Next
कास्टिंग काउच आणि बरंच काही
निपुण धर्माधिकारी
Friday, September 27 | 01:45 PM
15 0 0
Share this story

नमस्कार. माझ्या ‘धप्पा’ या पहिल्या चित्रपटाबद्दल मी खूप उत्सुक होतो, हे मागील भागात सांगितलं आहे. दिग्दर्शक म्हणून तो माझा पहिला चित्रपट. त्याचं चित्रीकरण पूर्ण झालं आणि त्याचवेळी ‘कास्टिंग काउच’ या वेब सीरिजची कल्पना घेऊन सारंग साठे आला. ती संकल्पना व लेखन हे पूर्णपणे त्याचं आहे. कलाकारांना आमंत्रित करायचं, तिथे एक काउच असणार व त्यावर सर्वांनी बसायचं. मग मी आणि अमेयनं त्यांच्या मुलाखती घ्यायच्या हे ठरलं. मात्र त्या मुलाखती कशा; तर आम्ही एक चित्रपट करणार आहोत ज्यात या कलाकारांना आम्ही भूमिका ऑफर करतोय आणि त्यासाठी ही मुलाखत घेत आहोत अशा स्वरूपाच्या असणार होत्या. मुळात तेव्हा वेब सीरिज हा प्रकार नवीन होता. आजच्यासारख्या प्रत्येकाच्या मोबाइलवर वेब सीरिज अवतरल्या नव्हत्या. तरीही आम्ही काहीतरी नवीन व हटके स्वरूपाचा शो म्हणून तो करणार होतो. त्यावेळी प्रायोजक वगैरे मिळणं तर शक्य नव्हतं.
आमची कल्पना चांगली होती, परंतु ती किती लोकांपर्यंत पोचेल याबाबत शाश्वती नव्हती, तरीही आम्ही त्यात उडी घेतली. सारंगनं स्वतःच्या खिशातले पैसे टाकून श्रीगणेशा केला. राधिका आपटे आमची मैत्रीण, म्हणून मग तिलाच घेऊन पहिला भाग केला. आणि काय सांगू, तो इतका लोकप्रिय झाला, इतक्या वेगानं सर्वदूर गेला, की आता पुढे काय, पुढचा भाग केव्हा, पुढच्या भागात कोण, अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. दुसऱ्या भागापासून एक प्रायोजक मिळाला आणि दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत गेली. बरेच लोक बघताहेत याचे आकडे दिसू लागले. मग लोक नव्या भागाची वाट बघू लागले. यावेळी कोण येणार याची उत्सुकता वाढू लागली. पहिला सीझन आम्ही आठ भागांचा केला. आठवा भाग महेश मांजरेकरसरांबरोबर केला. तो भाग प्रसारित होईपर्यंत आधीचे भाग बऱ्यापैकी सगळीकडे पसरले होते. अमेय त्याआधीच स्टार झालेला होता, त्यामुळे लोक त्याला चांगलं ओळखत होते. मी पडद्यामागं दिग्दर्शक म्हणून जास्त वावरलेला असल्यानं माझा चेहरा लोकांना तेवढा माहीत नव्हता, तो आता माहीत होऊ लागला होता.
पहिल्या सीझननंतर आम्ही चार-पाच महिन्यांची गॅप घेतली आणि दुसरा सीझन आणला. दुसऱ्या सीझनमध्ये बऱ्यापैकी हिंदी कलाकार येऊन गेले. दुसरा सीझन झाल्यावर आम्ही विश्रांती घेतली. थोडंसं असं होऊ लागलं होतं, की लोकांचे चित्रपट जवळ यायचे तसे ते आमच्याशी संपर्क साधायचे. म्हणजे ‘कास्टिंग काउच’ हा कार्यक्रम चित्रपटांच्या प्रमोशनचं एक माध्यम होऊ लागला होता आणि ते आम्हाला करायचं नव्हतं, कारण आमची संकल्पना वेगळी होती. तसं केलं असतं तर आमच्या भागांची संख्या वाढली असती, जास्त पैसे मिळाले असते, परंतु हे ते व्यासपीठ नाही, असं आमचं म्हणणं होतं. त्याचवेळी आम्हाला याचीही कल्पना होती, की या कार्यक्रमाला एक शेल्फलाइफ आहे. दरम्यान ‘भाडिपा’ही सुरू झालं होतं व त्याचीही लोकप्रियता वाढत होती. तरीही ‘कास्टिंग काउच’च्या नव्या सीझनबद्दल लोकांकडून चौकशी होत होती. मग आम्ही तिसरा सीझन करायचं ठरवलं. आता प्रेक्षकांसमोर पंचेचाळीस मिनिटांचे लाइव्ह एपिसोड करायचे आणि तेच एडिट करून ऑनलाइन टाकायचे, असं ठरलं. हा प्रकार अधिक आव्हानात्मक होता, कारण इथे रिटेकचा पर्याय नव्हता. हाही नवीन आणि वेगळा प्रयोग होता. मग आम्ही पुन्हा राधिका आपटेलाच बोलावलं आणि पहिला भाग केला. लाइव्ह कार्यक्रमाला आणखी चांगला प्रतिसाद मिळाला. सगळे भाग खूप चांगले झाले आणि त्याची सांगता काजोलच्या एपिसोडनं झाली. आता ‘कास्टिंग काउच’ अशा टप्प्यावर आहे, की लोक म्हणताहेत तुम्ही पुन्हा सुरू करा. पण आता आम्ही बहुधा लाइव्ह शोजवर लक्ष केंद्रित करू. पुढच्याच महिन्यात आमचा ऑस्ट्रेलियाचा दौरा आहे. तिथे आम्ही ‘कास्टिंग काउच’ कार्यक्रम करणार आहोत. एक कलाकार किंवा नट म्हणून व्यक्तिशः मला एरवी जी लोकप्रियता मिळाली असती त्यापेक्षा अधिक लोकप्रियता ‘कास्टिंग काउच’मुळे मिळाली. अमेयचा मित्र म्हणून जास्त लोकप्रियता मिळाली. लोक भेटायचे तेव्हा ‘अमेय कुठे आहे?’ असं विचाराचे. आपण स्क्रीनवर दिसतोय म्हटल्यावर मी माझ्या लूकबाबत अधिक सजग झालो तो ‘कास्टिंग काउच’मुळेच.
दरम्यान, ‘बापजन्म’ या चित्रपटावर मी काम सुरू केलं होतं. तो मी काही वर्षांपूर्वी लिहिला होता, पण निर्माते सापडत नव्हते. ‘धप्पा’चे निर्माते सुमतीलाल शाह यांनी तो चित्रपट घेतला आणि त्याला गती मिळाली व तो चित्रपट ‘धप्पा’च्या आधी प्रदर्शित झाला. दरम्यान मला उत्तर कोरियाची एक ‘आर्टिस्ट रेसिडेंसी’ मिळाली होती. वेगवेगळ्या देशांतील वीस लोकांची त्यांनी निवड केली होती व त्यात मी होतो. मी खूप खुश होतो, परंतु त्याच सुमारास ‘बापजन्म’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली आणि त्यामुळे मला उत्तर कोरियाला जाता आलं नाही. ‘बापजन्म’ प्रदर्शित झाला, समीक्षकांनी गौरवला, पण थिएटरवर फारसा चालला नाही. मग तो ‘अमेझॉन प्राइम’वर आला आणि तिथे प्रचंड लोकप्रिय झाला. म्हणजे मला अजूनही ‘चित्रपट आवडला’ असे मेसेज येतात. ‘धप्पा’ हा मुलांचा चित्रपट असल्यामुळे त्यात कुणी मोठे सेलिब्रिटी नव्हते, त्यामुळे तो चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चालला नाही, परंतु त्यानं राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ पटकावला आणि अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्सवर आपली मोहोर उमटवली.
‘बापजन्म’ आणि ‘धप्पा’च्या दोन्हींमध्ये मला दिग्दर्शक म्हणून एक महत्त्वाची कलाकृती मिळाली ती म्हणजे ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक. हे नाटक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण ‘लूज कंट्रोल’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक कसं पडलं होतं याची गोष्ट मी तुम्हाला याआधी सांगितली आहेच. त्यानंतर काही काळ मी संगीत नाटकं केली. पण त्यावरही लोकांनी ‘तू जुनंच तर करतो आहेस. त्यात नवीन काय?’ अशी विचारपूस वजा टोमणे ऐकवले होते. ‘अमर फोटो स्टुडिओ’च्या निमित्तानं मला एक नवी संधी मिळाली. नाटक खूप चाललं, एका वर्षात सोळा ते सतरा पुरस्कार त्या नाटकाला मिळाले. ‘कास्टिंग काउच’, ’बापजन्म’, ‘धप्पा’ आणि ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे सगळे योग साधारण एकाचवेळी जुळून आल्यानं मला दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी ओळख मिळत गेली. ‘कास्टिंग काउच’ आणि ‘अमर फोटो स्टुडिओ’ या दोन कलाकृती तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय झाल्या. सध्या वेब सीरिज, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांतून मी दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम करत आहे. भविष्यात माझा कल दिग्दर्शनकडे अधिक असेल. लवकरच पं. वसंतराव देशपांडेंच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन तुमच्या भेटीला येतोय. तोपर्यंत नमस्कार!
                       (समाप्त)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link