Next
वेळ देण्याची गोष्ट
मिथिला दळवी
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

बारा वर्षाच्या अथर्वची आई अनघा माझ्यासमोर बसली होती. काही बोलायला सुरुवात करण्यापूर्वी तिचे डोळे वाहायला लागले होते. पर्समधून रुमाल काढून ती सारखी डोळे पुसत होती.
थोड्या वेळाने तिने सांगायला सुरुवात केली- तिच्या कामाच्या निमित्ताने तिला घरी अगदी थोडा वेळ मिळायचा. अथर्वच्या बाबांची तीन वर्षांसाठी दुसऱ्या शहरात बदली झाली होती आणि एकटीने सगळ्या गोष्टी निभावताना तिची तारेवरची कसरत होत होती. अथर्वला वेळ देता येत नाही, या कल्पनेने ती खूप त्रस्त झाली होती.
मुलांना वेळ देणे, हा आजच्या गतिमान आयुष्यातला परवलीचा शब्द झाला आहे.
मुलांना वेळ देणं म्हणजे काय? अनेक आईबाबांना हा प्रश्न विचारून काय उत्तरे मिळाली आहेत ते पाहू या-
“मुलांबरोबर मजा करणं, गप्पा मारता येणं. रोजच्या रोज शेअरिंग करता येणं.”
“मुलांना वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजसाठी घेऊन जाता येणं, अभ्यासात मदत करणं.”
“मुलांच्या खाण्यापिण्यावर लक्षं देता येणं, आपले संस्कार करता येणं, मुलांच्या अडीअडचणीसाठी सोबत असणं.”
संकल्पना चांगली आहे, त्याबद्दल दुमत नाही. फक्त गेल्या काही वर्षांमध्ये ‘मुलांना वेळ देता येणं’ हा इतका परवलीचा शब्द झाला आहे की शिक्षक, पालक, समुपदेशक मंडळी उठताबसता याबाबत बोलत आहेत. याचे प्रमाण आता इतके वाढले आहे, की मुलांच्या वागण्यात काही कमीजास्त झाले, की पालकांना पटकन सल्ला मिळतो- मुलांना वेळ द्या. ती एक वॉशिंग्टनची कुऱ्हाड झाली आहे आणि त्यातील तारतम्य हरवत चालले आहे. इतके की मुलांचा अभ्यास, खेळ, मित्रमंडळी, या संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नाची लिंक आईवडील (विशेषतः आई) ‘वेळ देता का’ याच्याशी जोडतात.
काही कारणांमुळे मुलांना वेळ नाही देता आला, की आईला अगदी अपराधी वाटू लागते- अनघासारखे.
काय होते आहे, ते पाहूया.
एक-दीड पिढीआधी शहरी भागातही नोकरी, व्यवसाय करणाऱ्या आयांचे प्रमाण लक्षणीय होते. काही घरांमधून सपोर्ट सिस्टिमही उपलब्ध होती, काहींना ती नव्हतीही. या सगळ्या आया नोकरी सांभाळून, घरातली कामेही पाहत होत्या. पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या आयांचा बराचसा वेळ घरकामात जात होता. दोन्ही परिस्थितीमधल्या  आयांना मुलांसाठी वेळ देता येईलच याची खात्री नव्हती. तरीही या आयांची मुले शिकली, त्यांनी आपले मार्ग शोधले, ती यशस्वीही झाली.
मोठे होताना कोणकोणते घटक या मुलांच्या मदतीला आले ते पाहूया. एकत्र मोठी कुटुंबे, मैदानी खेळ, राहत्या घराच्या आसपास राहणारे सगळ्या वयोगटातले मित्र-मैत्रिणी! आधीच्या पिढ्या आजूबाजूच्या माणसांना पाहत, चुका करत, धडपडत शिकली आहेत.
आताच्या काळात मुलांवर बरेवाईट संस्कार करणारे घटकही वाढले आहेत. समाजमाध्यमांचा (सोशल मिडिया) त्यातला सहभाग तर लक्षणीयच. बऱ्याच घरात एक किंवा दोनच मुले. कुटुंबेही छोटी आणि मुलांचा मैदानी खेळात घटत जाणारा वेळ. या सगळ्यामुळे मुलांचा प्रत्यक्ष माणसांसोबत होणारा सहजसोबत वावर (इंटरॅक्शन) कमी होतो आहे. त्यात जगण्याचा वेग जबरदस्त वाढलेला आहे. एकंदर यशस्वी होण्याचा ताण असल्यामुळे अपयशाची दहशत आणि चुका व्हायला फारसा वाव नाही असे चित्र आजूबाजूला दिसत आहे. या सगळ्याचा एकंदर परिपाक आता असा झाला आहे की लहान वयापासून मुलांचे सगळे काही ठीकठाक असायलाच हवे, असा काहीसा सार्वत्रिक समज आताच्या पालकांच्या पिढीत दिसतो आहे. गोष्टी जरा जरी ट्रॅकवरून ढळल्या की प्रचंड टेंशन! त्यामुळे आई-बाबाही इन्स्टण्ट रामबाण उपायांच्या कॅप्सूल शोधत असतात. वेळ देणे ही त्यातलीच एक. आणि तो देता येत नसेल तर मग येते अपराधी भावना!
अनेकदा कामाच्या ठिकाणी असणारी डिमांडिंग सिच्युएशन, घरातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे आजारपण या सगळ्यांमुळे वेळेची आधी असणारी कसरत आणखीनच तीव्र होऊन जाते. खरे तर हे आजच्या काळाचे वास्तव आहे. मुलांना या काळात वेळ नाही देता आला तर त्यात वावगे असे काहीच नाही. अशा परिस्थितीत खरे तर मुलांनी आपणहून जबाबदारी घेऊन अभ्यास करणे, स्वतःची काही कामे स्वतः पार पडणे, ही शिकण्याची ही संधी असते. आयुष्यातल्या कमी अधिक ताणाच्या क्षणांना सामोरे जाण्याची ही ‘नेट प्रॅक्टिस’ म्हणूया. अशा वेळी उलट मुलांसोबत वास्तव शेअर करणे ही जास्त विवेकाची गोष्ट नाही का?  मुलानां वेळ देता येत नाही, ही अपराधी भावना मग कशाला?
मग काहीच करायचे नाही का आपण आपल्या मुलांसाठी? -असे मुळीचच नाही. वेळेच्या मारामारीच्या सध्याच्या या काळात पालक म्हणून काय करू शकतो आपण? पाहूया पुढच्या भागात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link