झेल देऊन बाद झाला होता, मात्र हा चेंडू नो-बॉल असल्याची शंका पंचांना आली व त्यांनी तिसऱ्या पंचांच्या मदतीने या चेंडूची वैधता तपासली आणि तो नो-बॉलच असल्याचा निर्णय दिला. त्यावेळी जमान केवळ तीन धावांवर खेळत होता. या मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत त्याने दमदार शतकी खेळी केली. भारतीय संघाला हा मोठा फटका बसला होता. टीकाकारांनीदेखील याबाबत बुमराहवर बोचरी टीका केली होती. सामना संपल्यानंतर नव्हे तर त्यानंतर काही काळ बुमराहला या घटनेमुळे आलेली निराशा लपवता आली नव्हती. मात्र निवड समिती आणि प्रशिक्षक तसेच कर्णधाराने दाखवलेल्या विश्वासामुळेच तो या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर आला व आजचे यश मिळवले.

सचिन, सेहवागचा आदर्श


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपले आदर्श असल्याचे सांगताना मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना खेळण्यापूर्वी खुद्द सचिनकडून कॅप मिळाल्याचा क्षण आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण असल्याचे बुमराह सांगतो. मुंबई इंडियन्सकडुन खेळताना सचिनचे सल्ले उपयोगी ठरले तसेच सरावसत्रात सेहवागकडून मिळालेल्या टिप्समुळे खेळात सुधारणा झाल्याचेही बुमराह सांगतो. त्याचवेळी मुंबईकडून खेळणारा श्रीलंकेचा यॉर्करकिंग मलिंगामुळेच सातत्याने यॉर्कर चेंडू टाकण्याची आवड निर्माण झाल्याचेदेखील तो कबूल करतो.

अपघाताने संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत बुमराहला केवळ अपघाताने म्हणा किंवा योगायोगाने संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपुर लाभ घेतला व संघातील स्थान पक्के केले. या सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंची नावे निश्चित केली जात होती तेव्हा महम्मद शमीचा समावेश होणार होता. मात्र पायाचे स्नायू दुखावल्याने शमीने या सामन्यातून माघार घेतली व बुमराहला संधी मिळाली. या सामन्यात ३.३ षटके गोलंदाजी करताना त्याने २३ धावांत तीन गडी बाद केले. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना ३७ धावांनी जिंकला, इतकेच नव्हे तर या मालिकेत बुमराहने एकूण सहा बळी घेतले तेदेखील संघाला अत्यंत आवश्यकता आसताना, त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने ३-० असा विजय मिळवताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाला प्रथमच व्हाइट वॉश दिला.

धोनीची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बुमराहने मिळालेल्या संधीचा पुरेपुर लाभ घेतला. त्याची सातत्याने अचूक यॉर्कर चेंडू टाकण्याची क्षमता तत्कालीन कर्णधार धोनीने त्याचक्षणी ओळखली होती. गोलंदाजीची शैली जरी थोडी भिन्न असली तरीही बुमराहला सातत्याने यॉर्कर टाकण्यासाठी लाभदायक ठरत असेल तर त्यात वाईट काहीच नाही, असे सांगून धोनीने बुमराहचा भविष्यकाळ खूपच यशस्वी होईल, अशी भविष्यवाणी केली. ती खरी ठरल्याचेच आज दिसत आहे. बुमराहचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश हीच ऑस्ट्रेलियादौऱ्याची फलनिष्पत्ती असल्याचे त्यावेळी धोनीने सांगितले होते. बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेणाऱ्यांनादेखील धोनीने खरमरीत उत्तर देत बुमराहला संपूर्ण पाठिंबा दिला.

कोहलीमुळे हॅटट्रिक


वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नवव्या षटकांत बुमराहने हॅटट्रिक घेतली. मात्र ही कामगिरी पूर्ण करण्यात कर्णधार विराट कोहलीचा सर्वात मोठा वाटा असल्याचे बुमराह सांगतो. डॅरेन ब्राव्हो आणि शेमराह ब्रुक या फलंदाजांना पाठोपाठच्या चेंडूंवर बाद केल्यानंतर केमर रोश पायचीत असल्याची खात्री बुमराहला नव्हती, त्यामुळे त्याने पंचांकडे अपीलदेखील केले नव्हते. याच क्षणी कोहलीने पंचांकडे डीआरएसची मागणी केली. टीव्ही पंचांनी बॉलट्रॅकर, पीचिंग आणि इम्पॅक्ट पाहिला तेव्हा चेंडूचा बॅटला स्पर्श झाला नसल्याचे स्पष्ट झाले व चेंडू फक्त पॅडला लागल्याचा व चेंडू यष्टीवर धडकणार असा निर्वाळा देत रोश बाद असल्याचा निर्णय दिला व बुमराहची हॅटट्रिक पूर्ण झाली.    
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link