Next
थरारक जगप्रवास
मिलिंद आमडेकर
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

पावणे दोनशे वर्षांपूर्वी एखाद्या एकट्या महिलेनं प्रवासाला निघावं हीच मोठी धाडसी आणि औत्सुक्याची गोष्ट होती. जगाच्या विविध भागांत कोणकोणत्या जमातीचे लोक राहतात; त्यांच्या भाषा कोणत्या; त्यांचे रितीरिवाज कसे आणि कोणते असतात, त्या भागांमध्ये पशू, पक्षी, फुलं, फुलपाखरं कशी असतात; याचं कुतूहल कायमच मानवाला राहिलेलं आहे. हेच कुतूहल आयडा फिफरला एकटीनं प्रवासाला बाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरले.
आयडा फिफर जगप्रवासासाठी ब्राझीलकडे निघाली, तेव्हा त्या बोटीच्या प्रवासात वादळानं त्यांना गाठलं. जोरात विजा कडाडू लागल्या. वाऱ्याचे, पाण्याचे फटकारे बसू लागले. बोट जोरात हेलकावत होती. विजांचे लोळ क्षितिजावर कोसळत होते. कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नव्हतं. सुदैवानं वादळामुळे फार नुकसान झालं नाही. ती ब्राझीलच्या ‘रिओ-डी-जानिरो’ बंदरात उतरली. तिथली अस्वच्छता आणि सावळागोंधळ बघून ती वैतागलीच. १८४६ चा तो काळ. त्या काळात तिथेही फारशा सुधारणा झालेल्या नव्हत्या. तिला तिथले वनप्रदेश पाहायचे होते. त्यासाठी तिनं एक वाटाड्या आणि एक नोकर सोबत घेतला होता. प्रवास करत असताना एकदा एका सुराधारी इसमानं त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आयडा हबकली. तिच्या पायघोळ झग्यामध्ये अडकून पडली. तेवढ्यात तिनं त्या हल्लेखोराला जोरात लाथ मारली. त्यामुळे तोही धडपडत पडला. त्याच्या हातातला सुरा पडला. ती धडपडतच उठली आणि तिनंही अंगरख्यात लपवलेला आपला चाकू काढून त्याच्यावर धावली. तोपर्यंत वाटाड्या आणि नोकर यांनी त्याला धरून ठवेलं. आयडानं त्याचा चांगलाच समाचार घेतला. तो घाबरून पळूनच गेला.
या प्रसंगानं आयडा खचली नाही की तिनं आपला प्रवासही थांबवला नाही. त्यानंतर ती ‘पूरी’ जमातीच्या लोकांच्या प्रदेशात पोहोचली. त्यांचे रीतिरिवाज तिनं समजून घेतले. आज ही जमात नामशेष झाली आहे. तेथून पुढे आयडा दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकाकडील ‘टेरा डेल फ्युगो’ या भागात गेली. तो विस्तीर्ण गवताळ प्रदेश पाहून ती बोटीनं ‘ताहिती’ बेटांवर गेली. तेथील लोकांच्या चालीरीती समजजून घेऊन ती आशिया खंडाच्या वाटेवर आली. इंडोनेशिया देशातल्या बोर्निओ बेटातल्या ‘डाईक’ जमातीला पाहायची तिची इच्छा होती. त्यासाठी तिनं ११०० किलोमीटरचा बोटीनं आणि २८० किलोमीटर प्रवास जंगलातून पायी केला. ‘डाईक’ जमातीच्या लोकांनाही ती भेटली. हा सारा प्रवासही थरारकच होता.
आयडा फिफरचा जन्म १५ ऑक्टोबर १७९७ रोजी ऑस्ट्रिया देशात व्हिएन्ना इथे झाला. सहा भावंडांची ती एकुलती एक बहीण असल्यामुळे १३ व्या वर्षांपर्यंत तिला मुलांसारखाच पोषाख घालण्यात येत असे. त्यामुळेही असेल कदाचित, पुरुषांसारखी आव्हानं पेलण्याची मानसिकता तिच्यात तयार झाली असावी. १८२० साली तिचं लग्न डॉ. मार्क अँटन फिफर यांच्याशी झालं. ते तिच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठे होते. तिला दोन मुलगे झाले. १८३८ मध्ये तिच्या नवऱ्याचं निधन झालं. तिची मुलं आता मोठी झाली होती. १८४२ साली ती प्रथमच मोठ्या प्रवासाला निघाली. तो होता मध्यपूर्वेचा म्हणजे जेरुसलेमपर्यंतचा प्रवास. त्या प्रवासातल्या अनुभवांवर आधारित ‘ए व्हिजिट टू होली लँड’ हे पुस्तक तिनं लिहिलं. ते १८५१ साली प्रसिद्ध झालं. त्यानंतर तीन वर्षांनी ती आईसलँड आणि स्कँडिनेव्हियन देशांच्या दौऱ्यावर गेली. तिथं तिनं काही दगडांचे, वनस्पतींचे नमुने गोळा केले. या प्रवासावरही तिनं पुस्तक लिहिलं. त्यानंतर तिनं थेट जगप्रवास करायचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून ती बोर्निओला पोचली होती. तेथून ती सिंगापूरमार्गे कोलंबोला सिलोनमध्ये आली. भारताचं आकर्षण तिला होतंच, त्यामुळे ती मग मद्रासहून कलकत्ता, तेथून दिल्लीला आली. दिल्लीहून ती मुंबईच्या प्रवासाला निघाली. कधी बैलगाडीतून तर कधी उंटावरून ती प्रवास करत असे. बऱ्याचदा ती सरकारी डाकबंगल्यात राहत असे.
एकदा आयडा राजस्थानातल्या कोटा शहराच्या अलिकडे, रूमछा गावी आली. संध्याकाळ झाली होती म्हणून तिनं तिथेच मुक्काम करायचा निर्णय घेतला. एका घराच्या व्हरांड्यात तिनं पथारी पसरली तर सगळा गावच तिच्याभोवती गोळा झाला. एक गोरी बाई कशी दिसते, कशी वागते याचं प्रचंड कुतूहल त्या लोकांना होतं. त्यामुळे खरं तर ती खूप वैतागली होती, मात्र तिचा निरुपाय झाला. पुढे एकदा तिच्या नोकरानं काही आगळीक केली. तिच्या सूचना मानायला नकार दिला. तेव्हा तर तिनं त्या नोकराला काठीचा प्रसाद द्यायलाही कमी केलं नाही. तिचं म्हणणं असं, की कधी कधी अशा माणसांना जरब बसवण्यासाठी अशी पावलं उचलावी लागतात.
मुंबईला पोचण्यासाठी तिला सात आठवडे लागले. मुंबईहून ती आफ्रिकेतल्या कैरो इथे पाचली. तिथून पुढे ती इराक, इराणमार्गे युरोपात व्हिएन्नात तिच्या घरी पोचली. या प्रवासाचं वर्णनही तिनं लिहिलं. इराकमध्ये तर ती तिथला राजा म्हणजे ‘पाशा’ याच्या जनानखान्यातल्या त्याच्या बायकांमध्ये आयडा मिसळली. त्यांचं जीवनही तिनं जवळून अभ्यासलं. दोन आठवडे तिनं एका काफिल्याबरोबर उंटावरूनही प्रवास केला. तिच्या प्रवासाची रसभरीत वर्णनं वाचकांना खूप आवडत असत. व्हिएन्नाला ती घरी पोहोचली, परंतु आता तिचं मन घरात रमत नव्हतं. ती पुन्हा जगप्रदक्षिणेला निघाली. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींवर मात करत ती पुढे पुढे जात राहिली. युरोपातले काही धानिक लोक तिला मदत करत असत. तिचं राहणीमान साधं होतं. शक्य तिथे पैसे वाचण्याचा ती प्रयत्न करे. तिच्या लिखाणांमुळे भूगोल, संस्कृती, इतिहास, निसर्ग अशा विविध विषयांवर माहितीपूर्ण वर्णनं ती लिहीत असे.
१८५८ साली वयाच्या ६२व्या वर्षी तिचं व्हिएन्ना इथं निधन झालं, तिला मादागास्कर बेटावर झालेल्या संसर्गामुळे. तिनं प्रवास अर्धवट सोडला. ती घरी परतली. परंतु त्या आजारातून उठू शकली नाही. १६ वर्षांच्या प्रवासात तिनं दोन वेळा जगप्रदक्षिणा केली. एकूण २०,००० मैल जमिनीवरून तर १ लाख ५० हजार मैल सागरी प्रवास तिनं केला. जगप्रदक्षिणा करणारी जगातली पहिली महिला म्हणून ती विख्यात झाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link