Next
खुन्नस आणि जिगर!
सतीश स. कुलकर्णी
Friday, June 14 | 02:00 PM
15 0 0
Share this story


दोन वर्षांपूर्वी, म्हणजे १८ जून २०१७ रोजी इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स करंडकाची अंतिम लढत होती. त्यासाठी समोरासमोर उभे ठाकले होते कट्टर प्रतिस्पर्धी – भारत आणि पाकिस्तान. टीव्ही वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग वाढतो, जाहिरातींचा महसूल वधारतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या गल्ल्यात भर पडते, तिकिटांचा काळाबाजार होतो आणि सट्टाबाजार गरम होतो, अशी ही लढत. ‘बीबीसी’च्या हिंदी सेवेमध्ये दीर्घ काळ काम केलेल्या विजय राणा यांनी त्या लढतीच्या आदल्या दिवशी ‘फेसबुक’वर पोस्ट टाकली होती – ‘Indian media can’t differentiate between cricket and war.’

हाच मजकूर ‘रि-पोस्ट’ करण्याचा मोह विजय राणा यांना आज-उद्या कदाचित होईलही. विश्वचषकस्पर्धेतील सर्वांत मोठी लढत रविवारी आहे. पुलवामा आणि बालाकोटनंतर मैदानातलं ‘युद्ध’ कोहलीच्या संघानं जिंकलेलं भारतीयांना पाहायचं आहे. पाकिस्तानविरुद्धचा क्रिकेटचा सामना म्हणजे युद्ध नाही; पण युद्धाहून तो कमीही नाही, असंच भारतीयांना वाटतं.

भारत-पाकिस्तान सीमा पुन्हा ओलांडण्यासाठी क्रिकेटच्या चेंडूला १७ वर्षं वाट पाहावी लागली. पाकिस्तानच्या संघानं १९६१-६२मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यानंतर भारतानं १९७८-७९मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. त्यात दोन्ही देशांमधील मर्यादित षटकांचा पहिला सामना खेळला गेला. तोच अफलातून अटीतटीचा झाला. त्यानंतरच्या तीन दशकांत या देशांमधील बऱ्याच लढती चित्तथरारक, रोमहर्षक झाल्या.

क्वेट्टा (१ ऑक्टोबर १९७८) : मालिकेतील सामने ४० षटकांचे झाले. भारतानं अवघ्या चार धावांनी यशस्वी सलामी दिली. मोहिंदर अमरनाथ (५१, पाच चौकार), सुरिंदर अमरनाथ (३७) व दिलीप वेंगसरकर (३४) यांच्यामुळे भारतीय संघानं ७ बाद १७० धावा केल्या. सर्फराज नवाझ (३/३४) व हसन जमील (२/२९) यशस्वी गोलंदाज होते. सलामीच्या माजिद खान यानं अर्धशतक काढत झहीर अब्बाससह दुसऱ्या जोडीसाठी ६२ धावांची भागीदारी केली. माजिदचा मोहिंदरनं त्रिफळा उडविल्यानंतर मधली फळी कोसळली. व्यंकटराघवनच्या आठ षटकांत केवळ १४ धावा निघाल्या.

साहिवाल (३ नोव्हेंबर १९७८) : पाकिस्तानी गोलंदाज रडीचा डाव खेळत असल्याच्या निषेधार्थ बेदीनं आपल्या फलंदाजांना मैदान सोडायला लावलं. त्या वेळी भारताला विजयासाठी १४ चेंडूंमध्ये २३ धावांची गरज होती. पाकिस्तानानं ७ विकेट गमावून २०५ धावा केल्या. असिफ इक्बालच्या ६२ धावा सर्वाधिक होत्या. चेतन चौहान (२३), अंशुमन गायकवाड (नाबाद ७८), सुरिंदर (६२) यांनी संघाला विजयाच्या जवळ नेलं. अडतिसावं षटक टाकणाऱ्या सर्फराझचे चारही चेंडू उसळते व स्वैर होते. फलंदाजांना त्याच्या जवळपासही पोहोचता येत नव्हतं. यातला एकही चेंडू पंचांनी ‘वाईड’ दिला नाही. याचा निषेध करीत बेदीनं सामनाच सोडून दिला!

शारजा (२२ मार्च १९८५) : रॉथमन्स करंडक स्पर्धेतील पहिलाच सामना कमी धावसंख्येचा, धक्कादायक निकालाचा ठरला. तो गोलंदाजांनी गाजवला. इम्रानच्या भेदक माऱ्यामुळे (६/१४) भारताचा डाव १२५ धावांतच संपला. महंमद अजहरुद्दीन (४७) व कपिलदेव (३०) यांनीच काय तो प्रतिकार केला. कपिलदेव (३/१७), लक्ष्मण शिवरामकृष्णन (२/१६) व रवी शास्त्री (२/१७) यांच्यापुढे पाकिस्तानची दैना उडाली. पाच जणांना भोपळाही फोडता आला नाही. संघ ८७ धावांतच गारद! गावसकरनं चार झेल टिपलेल्या या सामन्यात भारत ३८ धावांनी विजयी झाला.

शारजा (१८ एप्रिल १९८६) : ऑस्ट्रेलेशिया करंडकाचा अंतिम सामना चिरस्मरणीयच. सामन्यातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय अक्षरश: खेचून आणणारा जावेद मियाँदाद व तो चेंडू टाकणारा चेतन शर्मा सर्वांच्या कायमचे लक्षात राहतील. श्रीकांत (७५), गावसकर (९२) व वेंगसरकर (५०) यांच्या धडाकेबाज सुरुवातीमुळे भारतानं ७ बाद २४५ धावा केल्या. पाकिस्तानची अवस्था दोन बाद ३९ असताना मियाँदाद मैदानात उतरला. सलीम मलिक, अब्दुल कादिर यांच्याबरोबर भागीदाऱ्या करून त्यानं डावाला आकार दिला. कादिर बाद झाल्यावर डाव गडगडला. भारतानं मिळविलेली पकड शेवटच्या षटकापर्यंत होती. अखेरचं षटक, चेंडू चेतन शर्माच्या हाती, चार धावा हव्या व पाकिस्तानची शेवटची जोडी मैदानात. शर्मानं टाकलेला तो यॉर्कर, पुढं सरसावलेल्या मियाँदादसाठी ‘फुल टॉस’ ठरला. त्यानं तो मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिला आणि हात उंचावून जल्लोष करू लागला. मियाँदाद देशाचा ‘हीरो’ झाला. या षटकाराचं दडपण भारतीय संघावर पुढे बराच काळ राहिलं.

कोलकाता (१८ फेब्रुवारी १९८७) : सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सलीम मलिकनं ३६ चेंडूंमध्येच तुफानी ७२ धावा करीत आपल्या संघाला दोन गडी, तीन चेंडू राखून विजय मिळवून दिला. श्रीकांत (१२३-१०३ चेंडू) व महंमद अजहरुद्दीन (४९) यांच्या जोरावर भारतानं ४० षटकांमध्ये सहा बाद २३८ अशी मजल मारली होती. शतकी सलामीनंतर रवी शास्त्रीच्या फिरकीनं पाकिस्तानच्या मधल्या फळीला गुंडाळलं. परंतु आठ षटकं राहिली असताना, षटकामागं आठच्या गतीनं धावांची गरज असताना आलेल्या मलिकनं सगळं चित्रच बदलून टाकलं.

हैदराबाद (२० मार्च १९८७) : शास्त्री (नाबाद ६९) व कपिलदेव (५२ चेंडूत ५९) यांच्या शतकी भागीदारीमुळं भारतानं ४४ षटकांत सहा बाद २१२ धावा केल्या. बढती मिळून चौथ्या क्रमांकावर आलेल्या सलीम मलिकनं ८४ धावा केल्या. मधल्या फळीनं पुन्हा घात केला. विजयासाठी पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. अशक्यप्राय दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अब्दुल कादिर धावबाद झाला आणि धावसंख्या समान झाली. पाकिस्ताननं एक गडी अधिक गमावल्यानं विजय भारताच्या खात्यावर जमा झाला.

टोरोंटो (कॅनडा) (१७ सप्टेंबर १९९६) : मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान २ गडी व १ चेंडू राखून विजयश्री मिळविली. राहुल द्रविड (९०) व अझर (९९) यांनी केलेल्या १६१ धावांच्या भागीदारीमुळे भारतानं ६ बाद २६४ची मजल मारली. अजहर महमूद, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. पहिले दोन गडी लवकर गमावलेल्या पाकिस्तानला सईद अन्वर (८०), सलीम मलिक (नाबाद ७०) यांनी सावरलं. नंतर नऊ धावांची भर टाकून तीन फलंदाज बाद झाल्यावर संघ अडचणीत आला. मलिकनं सकलेनच्या साथीनं ४५ धावांची नाबाद भागी करून विजय मिळवून दिला.

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) (१० जानेवारी २०००) : तिरंगी कार्लटन अँड युनायटेड सीरिजचा दुसरा सामना कमी धावसंख्येचा आणि रंगतदार झाला. शेवटच्या चेंडूवर पाकिस्ताननं दोन गडी राखून विजय मिळविला. दंडामुळे एक षटक कमी होऊन विजयासाठी ४९ षटकांत १९६ धावा करण्याचं आव्हान असताना संघानं ७२ धावांवरच सहा गडी गमावले होते. या पडझडीचं कारण होतं श्रीनाथचा वेग व अचूकपणा. महंमद युसूफ ऊर्फ युसूफ योहाना (६३) मदतीला आला. त्यानं अक्रम व सकलेन यांच्याबरोबर उपयुक्त भागीदाऱ्या केल्या. तो बाद झाला तेव्हा संघाला ४३ धावांची गरज होती. सकलेननं वकार युनूसच्या साथीनं टिच्चून खेळत लक्ष्य गाठलं. सौरभ गांगुली (६१) व रॉबिनसिंग (५०) वगळता मधल्या फळीनं घात केला. शोएबनं (३/१९) धारदार गोलंदाजीमुळेच डाव १९५ धावांत आटोपला.

कराची (१३ मार्च २००४) : धावांचा पाऊस पडलेला सामन्यात भारतानं पाच धावांनी बाजी मारली. त्याचं श्रेय ५४ चेंडूंमध्ये ६९ धावांची सलामी देणाऱ्या वीरेंद्र सेहवाग-सचिनला. सेहवागनं पाकिस्तानी गोलंदाजांची पिटाई करीत ५७ चेंडूंमध्ये ७९ धावा टोलवल्या. सेहवाग-गांगुली (४५) यांची ७३ धावांची आणि गांगुली-द्रविड (९९) यांची ७२ धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. यावर कळस चढविला द्रविड-महंमद कैफ (४६) यांच्या शतकी भागीदारीनं. सेहवागच तुफान आणि द्रविडची शैलीदार फलंदाजी यामुळे ५० षटकांत ७ बाद ३४९ धावांचा टप्पा गाठता आला. महंमद युसूफ (७३-चार षटकार), इंझमाम (१०२ चेंडूंमध्ये १२२) यांनी १३५ धावांची भागीदारी करून लक्ष्याचा पाठलाग सुरू केला. इंझमामन मग युनूस खानला (४६) साथीला घेऊन १०८ धावांची भर घातली. युनूस खान बाद झाल्यावर अब्दुल रझाक, मोईन खान यांचे प्रयत्न अपुरे पडले. शेवटच्या षटकात पाकिस्तानला नऊ धावा हव्या असताना आशिष नेहरानं खोल टप्प्यावर व यष्टीच्या रोखान मारा केला. त्याचं फळ संघाला मिळालं. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय जलदगती गोलंदाजांनी कमालीचा नियंत्रित मारा केला. शेवटच्या चार षटकांमध्ये तेच कौशल्य दाखवलं. लीलया देखणे फटके मारणाऱ्या इंझमामाची खेळी अवर्णनीय होती.

पेशावर (६ फेब्रुवारी २००६) : अपुऱ्या प्रकाशामुळे डकवर्थ-लुईस नियमावलीनं निकाल लागलेल्या या लढतीत पाकिस्तानला सात धावांनी विजय मिळाला. सचिनचं खणखणीत शतक, त्यानं इरफान पठाण (६५) व धोनी (५३ चेंडूंमध्ये ६८) यांच्याबरोबर केलेल्या भागीदाऱ्या व्यर्थ ठरल्या. शेवटचे सहा फलंदाज २३ धावांतच बाद झाल्यानं भारताला ३२८ धावांवर समाधान मानावं लागलं. नावेद-उल-हसन यानं चार, तर महंमद असिफनं ३० धावांतच ३ मोहरे टिपले. पाकिस्तानपुढे ४७ चेंडूंमध्ये ३०५ धावा करण्याचं सुधारित लक्ष्य होतं. त्यापेक्षा त्यांनी सहा धावा अधिकच केल्या. सलामीचा डावखुरा सलमान बट (१०१), त्यानं शोएब मलिकच्या (६७ चेंडूंमध्ये ९०, तीन षटकार) साथीनं केलेली १५१ धावांची भागीदारी मोलाची ठरली.

दिल्ली (६ जानेवारी २०१३) : कमी धावा होऊनही विलक्षण रंगलेल्या या सामन्यात भुवनेश्वर कुमार, इशांत यांचा वेगवान मारा व अश्विनची फिरकी याच्या जोरावर भारतानं १० धावांनी विजय मिळविला. उजव्या हातानं ऑफ-ब्रेक टाकणाऱ्या सईद अजमलला भारतीय फलंदाज त्या दिवशी शरण गेले आणि ४३.४ षटकांत भारताचा डाव १६७ धावांत संपला. कर्णधार धोनीच्या ३६ धावा डावांतील सर्वोच्च होत्या. अजमलनं तळाच्या चार फलंदाजांसह निम्मा संघ फक्त २४ धावांच्या मोबदल्यात गारद केला. भुवनेश्वरने कमरान अकमल व युनूस खान यांना झटपट तंबूत पाठवलं. नसीर जमशेद, कर्णधार मिसबा-उल-हक व उमर अकमल यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. इशांत शर्मानं मधल्या फळीतील तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवल्यानं पाकिस्तानचा डाव कोसळला. त्यांचे सर्व गडी १५७ धावांत बाद झाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link